आनंदी समाजाच्या कल्याणासाठी...

    27-Aug-2024   
Total Views |
anand kalyankari samajik sanstha


दुसर्‍यांना आनंद देण्याने स्वतःच्या आयुष्यात तो पुन्हा दुपटीने परत येतो, असे म्हटले जाते. आनंद देण्या-घेण्याची ही गंगा अखंडपणे प्रवाहित राहावी म्हणून असंख्य सेवाभावी लोक आणि संस्था आपापल्या परीने समाजासाठी कार्य करीत असतात, अशा प्रयत्नांमध्ये समाजासाठी खारीचा वाटा उचलणारी संस्था म्हणजेच डोंबिवली येथील ‘आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था’ या संस्थेच्या आजवरच्या वाटचालीवर टाकलेला हा प्रकाशझोत...

शैक्षणिक क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणारे, आजवर अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार व कलाटणी देणार्‍या हेमंत आनंदा नेहेते यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ समाजाच्या कल्याणासाठी सन 2011 मध्ये ‘आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थे’ची मुहूर्तमेढ रोवली. या समाजोपयोगी कार्यासाठी भोजराज हरी नेहेते, ‘न्यायिक लढा’चे अभिजित तुपदाळे, ‘ज्ञानदीप विद्यामंदिर मुंब्रा’च्या संस्थापिका कै. छाया चंद्रकांत देसाई यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून संस्थेच्या कार्यास सुरुवात झाली.

सर्वात आधी संस्थेने का व कुणासाठी काम करावे या दोन प्रश्नांवर मंथन केले, तेव्हा विविध घटक, उपक्रमांची आखणी, नियोजन आणि प्रत्यक्ष कृतीवर भर देण्यात आला. महिला, विद्यार्थी, सर्वसामान्य माणूस आणि अशा अनेक घटकांसाठी संस्थेने कार्य सुरू केले. महिला या प्रत्येक कुटुंबाचा मजबूत पाया असतात. म्हणून, त्यांना सर्वांगीण दृष्टीने सक्षम आणि समृद्ध केले तर अर्ध्याहून अधिक समस्या सहज सुटू शकतात. या दृष्टिकोनातून महिलांना व्यवसायविषयक मार्गदर्शन, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यावर भर दिला आणि एक वेगळा प्रयोग समाजात सकारात्मक बदल घेऊन आला.

त्याचप्रमाणे विविध वृद्धाश्रमांतील महिलांना औषधेवाटप, सानेपाली, खर्डी, मामणोली, मुरबाड, सरळगाव, पाड्यांवरील आदिवासी महिलांना साडी-चोळी-वाटप, दिवाळीला फराळवाटप, बेघर निवारा केंद्र, महिन्यात एक दिवस जेवण, नाश्ता, मायेची चादर या नावाने कपडेवाटप तसेच थंडीत चादरीवाटपसारखे उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात आले. मासिकपाळी आणि त्याविषयीचे गैरसमज आणि त्यातून निर्माण होणार्‍या आरोग्यसमस्या लक्षात घेता संस्थेतर्फे परिवर्तन संस्था, टिटवाळा येथील महिलांना सॅनिटरी पॅड्सचे वाटप करण्यात आले. विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शैक्षणिक प्रवाहात त्यांना टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थिनींना रंगपेटी, पेन्सिल, वह्या व ग्रंथालयांसाठी पुस्तके, 50 शाळांमध्ये 5000 पुस्तके वाटप असे नानाविध उपक्रम राबविण्यात येत असतात.
 
आज समाजाच्या विविध घटकांच्या सामूहिक प्रयत्नांतून स्त्रियांच्या विविध समस्यांवर समाजकार्ये होत आहेत. ‘स्त्रीभ्रूण’ हा अशा उपक्रमांपैकीच एक आहे. संस्थेने ’कन्यारत्न पुरस्कार’, ‘मुलगी वाचवा, स्त्रीभ्रूण वाचवा’ यासारखे उपक्रम राबवून या योजनेंतर्गत संस्थेतर्फे नेहेते यांनी आजवर 7500 मातांचा सत्कार केलेला आहे. ज्या मातांना एकच मुलगी किंवा फक्त मुलीच आहेत किंवा ज्यांनी प्रचंड हौसेने कन्याच दत्तक घेतली आहे, अशा मातांचा सत्कार-सन्मान संस्था गेल्या 11 वर्षांपासून करीत आहे. संस्थेचे हे कार्य अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे.

आजचा विद्यार्थी हा उद्याच्या भारताचा नागरिक आहे. म्हणून, त्यांना व्यवस्थित आकार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी देखील संस्था विविध उपक्रमांचे नेहमीच आयोजन करीत असते. संस्थेने दि.5 मे 2014 रोजी केलेल्या बालजल्लोषचे आयोजन हे देखील अनोखे आणि अविस्मरणीच म्हणावे लागेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ट्रेकिंग, समर कॅम्प, चित्रकला प्रदर्शन तसेच दिवाळीत दिवाळी अंक स्पर्धा, उत्कृष्ट लेखन पुरस्कार, कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन स्पर्धा, अशा अनेक स्पर्धांचे आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. नेहेते अनेक विद्यार्थ्यांना याचा आनंद प्राप्त करून देतात आणि स्वतःही तो आनंद लुटतात. म्हणूनच, तर ते विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. डोंबिवली येथील, अस्तित्व संस्थेतील मूकबधिर विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांची परिस्थिती, त्यांचे अध्ययन, प्रशिक्षण या सर्वांविषयीची सखोल माहिती देण्याकरिता, नेहेते यांनी आपल्या विद्यार्थ्यांना या संस्थेच्या भेटीला नेले होते आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात अशा विद्यार्थ्यांच्या जीवनाबद्दल करुणा आणि प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आजवर अनेक वेळा मराठी भाषा दिन, पावसाळी कविता असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना नवनवीन ज्ञान, अनुभव आणि भाषा विषयाची गोडी, याविषयी आनंद दिला आहे.

’वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे विद्यार्थी आणि एकूणच समाजातील विविध घटकांमध्ये वाचन रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज ओळखून संस्थेने त्या अंगानेदेखील उपक्रम राबविले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ’विनामूल्य पुस्तके वाटप करणे हा उपक्रम होय. संस्थेने आजवर 100 शाळांना हजारो पुस्तके भेट देण्याचं कार्य केलेले आहे. एकता वाचनालय सुरू करून, एकता मित्र मंडळ ग्रुप कल्याण, आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था, अशा संस्थांसाठी, संस्थेने पुस्तके भेट आणि वाचनालय यावर विशेष भर दिला आहे. त्याच्यामध्ये 150 वाचक सहभागी झाले होते आणि सुमारे 700 हून अधिक पुस्तकांचे आदानप्रदान झाले होते. 50 हून अधिक जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा, विविध ग्रंथालयांना सुमारे 50 हजार रुपयांची पुस्तके भेट देण्याचे खरेच जे महान असे कार्य करण्यासाठी खूप साहस आणि संयम असावा लागतो. हे अनोखे कार्य नेहेते यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे केलेले आहे.

डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून डोंबिवलीतील 50 शाळांना त्यांनी 11111 रुपयांची पुस्तके भेट दिली. तसेच भुसावळ येथील शाळांना आणि ठाणे परिसरातील 55 शाळांना अशी पुस्तके भेट देण्याचे त्यांनी कार्य केलेले आहे. त्याची नोंद भारत बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. सांगली येथे प्रचंड पूर आला आणि सांगली वाचनालयाचे त्याच वर्षी शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष असताना हे वाचनालय उद्ध्वस्त झाले, याची एक अत्यंत सतर्क वाचक म्हणून त्यांनी घेतलेली दखलही खरेच गौरवास्पद आहे. ‘आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था डोंबिवली’तर्फे 125 कथा, कविता आणि प्रवासवर्णने, अशी अनमोल भेट देऊन, एक माणूस म्हणून मोठा कार्यभाग त्यांनी उचलला. आजवर संस्थेतर्फे 400 शाळा, ग्रंथालये, आश्रमशाळा यांना ग्रंथभेट देण्यात आले आहे. हे मौलिक कार्य आहे. नेहेते याबाबत मोठ्या उमेदिने म्हणतात की ”हे नव्या जगाचे, नव्या युगाचे, प्रकाशगाणे गाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती”, हे निखळ सत्य आहे. नेहते यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांना, अत्यंत सुयोग्य मार्गदर्शन करून, त्यांच्याकडून अनेक वैज्ञानिक उपकरणे तयार करून घेतली आणि ती जिल्हा, राज्य, केंद्र स्तरावरच्या विज्ञान प्रदर्शनांमध्ये सादर केली. विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर डेमॉन्स्ट्रेशन केले आणि या सगळ्या त्यांच्या धडपडीला विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके, शाळेला प्रशस्तीपत्रके आणि नेहेते ही सन्मानपत्रे देऊन गौरवान्वित करण्यात आले आहे.

अनोखे प्रायोगिक आणि सर्जनशील उपक्रम विद्यार्थ्यांकडून राबवून घेणे हे देखील संस्थेचे एक वैशिष्ट्य आहे. संस्थेने नेहेते यांच्या मार्गदर्शनातून आणि नेतृत्वातून एक विश्वविक्रमी उपक्रम आपल्या नावे केला. दि.18 एप्रिल ते दि. 21 एप्रिल 2019 या कालावधीत त्यांनी 85 तास सलग विश्वविक्रमी कवितावाचनाचा अनोखा उपक्रम आयोजित केला होता. हे वर्ष ग.दि.मां.चे जन्मशताब्दी वर्ष होते. ज्ञानपीठविजेते विंदांची 101वी जयंती आणि पुलंचे जन्मशताब्दी वर्ष, असा अत्यंत अलभ्य सुयोग जमून आला होता. या शुभमुहूर्तावर सुंदर सादरीकरण करण्यासाठी, सलग तीन दिवस 85 तास विश्वविक्रमी काव्यवाचन, संकल्प इंग्लिश स्कूल ठाणेच्या शाळेमध्ये आयोजित केले होते. या कविता वाचनात तब्बल 1075 कवी सहभागी झाले होते. 41 सत्रं, 41 सूत्रसंचालक तसेच भव्य पुस्तक प्रदर्शन, भव्य चर्चा, परिसंवाद, या सगळ्यांची विशेष नोंद, ’भारत बुक ऑफ रेकॉर्ड आणि ओ.एम.जी. बुक ऑफ रेकॉर्ड तसेच इन्फिटा बुक ऑफ रेकॉर्ड, आसाम बुक ऑफ रेकॉर्ड, डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड या सर्वांनी घेतली आहे. या गोष्टीचा अतिशय अभिमान व आनंद वाटतो आणि हे सर्व श्रेय अखिल भारतीय कला क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान ठाणे, आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था डोंबिवली, अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान कल्याण यांच्याकडे जाते. अशा अत्यंत कार्यदक्ष, साहित्यप्रेमी आणि चांगल्या गोष्टीला पाठिंबा देणार्‍या सुहृदांच्या प्रेमळ सहवासात, नेहेतेंच्या आयुष्याचा अत्यंत उज्ज्वल काळ आणखी उज्ज्वल ठरत आहे. त्यासाठी त्यांना भरपूर शुभेच्छा.

9321658571