करंजा बंदरावर आढळला शेपूट नसलेला पापलेट; 'या' कारणांमुळे झाले राज्यमाशाच्या शरीरात बदल

    26-Aug-2024   
Total Views |
sliver pomfret



मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्राचा राज्यमासा असणाऱ्या 'चंदेरी पापलेट'चे (silver pomfret) एक वेगळे रुप उरण तालुक्यातील करंजा बंदरावर पाहायला मिळाले. याठिकाणी शेपूट नसलेला पापलेट (silver pomfret) मच्छीमारांच्या जाळ्यात सापडला. पापलेटच्या शरीरात झालेल्या या बदलामागे प्रामुख्याने जन्मत: शारीरिक बदल किंवा शिकाऱ्यांचा हल्ला, अशी कारणे असण्याची शक्यता सागरी जीवशास्त्रज्ञांनी वर्तवली आहेत. (silver pomfret)

गेल्यावर्षी पापलेट या माशाला महाराष्ट्र राज्याचा राज्यमासा म्हणून घोषित करण्यात आले होते. सरंगा, पापलटे किंवा पाॅम्फ्रेट नावाने प्रसिद्ध असलेला हा मासा चवील उत्तम असतो. याचे शरीर उभट, दोन्ही बाजूने चपटे व गोलकार असून ते छोट्या चंदेरी खवल्यांनी आच्छादलेले असते. मात्र, उरण तालुक्यात मच्छीमारांना शेपूट नसलेला पापलेट सापडला. रविवारी करंजा बंदरावर शेपूट नसलेला पापलेट विक्रीसाठी आल्याची माहिती 'करंजा हार्बर मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्थे'चे सचिव करण कोळी यांंनी दिली. पापलेटच्या शरीरात झालेल्या या बदलांना प्रामुख्याने दोन कारणे कारणीभूत असल्याची शक्यता सागरी जीवाशास्त्रज्ञ स्वप्निल तांडेल यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना व्यक्त केली आहे. तांडेल यांनी सांगितले की, "माशांमध्ये विभिन्न प्रकारच्या विकृती आढळतात जसे की, हाडांची विकृती, कण्याच्या विकृती, पंखांच्या विकृती (शेपूट, पंखांचा अभाव), जबड्याच्या विकृती, रंगातील असामान्यत (दोन्ही बाजूला असमान रंग, वर्णसफेदी, पिवळसरता). या विकृतीसाठी झेनोबायोटिक, पर्यावरणीय, पोषण, शारीरिक आणि आनुवंशिक अशा अनेक कारणे कारणीभूत असतात. तसेच या पापलेटवर शिकारी माशांनी केलेल्या हल्ल्यांच्या प्रयत्नांमुळे त्याच्या शरीरात ही विकृती निर्माण झाल्याची शक्यता आहे." पापलेट आपल्या शेपटीचा वापर हे पाण्यात पोहोण्यासाठी आणि प्रामुख्याने पोहताना दिशा बदलण्यासाठी करतात. 

गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर विपुल प्रमाणात पापलेट मासा सापडतो. या माशाचा मासेमारीचा हंगाम दिवाळीनंतर सुरू होता आणि डिसेंबरपर्यंत टिकतो. या माशाचा अंडी देण्याचा काळ नोव्हेंबर ते फेब्रुवारी असून पिल्ले (कावळी-भीले) एप्रिल-मे महिन्यात जन्मास येतात. अतोनात मासेमारी आणि पिल्लांची बेसुमार मरतुक यामुळे हा मासा आता संकटात सापडलेला आहे. साधारणपणे १४ सेंटीमीटर आकारापेक्षा जास्त मोठे असलेले पापलेट माशाने त्याच्या जीवन चक्रात एकदा प्रजनन केलेले असते. त्यामुळेच, १४ सेंटीमीटरच्यावर वाढ झालेले पापलेट पकडणे योग्य आहे. २०२२ साली राज्यातील पापलेटची मासेमारी १,८०१ टन होती, जी २०२३ साली २,४६९ टन झाली आहे. हीच मासेमारी २०१८ साली ३,९०१ टन होती.


अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.