मनी नाही भाव...

    26-Aug-2024   
Total Views |
rahul gandhi statement on miss india partcipants


‘मिस इंडिया’ स्पर्धेतही जातीवाद आणून राहुल गांधी यांनी अकलेचे तारे तोडलेच म्हणा. परंतु, त्यांचे तारे तोडण्याची सवय काही जात नाही. राहुल गांधी सोशल मीडियावरदेखील अशाच पद्धतीने खोडसाळपणा करत असतात. त्यांच्या याच खोडसाळपणावर सोशल मीडियात त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अनेक जण राहुल यांच्या जुन्या पोस्टचे फोटो शेअर करून राहुल संसदेत गोंधळ घालत देवाचे चित्र दाखवतात. मात्र, सोशल मीडियावर हिंदू सणांच्या शुभेच्छा देताना देवाचे फोटो मात्र टाळतात, असा आरोप त्यांच्यावर केला गेला. हिंदू धर्मात अनेक शतकांपासून मूर्तिपूजेला महत्त्व आहे. सनातनला मानणारे लोक पूजेच्या वेळी देवाच्या मूर्तीसमोर पूजा करतात. कोणत्याही देवतेचे नाव आठवले तर प्रथम त्यांची प्रतिमा आपल्या मनात तयार होईल. हिंदू धर्मावरील श्रद्धेमुळेच हे घडते. अनेकजणांचा मूर्ती आणि मूर्तिपूजेला आक्षेप असतो आणि म्हणूनच ते सणाच्या शुभेच्छा देताना अनेकदा परमेश्वराचे रूप सांगणे टाळतात. असे लोकं प्रत्येक समाजातील लोकांना प्रत्येक सणाला शुभेच्छा देतात, पण हिंदू धर्मातील सणांवर शुभेच्छा देताना त्यांची शैली वेगळीच. अशीच शैली राहुल यांची असल्याचे त्यांच्या मागील काही सोशल मीडियावरील पोस्टवरून दिसून येते. श्रीकृष्ण जयंतीच्या राहुल गांधींच्या पोस्टमध्ये श्रीकृष्णाचे चित्र कुठेही दिसत नाही. राहुल गांधींच्या सोशल मीडिया पोस्टमधून देवाच्या मूर्ती गायब होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. हा क्रम खूप आधीचा. राहुल गांधी महाशिवरात्रीनिमित्त कैलास पर्वताचे चित्र लावतात, पण शिवलिंगाचे नाही. जगन्नाथ यात्रेदरम्यान ते मंदिराच्या शिखराचे फोटो लावून शुभेच्छा देतात, पण रथाचा फोटो किंवा भगवान जगन्नाथाचा फोटो लावू शकत नाहीत. त्याचप्रमाणे गणेश चतुर्थीच्या दिवशी राहुल मोदक, भोग, अगरबत्तीचे फोटो टाकतात, परंतु पोस्टमध्ये श्रीगणेशाचा फोटो कुठेही नाही. श्रीरामनवमीच्या शुभेच्छा देतानाही श्रीरामाच्या चित्राचे मात्र त्यांना वावडे. याशिवाय दिवाळीच्या दिवशी राहुल गांधींनी चित्राशिवाय शुभेच्छा दिल्या. यामागे इतर समाजांना स्वतःकडे आकर्षित करण्याचा आणि स्वतःला धर्मनिरपेक्ष उदारमतवादी दाखवण्याचाच त्यांचा प्रयत्न लपून राहिलेले नाही. संसदेत देवाचे चित्र चालते, मात्र सोशल मीडियावरील पोस्टमध्ये ते चालत नाही. हाच आहे राहुल गांधींचा दुटप्पीपणा!

देवा मला पाव...


शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना आता अचानक देवधर्माविषयी कळवळा यायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीतर्फे नुकत्याच आयोजित वारकरी संमेलनामध्ये त्यांनी देवदर्शनाचा गाजावाजा करत नसल्याचा दावा केला. “चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालणार्‍या लोकांना संप्रदायाने दूर ठेवले पाहिजे. पंढरीच्या पांडुरंगाचे मीही दर्शन घेतो, फक्त दर्शन घेताना मी त्याचा गाजावाजा करत नाही,” असे यावेळी शरद पवार यांनी म्हटले. परंतु, प्रत्यक्षात मात्र पवार किती गाजावाजा करतात, हे सर्वश्रुत आहे. मुळात पवार स्वतःला नास्तिक असल्याचे सांगतात. अनेकदा त्याप्रमाणे त्यांची कृतीदेखील असते. मात्र, ती इतकी विपरीत असते की त्यावरूनही नवा वाद निर्माण होतो. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नवीन ‘तुतारी’ चिन्ह मिळाल्यानंतर या नवीन चिन्हाचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्यावरुन करण्यात आले. विशेष म्हणजे, रायगडाचे वावडे असणार्‍या पवारांनी चक्क आधी रोपवे आणि त्यानंतर एका पालखीत बसून रायगड गाठला होता. यानंतर अनेक चर्चांना उधाण आले. त्यामुळे शरद पवारांनी रायगडावरील या कार्यक्रमाचा नको तितका गाजावाजा केलाच की! रायगडावर न जाणारे शरद पवार अचानक रायगडावर गेल्याने त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांनी रायगडाचासुद्धा राजकारणासाठी वापर केला. 2022 साली शरद पवार पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरामध्ये गेले, मात्र ते यावेळी दगडूशेठचे दर्शन न घेताच दारातूनच माघारी फिरले. यावरून बराच वादंग निर्माण झाला होता. अखेर नंतर समोर आले की, शरद पवारांनी मांसाहार केल्याने त्यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणे टाळले आणि त्यामुळे ते मंदिराच्या दारातूनच माघारी फिरले. परंतु, जर मांसाहार केला असेल, तर मग शरद पवारांनी मंदिराच्या दारात तरी का जावे? मात्र, आता ‘मी गाजावाजा करत नाही’ असे ठणकावून सांगणार्‍या पवारांनी त्यावेळी मात्र चांगलाच गाजावाजा केला. मंदिरात न जाता पुढील गोंधळ आणि वाद टाळणे अगदी सहज शक्य होते. मात्र, पवारांनी तसे केले नाही. त्यामुळे पवार कितीही म्हटले तरीही त्यांचा हा दावा किती खोटा आहे, हे दगडूशेठच्या उदाहरणावरून स्पष्ट होते.


पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.