कर्नाटक सरकारचा आणखी एक भूखंड घोटाळा!

    26-Aug-2024   
Total Views |
karnataka government land scam


जिंदाल कंपनीसमवेत केलेले करार आणि अन्य जमीन व्यवहार यामुळे कर्नाटक सरकार विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य झाले आहे. भाजप आणि अन्य विरोधी पक्ष या मुद्द्यांवरून सिद्धरामय्या सरकारला घेरण्याची तयारी करीत आहेत. हे सर्व पाहता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे भवितव्य अधांतरी असल्याचे दिसून येत आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर ‘मुदा’ घोटाळ्याप्रकरणी खटला भरण्यास राज्यपालांनी अनुमती दिली असतानाच, त्या राज्यातील आणखी एक घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. कर्नाटक सरकारने आपल्या ताब्यातील 3,666 एकर इतकी जमीन जिंदाल स्टील कंपनीला अगदी नाममात्र दरात विकल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. एका एकरास 50 लाख ते दीड कोटी रुपये इतका बाजारभाव सुरू असताना, कर्नाटक सरकारने फक्त एकरी 1.22 लाख रुपये इतक्या दराने ही जमीन सदर कंपनीला विकली. भारतीय जनता पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अन्य काही संघटनांनी या व्यवहारास तीव्र आक्षेप घेतला. कर्नाटक सरकारने अवघ्या 20 कोटी रुपयांना ही जमीन विकल्याचे पाहता, त्या राज्यात किती प्रचंड भ्रष्टाचार आहे, ते या निमित्ताने पुन्हा दिसून आले आहे.

कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अरविंद बेल्लाड यांनी, सध्याचे प्रशासन हे राज्याच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट प्रशासन असल्याचा आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमधील काँग्रेस सरकारची भ्रष्टाचाराची विविध प्रकरणे बाहेर येत आहेत. सिद्धरामय्या सरकारची ही भ्रष्टाचार प्रकरणे म्हणजे हिमनगाचे टोक असल्याचा आरोप बेल्लाड यांनी केला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे ‘मुदा घोटाळा’ प्रकरण चर्चेत असतानाच, हे नवे प्रकरण उजेडात आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एच. के. पाटील यांनी प्रारंभी या व्यवहारास विरोध केला होता. त्यांनीही आता त्याबद्दल सार्वजनिक चिंता व्यक्त केली आहे.

जिंदाल कंपनीस जी 3 हजार 666 एकर जमीन विकण्यात आली, ती बेल्लारी जिल्ह्यातील संदूर येथील आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आपल्या वडिलांची संपत्ती असल्याचे गृहीत धरून सरकारी मालमत्ता विकत आहेत. सार्वजनिक मालमत्ता एवढ्या कमी भावात विकण्याचा मुख्यमंत्र्यांना काहीएक अधिकार नाही, अशी टीका बेल्लाड यांनी केली. आपली मुख्यमंत्रिपदाची खुर्ची बळकट करण्याच्या हेतूने हा जमीन विक्रीचा निर्णय घेण्यात आल्याचे दिसते, असेही बेल्लाड यांनी म्हटले आहे. पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही ही जमीन इतक्या स्वस्तात विकत आहात का, असा प्रश्नही बेल्लाड यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाविरुद्ध आपला पक्ष न्यायालयात आणि जनतेच्या दरबारातही दाद मागेल, असे ते म्हणाले.

जिंदाल कंपनीसमवेत केलेले करार आणि अन्य जमीन व्यवहार यामुळे कर्नाटक सरकार विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य झाले आहे. या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचे आणि पडद्यामागे व्यवहार झाल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. त्यामुळे राज्याच्या नेतृत्वावर टीका होत आहे. भाजप आणि अन्य विरोधी पक्ष या मुद्द्यांवरून सिद्धरामय्या सरकारला घेरण्याची तयारी करीत आहेत. हे सर्व पाहता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे भवितव्य अधांतरी असल्याचे दिसून येत आहे.


नाल्यावर चर्च; ‘हिंदू मुन्नानी’ची कारवाईची मागणी

विविध राज्यांमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारक बेकायदेशीरपणे धर्मांतराचे कार्य करीत आहेत आणि त्यांना प्रतिबंध करण्यात अद्याप यश आलेले दिसत नाही. काही ठिकाणी प्रशासनातील अधिकारी, शासनकर्ते त्यांना छुपा आशीर्वाद देत असल्याचे दिसून येते. असेच एक प्रकरण तामिळनाडू राज्यात उघडकीस आले आहे. तामिळनाडूमधील मायीलदुथूराई जिल्ह्यात ‘हिंदू मुन्नानी’ या संघटनेने कुटलम तालुक्यातील बेकायदेशीर धर्मांतराविरुद्ध आवाज उठविला आहे. त्या तालुक्यातील एका गावात बेकायदेशीर चर्च उभारल्याची तक्रार करूनही तहसीलदार किंवा प्रांत यांच्याकडून काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी या नेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ‘हिंदू मुन्नानी’ संघटनेने केली आहे. ‘राष्ट्रीय हरित लवादा’चा आदेश डावलून एका नाल्यावर हे चर्च उभारण्यात येत आहे. त्यास या हिंदू संघटनेने आक्षेप घेतला आहे. पोलिसांनी प्रारंभी या तक्रारीची दखल घेतली होती, पण नंतर वरून दबाव आल्याने या प्रकरणी पुढील काही कारवाई केली नाही. त्यामुळे संबंधित तहसीलदार आणि प्रांत यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. एकेकाळी तामिळनाडूमधील मीनाक्षीपुरमचे धर्मांतर प्रकरण संपूर्ण देशात गाजले होते. त्यास बरीच वर्षे उलटून गेली असली तरी ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून बेकायदेशीर धर्मांतर करणे, बेकायदेशीर चर्चची उभारणी करणे, असे प्रकार घडतच आहेत. तामिळनाडूसारखी परिस्थिती देशाच्या अन्य भागांतही आहे. हिंदू समाज मोठ्या प्रमाणात जागृत झाल्यासच अशा घटनांना पायबंद असू शकतो, अन्यथा नाही.


