‘कोल्हान टायगर’ची डरकाळी

    29-Aug-2024   
Total Views |

Amit Shah

बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर फक्त भाजपच गंभीर दिसते आणि अन्य पक्ष मतांसाठी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे वनवासी अस्मिता आणि अस्तित्व वाचवण्याच्या या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आपण भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगणारे चंपाई सोरेन अर्थात ‘कोल्हान टायगर’ची डरकाळी ‘झामुमो’ला किती घायाळ करणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
झारखंडमध्ये माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या राजकीय खेळीमुळे दिल्लीपासून रांचीपर्यंत मागील काही दिवस सस्पेंस चांगलाच वाढला होता. गेल्या आठवड्यात दिल्ली आणि रांचीमध्ये केवळ चंपाई सोरेन यांचीच चर्चा सुरू होती. ‘झारखंड मुक्ती मोर्चा’ (झामुमो) वर नाराज असलेल्या चंपाईंचे पुढचे पाऊल काय असेल, यावर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर, चंपाई सोरेन सोमवारी दिल्लीत दाखल झाले आणि पुन्हा तर्कवितर्कांना जोर चढला. कारण, चंपाई सोरेन यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेतेे अर्जुन मुंडा, आजसुप्रमुख सुदेश महतो, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांचा समावेश होता. या सर्व नेत्यांनी केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि अखेर ३० ऑगस्ट रोजी म्हणजे आज चंपाई सोरेन रांची येथे भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत. हा सत्ताधारी ‘झामुमो’ आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासाठी मोठा धक्का ठरणार आहे. कारण, येत्या दोन ते तीन महिन्यांत झारखंडमध्येही विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी ‘झामुमो’ हा धक्का कसा पचविणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
 
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागलेल्या हेमंत सोरेन यांनी चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री केले होते. मात्र, ज्यावेळी हेमंत सोरेन तुरुंगातून बाहेर आले, त्यावेळी चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. तेव्हापासूनच चंपाई सोरेन हे नाराज होते आणि त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे मांडलीही होती. मात्र, हेमंत सोरेन यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर चंपाई सोरेन यांनी प्रथम राजकारणातून निवृत्ती जाहीर करण्याची घोषणाही केली होती. परिणामी, हेमंत सोरेन यांनीदेखील चंपाई यांच्या बंडाकडे लक्ष न देण्याचेच धोरण ठेवले होते. त्याचवेळी चंपाई यांनी राज्यभरातील आपल्या समर्थकांना भेटण्यासाठी राजकीय यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने त्यांनी झारखंडमधील सरायकेलाला भेट दिली आणि यावेळी त्यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचालीचे संकेत दिले. लोकांना संबोधित करताना चंपाई सोरेन म्हणाले की, “मी एक नवीन अध्याय सुरू करणार आहे, तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे आमचे मन अधिक घट्ट झाले आहे.
 
काही दिवसांत आम्ही एक संघटना स्थापन करणार आहोत, एका नवीन मित्रासोबत. झारखंडला सन्मान मिळावा, यासाठी आम्ही सर्वजण काम करू,” असे त्यांनी घोषित केले होते. त्याचवेळी दुसरीकडे भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने चंपाई सोरेन यांच्या बंडाचे आणि राज्यातील परिस्थितीचे सखोल विश्लेषण सुरू ठेवले होते. चंपाई यांना भाजपमध्ये सामील करुन घेतल्यास, राज्यातील वनवासी समुदायाची मते भाजपकडे वळण्यास लाभ होईल, असा निष्कर्ष निघाला. कारण, यापूर्वी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हान भागातील १४ जागांपैकी भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळेच यावेळी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ‘कोल्हान टायगर’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या चंपाई सोरेन यांना आपल्याकडे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंडचे प्रभारी हिमंता बिस्व सरमा यांच्याकडे चंपाई सोरेन यांना भाजपमध्ये आणण्याची जबाबदारी देण्यात आली होती. सरमा यांनी दोन दिवस रांची येथे चंपाई सोरेन आणि झारखंड भाजप अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांच्याशी सखोल चर्चा केली. यादरम्यान, चंपाई सोरेन यांच्या चिंता आणि अपेक्षा समजून घेण्यात आल्या आणि एकमत बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
 
