सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा ‘जनसेवक’

    26-Aug-2024   
Total Views |
article on narendra pawar


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेले आणि शिस्तबद्ध व देशात प्रमुख पक्ष असलेल्या भाजपमध्ये नगरसेवक, उपमहापौर आणि आमदार असा चढता प्रवास केलेल्या नरेंद्र पवार यांची एक लोकनेता म्हणून ओळख आहे. पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो, त्याच्या समस्येप्रसंगी हक्काने धावून जाणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. अशा या राजकारणाचा पिंड असला तरी समाजकारण अंगाअंगात भिनलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे, नरेंद्र पवार. आज नरेंद्र पवार यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा धावता आढावा घेणारा हा लेख....

नरेंद्र पवार हे लहानपणापासून रा. स्व. संघाचे स्वयंसेवक. इयत्ता पाचवीत असताना ते संघाच्या ‘नमस्कार मंडळ’ येथील प्रताप सायंशाखेत जायला लागले. तिथेच समाजकारणाचे बीज त्यांच्या मनात रोवले गेले. दहावीच्या परीक्षेपूर्वी एक मार्गदर्शनपर व्याख्यानमाला रा. स्व. संघाकडून आयोजित करण्यात आली होती. त्या व्याख्यानमालेला त्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या माध्यमातून त्यांच्याकडे विद्यार्थी परिषद शिबीर, विरंगुळा केंद्र उपक्रम, पावसाळी सहल यांची जबाबदारी सोपविली. ही जबाबदारी त्यांच्यावर अरुण देशपांडे यांच्याकडून सोपविण्यात आली. आग्रा रोडवरील एका अभ्यासवर्गात नरेंद्र पवार यांना बोलविले होते. आग्रा रोडवरील विद्यार्थी परिषदेची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली. विद्यार्थीदशेत राजकारणात जायचे, असे काही त्यांचे ठरले नव्हते. पण, ‘विद्यार्थी परिषदे’ची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि नकळत ते राजकारणात आले. ‘विद्यार्थी परिषदे’च्या जबाबदारीनंतर त्यांच्याकडे कल्याण सहमंत्री, शहरमंत्री जबाबदारी सोपविण्यात आली व ती त्यांनी लीलया पेलली. ‘विद्यार्थी परिषदे’त सक्रिय होऊन विविध आंदोलनांत सहभागी झाले. मग, आंदोलन फी वाढीचे असो किंवा अधिवेशन असो, त्यात ते सक्रिय सहभागी झाले. सिव्हील इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे पूर्णवेळ काम करण्याची इच्छा व्यक्त केली. दादर, नाशिक आणि काही वनवासी भाग येथे ते काम पाहू लागले. पुढे त्यांच्याकडे ‘महाराष्ट्र प्रदेशमंत्री’ म्हणून जबाबदारी देण्यात आली. पण, ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे पूर्णवेळ काम थांबवू नये, असे त्यांना वाटत होते. येथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर, त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे पूर्णवेळ काम थांबवू नये, असे वाटत असतानाच त्यांचे काम झपाट्याने सुरू होते. मात्र, त्याच वेळी वडिलांच्या आलेल्या आजारपणामुळे त्यांच्या कामाला काहीसा अडथळा निर्माण झाला. वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली आणि त्यांना अर्थार्जनासाठी काम करावे लागले. सिव्हील इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रेशन केले. कंत्राटदार म्हणून कामाला सुरुवात केली. पण, येथेही त्यांचा संघर्ष काही संपता संपेना. इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनसाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. रजिस्ट्रेशनसाठी दीड हजार रुपयांची गरज होती. भाजपा पदाधिकारी शिवाजी आव्हाड त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी दीड हजार रुपये नरेंद्र यांना दिले. त्यातूनच, त्यांनी आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. व्यवसाय करत असतानाच त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी आली. विभागाध्यक्ष, कल्याण शहर सचिव अशा विविध पदांची पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तत्कालीन सत्ताधार्‍यांच्या विरोधात अनेक आंदोलने केली. त्यात महागाई, अन्नधान्य, भाजीपाल्याची भाववाढ, विजेचे भारनियमन, एमएसईबीच्या कार्यालयाची तोडफोड अशा विविध आंदोलनांंचा समावेश होता. डॉ. चंद्रशेखर तांबडे आणि त्र्यंबक चव्हाण यांच्यासमवेत नरेंद्र हे देखील प्रभागात फिरत असत. त्यामुळे संघटना कशी वाढवायची, या सगळ्याचे प्रत्यक्ष धडे त्यांना तांबडे आणि चव्हाण यांच्याकडून मिळाले.

