पुणे : राज्यात लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार हा जोरदार सुरू आहे. कोट्यवधी महिला भगिनींनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत. ही योजना सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झाली. या योजनेवरुन आता मीम्सही व्हायरल होऊ लागले आहेत. तसेच या योजनेची जागृती इतर कुठल्याही योजनेपेक्षा अधिक वेगाने झाली आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदार संघात लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरण्यासही सुरुवात केली असून त्यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, बारामतीतील एका हॉटेलमध्ये अशाच एका योजनेचे पोस्टर व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर हे पोस्टर फार चर्चेचा विषय बनला आहे. या योजनेचे नाव लाडकी सुनबाई योजना, असे ठेवण्यात आले आहे. खरंतरं हे पोस्टर बारामतीतील एका हॉटेल मालकाने तयार केले आहे. त्याची चर्चा आता सोशल मीडियावर सुरू आहे. या हॉटेल मालकाने 'लाडकी सुनबाई' या ऑफर अंतर्गत सासुबाईच्या जेवणासोबत सुनबाईचे जेवण फ्री, अशी पाटी लावली आहे. म्हणजे सासूच्या जेवणाच्या मेनूवर सुनेचे जेवण मोफत मिळणार आहे.
सुनबाईचे जेवण तर मोफत आहे मात्र, त्यासाठी सासूला सोबत घेऊन येणे बंधनकारक आहे. सासूबाई जी थाळी ऑर्डर करणार तीच थाळी सुनबाईंना मोफत दिली जाणार आहे. त्यासाठी घरातील किमान पाच जणांना जेवणासाठी सोबत घेऊन जावे लागणार आहे, अशीही अट ठेवण्यात आली आहे. बारामतीमधील या व्यावसायिकाचे नाव आनंद जाधव असून यांचे हे लाडकी सुनबाई योजना पोस्टर हे लाडकी बहिण योजनेप्रमाणेच सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.