रांचीहून परतल्यानंतर चंपाई सोरेन यांनी थेट दिल्ली गाठली, जेथे आसामचे मुख्यमंत्री आधीच उपस्थित होते. पुन्हा एकदा दिल्लीत चंपाई सोरेन आणि सरमा यांच्यात बैठक झाली, ज्यामध्ये गृहमंत्री अमित शाहदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर चंपाई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. कोल्हानच्या विधानसभा मतदारसंघामध्ये चंपाई सोरेन यांची चांगली पकड आहे. विशेषत: पोटका, घाटशिला आणि बहरगोरा, इचगढ, सेराईकेला-खरसावन आणि पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांत त्यांची मोठी मतपेढी आहे आणि ते स्वबळावर निकाल बदलू शकतात. कोल्हानच्या जिन घाटशिला, बहरगोरा, पोटका आणि इचगढ या प्रदेशांवरही चंपाई यांची पकड आहे. गेल्या काही निवडणुकांपासून या जागांवर विजय-पराजयाचा फरक १० ते २० हजार मतांचा आहे. अशा स्थितीत चंपाई येथे भाजपला विजय मिळवून देऊ शकतात. कारण, येथे भाजपच्या उमेदवारांना अनेक ठिकाणी अतिशय कमी अंतराने पराभव पत्करावा लागला होता.
 
अर्थात, चंपाई सोरेन यांना भाजपमध्ये घेण्यास राज्यातील नेते आणि प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी आणि माजी केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा हे फारसे तयार नसल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, भाजप नेतृत्वाने बाबुलाल मरांडी यांना दिल्लीत बोलवून घेतले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर, बाबुलाल मरांडी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीनंतरच बाबुलाल मरांडी यांनी चंपाई सोरेन यांचे भाजपमध्ये स्वागत करण्याबाबत निवेदन जारी केले. ज्येष्ठ नेते अर्जुन मुंडा यांनीदेखील चंपाई सोरेन यांच्या भाजप प्रवेशाचे स्वागत केले. सत्तेच्या लालसेपोटी एका वनवासी नेत्यास मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आले आहे. देशभरातील वनवासींना धोरण आणि तत्त्वांसह संघटित करण्याच्या या मोठ्या पावलांचा एक भाग म्हणून चंपाई सोरेन यांचा भाजपमध्ये प्रवेश हे एक चांगले चिन्ह आहे, असे मुंडा यांनी म्हटले. त्यामुळे आज रांची येथे होणार्‍या कार्यक्रमात बाबुलाल मरांडी, अर्जुन मुंडा आणि चंपाई सोरेन यांच्याद्वारे झारखंडमधील वनवासी समुदायापुढे भाजप हाच एकमेव योग्य पर्याय असल्याचा संदेश भाजप देणार आहे.
  
झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोरीची समस्या निर्माण झाली आहे. प्रामुख्याने, संथाल परगण्यामध्ये वनवासींच्या जमिनी हडप करणे, त्यांच्या संपत्तीवर दावे करणे, विवाहाद्वारे फसवणूक करणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मुस्लिमांच्या अचानक वाढलेल्या लोकसंख्येविषयी न्यायालयानेही हेमंत सोरेन सरकारला प्रश्न विचारले आहेत. अर्थात, सत्ताधारी ‘झारखंड मुक्ती मोर्चा’ने या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचेच धोरण ठेवले आहे. चंपाई सोरेन अल्पकाळासाठी मुख्यमंत्री होते, तेव्हा ते देखील पक्षाची भूमिका म्हणून संथाल परगणा येथील बांगलादेशी घुसखोरीची समस्या नाकारत होते.
 
 
मात्र, भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने या विषयावरचे त्यांचे मतही बदलले आहे. चंपाई सोरेन यांनी मंगळवारी सांगितले की, ’‘बाबा तिलका मांझी आणि सिदो-कान्हू यांची पवित्र भूमी असलेल्या संथाल परगण्यामध्ये आज बांगलादेशी घुसखोरीची मोठी समस्या बनली आहे. ज्या वीरांनी जल, जंगल, जमीन या लढाईत इंग्रजांची गुलामगिरी कधीच मान्य केली नाही, त्यांच्याच वंशजांच्या जमिनींवर आज घुसखोर कब्जा करत आहेत. त्यामुळे फुलो, झन्नोसारख्या धाडसी महिलांना आदर्श मानणार्‍या आपल्या माता, बहिणी आणि मुलींची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे.
आदिवासी आणि आदिवासींचे झपाट्याने आर्थिक व सामाजिक नुकसान करणार्‍या या घुसखोरांना आळा घातला नाही; तर संथाल परगण्यातील आपल्या समाजाचे अस्तित्व धोक्यात येईल. पाकूर, राजमहल आणि इतर अनेक भागांत त्यांची संख्या वनवासींपेक्षा जास्त आहे.” त्यामुळे या परिस्थितीचे राजकारण न करता सामाजिक चळवळीद्वारे वनवासींचे अस्तित्व वाचविणे आवश्यक असल्याचे चंपाई यांनी म्हटले आहे. चंपाई सोरेन यांची ही भूमिका राज्यातील अनेकांना भावणारी ठरणार आहे. अर्थात, अन्य पक्षांतील नेत्यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर जुन्या आणि नव्यांचा समतोल नेमकेपणाने राहावा; याचीही काळजी भाजपला घ्यावी लागणार आहे.