सिव्हील इंजिनिअर झाल्यावर त्यांनी सात वर्षे काम केले. वडिलांच्या तब्येतीची कुरकुर सुरूच होती. याकाळात शिवाजी आव्हाड यांनी नरेंद्र यांना मोठा आधार दिला. आव्हाडांच्या मदतीने नरेंद्र यांना वॉटर सप्लायर्सची कामे मिळत गेली. एकीकडे अर्थार्जन करण्यासाठी सहकार्य करताना नरेंद्र यांनी राजकारणात यावे, अशी आव्हाड यांची इच्छा होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि ‘विद्यार्थी परिषदे’त असताना नरेंद्र यांना राजकारणात काम करण्याची संधी मिळाली होती. ते काम करीत असताना आवड ही निर्माण झाली होती. पुढे नरेंद्र यांना जगन्नाथ पाटील आणि के. आर. जाधव यांनी कल्याण शहराध्यक्षपद दिले. त्यात थोडा संघर्ष झाला. पण, शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असतानाच पारनाका विभागातून त्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली. अनुभव नसताना पक्षाने उमेदवारी दिली होती. त्या पारनाकासारख्या प्रभागात निवडून येणे सोपे काम नव्हते. पण, भाजपावर प्रेम करणारे लोक आणि संघाचे स्वयंसेवक, संघ परिवारांशी संबंधित बँकांमधील संचालक, छत्रपती शिक्षण मंडळातील पदाधिकार्‍यांनी नरेंद्र यांना मदत केली आणि निवडूनही आणले. त्यानंतर नगरसेवक, स्थायी समिती सदस्य, उपमहापौर अशी विविध पदे भूषवित त्यांनी राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविला.

नरेंद्र यांची ‘लोकांमध्ये मिसळणारा नेता’ अशी ओळख आहे. त्यामुळेच ते नेहमी जनतेत मिसळून काम करतात. ‘घर तिथे रांगोळी’ हे अभियान राबवून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी 24 हजार समस्यांचा पाऊस पडला होता. या अभियानाला 30 हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला होता. विशेष म्हणजे, त्यात सर्व पक्षांच्या नगरसेवकांचाही प्रतिसाद होता. यावेळी विविध प्रश्न मार्गी लावण्यात नरेंद्र यांना यश आले होते. त्यानंतर नरेंद्र यांनी उपमहापौर असताना एक लाख झाडे लावण्याचा संकल्प केला. पण, प्रत्यक्षात 55 हजार झाडे लावण्यात त्यांना यश आले. त्यांनी एका मॅरेथॉनचेदेखील आयोजन केले होते. त्यालाही स्पर्धकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्या स्पर्धेला विनोद तावडे, एकनाथ शिंदे आणि प्रकाश परांजपे यांनी उपस्थिती लावली होती.