हात तोडल्याप्रकरणी ‘एनआयए’कडून अटक

केरळ राज्यात 14 वर्षांपूर्वी, दि. 4 जुलै 2010 या दिवशी घडलेली एक भयानक घटना अद्याप अनेकांच्या स्मरणात आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये धार्मिक भावना दुखवणारा प्रश्न विचारल्यावरून टी. जे. जोसेफ नावाच्या प्राध्यापकाचे हात मुस्लीम अतिरेक्यांनी कायदा हातात घेऊन तालिबानी राजवटीप्रमाणे तोडून टाकले होते. मुवात्तुपुझा या गावात रविवारची प्रार्थना आटोपून सदर प्राध्यापक परतत असताना त्या प्राध्यापकावर हल्ला करून त्याचे हात तोडून टाकण्यात आले. या हल्ल्यामागील सूत्रधार सावद हा आतापर्यंत फरार होता. पण, जानेवारी 2024 मध्ये त्यास पोलिसांनी अटक केली. सध्या बंदी घालण्यात आलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने हा सर्व कट रचला होता. मुख्य सूत्रधारास अटक करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने आणखी एका इसमास अटक केली आहे. त्याचे नाव सफीर सी. असे असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधारास विविध ठिकाणी आश्रय देण्यामध्ये त्याचा सहभाग होता, अशी माहिती उघड झाली आहे. सफीरला गेल्या 22 ऑगस्ट रोजी थलासेरी न्यायालयाच्या आवारात अटक करण्यात आली. सफीर हाही ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा सक्रिय सदस्य होता. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चा कार्यकर्ता श्यामाप्रसाद याच्या हत्येमध्ये सफीरचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारास अटक करण्यात आल्यानंतर सफीर हा फरार होता. सफीर हा न्यायालयात येण्याची कुणकुण राष्ट्रीय तपास यंत्रणेला लागल्याने अखेर सापळा रचून त्यास अटक करण्यात आली. सफीर यास 20 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. केरळच्या पोलिसांकडून तपास प्रकरण ‘एनआयए’कडे सोपविण्यात आले. 14 वर्षांच्या नंतर या प्रकरणात गुंतलेल्या दोघांना अटक करण्यात आली. तालिबानी राजवटीप्रमाणे कायदा हाती घेऊन निवाडा करणार्‍या या प्रकरणात सहभागी झालेल्यांना कधी शासन होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.


टेक्सासमध्ये हनुमानाची सर्वात उंच मूर्ती

अमेरिकेतील टेक्सास राज्यात हनुमानाच्या सर्वात उंच मूर्तीचे अलीकडेच अनावरण करण्यात आले. हनुमानाच्या या मूर्तीची उंची 90 फूट आहे. हनुमानाची ही मूर्ती ब्रांझ धातूपासून तयार करण्यात आली आहे. हनुमानाच्या या मूर्तीस ‘स्टॅच्यू ऑफ युनियन’ म्हणून ओळखण्यात येत असून ही अमेरिकेतील सर्वात उंच अशी तिसरी प्रतिमा आहे. कित्येक मैल अंतरावरून या हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन होते. अमेरिकेच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात ही मूर्ती म्हणजे एक मैलाचा दगड ठरली असल्याचे प्रतिपादन या मूर्तीची उभारणी करणार्‍या आयोजकांनी म्हटले आहे. टेक्सासमधील शुगरलँड भागातील अष्टलक्ष्मी मंदिर परिसरात ही मूर्ती उभारण्यात आली आहे. या हनुमानाच्या मूर्तीमुळे आध्यात्मिक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल आणि मानसिक शांती आणि समाधान मिळेल, असे सांगण्यात आले आहे. अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा 151 फूट उंचीचा आहे, तर त्या खालोखाल फ्लोरिडामधील ड्रॅगनचा पुतळा 110 फूट इतक्या उंचीचा आहे. सामर्थ्य आणि आशा यांचे प्रतीक अशी ही हनुमानाची मूर्ती आहे, असे भाविकांना वाटत आहे. या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने गेल्या 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्टदरम्यान भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मूर्तीवर पवित्र जलाचा अभिषेक करण्यात आला. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली आणि 72 फूट लांबीचा पुष्पहार या मूर्तीस घालण्यात आला. या सोहळ्याच्यावेळी उपस्थित हजारो भाविक प्रभू रामचंद्राचा आणि हनुमानाचा जयघोष करीत होते. अमेरिकेतील जनतेला आणि विशेषतः हिंदू समाजास हनुमानाची ही मूर्ती सदैव प्रेरणा देणारी ठरणार आहे.

9869020732

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.