विवाहसंस्थेचे प्रयोग...

    29-Aug-2024   
Total Views |

Japan Is Offering Single Women Financial Support To Relocate From Tokyo For Marriage
 
जपान सरकारने ज्या अविवाहित महिला शहर सोडून गावी स्थायिक झाल्या, त्यांना ७० हजार डॉलर म्हणजे ५.८७ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने जपानच्या ग्रामीण भागातील महिला शहरात दाखल होतात. मात्र, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी त्या शहरातच स्थायिक होतात. त्या गावी परतत नाहीत. त्यामुळे शहरातील अविवाहित महिलांची संख्या वाढली आहे, तर दुसरीकडे गावातल्या आणि आजूबाजूच्या गावातल्या मुलीच शहरात गेल्याने ग्रामीण भागात अविवाहित पुरुषांची संख्या वाढली. तेव्हा, शहरातील या मूळच्या गावकडच्या महिला पुन्हा त्यांच्या गावी परतल्यास, त्यांचा विवाह या अविवाहित पुरुषांसोबत होऊ शकतो. त्यामुळे जन्मदरही वाढेल, असे जपान सरकारला वाटते.
 
जपानमध्ये मूल जन्माला घालण्याचे प्रमाण कमालीचे घटले आहे. दुसरीकडे उच्च राहणीमान, आधुनिक वैद्यकीय सेवा यामुळे जपानी माणसाचा मृत्युदर कमी झाला आहे. त्यांची जीवनवर्षे वाढली आहेत. यामुळे जपानमध्ये लहान बालक किंवा युवांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढली आहे. जपान हा वृद्धांचा देश म्हणूनच आता ओळखला जातो. त्यामुळे देशात जन्मदर वाढावा, यासाठी तेथील सरकारचे सर्वोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, स्त्री आणि पुरुष यांचा विवाह होऊन जन्माला आलेले मूल हेच जपानमध्येही स्वीकारार्ह आहे. त्यामुळे मुलांचा जन्मदर सुधारायचा तर जपानमध्ये विवाहाचा दरही वाढायला हवा आणि नेमके हेच जपानमध्ये होताना दिसत नाही.
  
जपानच्या २०२० सालच्या राष्ट्रीय जनगणनेनुसार, टोकियो सोडून जपानच्या ४७ प्रांतांपैकी ४६ प्रांतांमध्ये १५ ते ४९ वर्षांच्या तब्बल ९.१ दशलक्ष एकल महिला होत्या, तर याच वयोगटातील ११.१ दशलक्ष एकल पुरुष होते. हे सगळे अविवाहित स्त्री-पुरुष. ते मुलांना जन्मही देणार नव्हते. जपानच्या कॅबिनेट ऑफिस २०२२च्या लिंग अहवालानुसार जपानच्या, एक चतुर्थांश युवक-युवतींनी विवाह करणार नाही, असे ठामपणे सांगितले होते. विवाह न केल्याने साहजिकच जन्मदरही घटणार होता. या सगळ्यांचा विचार करता, जपान सरकारद्वारे विवाह जुळवण्यासाठी सरकारी अ‍ॅपही निर्माण करण्यात आले. यात नोंदणी झालेल्यांचा विवाह जुळवणे, त्यासाठी एकमेकांना पूरक साथीदार शोधणे, ही कामेही आता सरकारच करणार आहे. सरकारला वाटते की, यामुळे नागरिकांचा विवाह करण्याकडे कल वाढेल.
 
 
पण, जपानमधील बहुसंख्य लोक विवाह का नाकारतात? तर, त्यांना वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सुखासाठी कोणत्याही प्रकारची जबाबदारी नको आहे. त्यासाठी ते वेगवेगळे प्रयोग करतात. जसे ‘सेपरेशन’ किंवा ‘वीकएंड मॅरेज’ ही संकल्पना जपानमध्ये लोकप्रिय आहे. यामध्ये स्त्री-पुरुष विवाह करतात. मात्र, एकत्र राहत नाहीत. पती-पत्नी स्वतःचा खर्च स्वतःच करतात. ‘सेपरेशन मॅरेज’मधले दाम्पत्य आठवड्याच्या शेवटी किंवा सहसंमतीने कधीतरी भेटतात. असे भेटल्याने वैवाहिक नात्याचा कंटाळा येत नाही, असे त्यांचे मत. या नात्यात मूल झाले तर ते आईकडे राहणार आणि पती-पत्नी मुलासाठी समान खर्च करणार. अशा खर्चापासून वाचण्यासाठीही लोक मूल होऊ देत नाहीत. दुसरा विवाह म्हणजे मैत्रीविवाह. यामध्ये समान विचारांचे स्त्री-पुरुष भावनिकरीत्या एकत्र येतात. हे स्त्री-पुरुष दुसर्‍या कुणाशीही लैंगिक संबंध ठेवू शकतात. या दरम्यान मैत्रीविवाह केलेल्या स्त्री-पुरुषांना वाटले तरच ते एकमेकांशी विवाह करतात.
 
 
मैत्रीविवाह आयोजित करणार्‍या अनेक संस्थाही जपानमध्ये आहेत. कहर म्हणजे विवाह न करता विवाहसमयी नवर्‍या मुलास किंवा नवरी मुलीस कसे वाटेल, याचा अनुभव देण्यासाठी विवाहसमारंभ आयोजित करणार्‍या संस्थाही जपानमध्ये आहेत. या संस्था केवळ विवाहाचा समारंभ आयोजित करतात. यामध्ये खर्‍या विवाहासारखे सगळे सोपस्कार केले जातात. मात्र, या विवाहात नवरा किंवा नवरी एकटेच असतात. कारण, यात त्यांना विवाह समारंभाचा अनुभव घ्यायचा असतो. खराखुरा विवाह करायचा नसतो. तर, अशा प्रकारे जपानमध्ये विवाह संकल्पनेचे काहीबाही रूपांतरण झालेले. या सगळ्या परिक्षेपात जपान सरकार मात्र देशातला विवाहदर आणि त्याद्वारे जन्मदर वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. वृद्ध जपानला तरुण व्हायचे आहे, पण त्यासाठी लोकांनी विवाह तर केले पाहिजेत. वैयक्तिकपेक्षा कौटुंबिक आणि सामाजिक बंध तर पाळले पाहिजेत.
 
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.