आम्ही सत्तेसाठी भुकेले नाही, लोकांची कामे करण्यासाठी सत्ता हवीय - मनसे आमदार राजू पाटील

निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमात आमदार पाटील यांनी मांडली भूमिका

    03-Aug-2024
Total Views | 16

raju patil
 
 
डोंबिवली  : राजकरणात एक सत्य आहे की तुम्ही जर सत्तेमध्ये नसाल तर आमदार होऊन काही फायदा नाही. म्हणून "मला तुम्हाला सत्तेत बसवायचे आहे" हे विधान राज ठाकरे यांनी केले असले तरी आम्ही सत्तेसाठी भुकेले नाही. लोकांची कामे करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे अशा शब्दांत मनसे नेते आमदार राजू पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली.
कल्याण डोंबिवलीतील प्रमूख पत्रकारांची संघटना असलेल्या निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुक, मनसेची भूमिका, मराठा आरक्षण, शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुती, मतदारसंघातील विकासकामे आदी विषयांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांना दिलखुलास तसेच परखडपणे उत्तरं दिली.
मनसेच्या स्थापनेपासूनच आम्ही स्वबळावर निवडणुक लढतोय...
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही महायुतीच्या उमेदवारांचे झोकून देऊन काम केले आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेची संघटनात्मक ताकद चांगली असून त्यादृष्टीने आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यापासूनच आम्ही स्वबळावर निवडणुका लढतोय. तर राज साहेबांनी स्वबळाची भूमिका मांडली आहे . त्यानंतर आता इतर प्रत्येक पक्षानेही स्वबळाची भाषा सुरू केली असल्याचे मत आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले.
मराठी माणूस टिकवण्यासह मुंबईची वाट लावण्यासही तत्कालीन शिवसेना जबाबदार...
शिवसेना सत्तेत येण्यापूर्वीची मुंबई आणि नंतरची मुंबई यामध्ये मोठा फरक आहे. पूर्वीची मुंबई सुटसुटीत होती. सत्ताधारी शिवसेनेनं 40 लाख मोफत घरांची योजना आणली. या योजनेचा उद्देश खूप चांगला होता. परंतु त्यावेळेस ही मानसिकता बनली की मुंबईत जा, फुटपाथवर एक झोपडी बांधा मग तुम्हाला मोफत घर मिळेल. या चुकीच्या धोरणामुळे हा सर्व बट्ट्याबोळ झाला असून त्याला मुंबई महापालिकेतील शिवसेनेचाही त्याला हातभार लावला. ज्याप्रमाणे त्यावेळी मुंबईतील मराठी माणूस त्यावेळी शिवसेनेमुळे टिकला तशी या मुंबईची वाट लावण्यासही शिवसेनाचा जबाबदार असल्याचे परखड मत आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीत त्यांनी चांगुलपणा दाखवला तर स्वागतच आहे...
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघात आम्ही प्रामाणिकपणे डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी काम केले आहे. त्याअनुषंगाने आगामी विधानसभा निवडणुकीत ते आपल्याला मदत करतील की नाही याबाबत आपण सांगू शकत नाही. त्यांचे राजकरण कसे चालते यावर नाही तर आम्ही आमच्या भरवशावर निवडणुका लढणार असून त्यांनी चांगुलपणा दाखवला तर त्यांचे स्वागतच आहे अशा शब्दांत आमदार पाटील यांनी यावेळी उत्तर दिले.
इथल्या विधानसभा मतदारसंघांचा इतरांपेक्षा आमचा अधिक अभ्यास...
2014 मध्ये आपण जिल्हाध्यक्ष असताना कल्याण लोकसभा निवडणूक लढवली आहे. तर इतर पक्षांनी ते ते मतदारसंघ घेऊन निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत असलेल्या चारही विधानसभा मतदारसंघांतील लोकं कशी आहेत? त्यांच्या गरजा काय आहेत? याचा इतर राजकीय पक्षांपेक्षा आमचा अभ्यास अधिक आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुक लढवताना आजूबाजूच्या मतदारसंघाकडेही लक्ष द्यायला आपल्याला अजिबात अडचण येणार नसल्याचा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121