नरेंद्र यांनी आमदार म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर रेकॉर्डब्रेक असा निधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मतदारसंघासाठी मिळवून दिला. आतापर्यंतच्या आमदारांचे रेकॉर्ड नरेंद्र यांनी मोडले होते. नरेंद्र यांना अर्थसंकल्पाचे ज्ञान होते. त्यामुळे कोणता विषय मांडला तर निधी मिळू शकतो, त्यांचा अभ्यास होता. त्यामुळे निधी मिळत गेला. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करीत होते. शेतकरी अडचणीत असताना पक्षाने 100 मुलींची लग्ने लावावी, असा आदेश नरेंद्र यांना दिला. त्यानंतर नरेंद्र यांनी पुढाकार घेऊन 551 मुलींची लग्ने लावली. ‘न भुतो न भविष्यती’ असा सर्वधर्मीय लग्नसोहळा पार पडला. त्यासाठी देवेंद्र फडणवीस स्वत: उपस्थित होते. एवढेच नव्हे तर नरेंद्र यांनी ‘सीएसआर’च्या माध्यमातून सात ठिकाणी ‘जलयुक्त शिवार’ उपक्रम राबविला. डम्पिंग ग्राऊंडची समस्या मांडून विशेष निधी मिळविला. गार्डन, साई उद्यान, नानासाहेब धर्माधिकारी उद्यान, कारभारी उद्यान अशी अनेक उद्याने, चौक सुशोभीकरण करण्याचे कामही त्यांनी केले. कल्याण ते टिटवाळापर्यंतचे सर्व चौक सुशोभीकरण करण्यात त्यांना यश आले. नांदप गावाची एकच ग्रामपंचायत होती. ती ग्रामपंचायत दत्तक घेतली होती. रस्ता काँक्रिटीकरण केले. नांदपव्यतिरिक्त अनेक ठिकाणच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले. मैदाने विकसित केली. शाळेच्या प्रयोगशाळा आणि सुरक्षिततेसाठी निधी मंजूर करून आणला. या निधीतून सुरू असलेली कामे प्रगतीपथावर आहेत. अनेक प्रभागांतील समाजमंदिरे उभी राहत आहेत. ती नरेंद्र यांनी निधी मंजूर करून आणला, त्यातून सुरू आहेत.

युतीच्या जागावाटपात कल्याण पश्चिमेची जागा शिवसेनेला गेल्याने त्यांना दुसर्‍यांदा भाजपमधून उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. मात्र, त्यात त्यांना यश मिळविता आले नसले, तरी त्यांनी चांगली मते मिळविली. “भाजपने तिकीट कापले म्हणून अजिबात नाराजी नाही. ज्या पक्षाने नगरसेवक, उपमहापौर, आमदारपद दिले, त्यांना मित्रपक्षासाठी जागा द्यावी लागली. पक्षाने मला खूप दिले. त्यामुळे पक्षाला मला रिटर्न देणे माझी जबाबदारी आहे. पक्षाने अपेक्षेपेक्षा जास्त दिले आहे,” असे नरेंद्र सांगतात.

भाजपमधून विविध पदे भूषविल्यानंतर कोणतेही पद नसताना नरेंद्र यांनी अनेक स्थानिक प्रश्न सोडविले. लोकांच्या मदतीला ते कायम धावून जातात. दरम्यान, पक्षाने त्यांना भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक म्हणून जबाबदारी दिली. भटक्या समाजाचे अनेक प्रश्न होते. त्यांचे प्रश्न त्यांना जवळून पाहता आले. पक्षाने जबाबदारी दिल्यावर भटक्या समाजांच्या समस्या समजल्या. अतिशय लहानलहान समाज आहेत, पण त्यांच्या समस्या खूप आहेत. त्यांच्याकडे साधे रेशनकार्ड नाही. त्यामुळे त्यांना मोफत धान्य मिळत नाही, मुलांना शिक्षण नाही, जन्ममृत्यूची नोंद नाही, रोजगार नाही, घरकुल योजनेला पात्र नाही. पोटापाण्यासाठी भटकंती करतात. म्हणून, समस्या अधिक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या माध्यमातून अनेक जिल्हा आणि तालुक्यांत फिरून त्यांच्या मुलांना शिक्षण देणे, कोल्हापूरमध्ये घरकुलसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांनी निधीही मिळवून दिला आहे. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा-बलुतेदारांसाठी विश्वकर्मा योजना जाहीर केली होती. प्रत्येक विधानसभेत एक हजार लोकांना तरी या योजनेचा लाभ द्यायचा आहे. या योजनेचा बारा-बलुतेदार अठरापगड जाती यांना लाभ मिळणार आहे. त्यांना मार्गदर्शन करणे, कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. छोट्याछोट्या व्यावसायिकांना सक्षम करणे हा उद्देश आहे. जास्तीतजास्त लोकांना लाभ देण्याचा प्रयत्न आहे. सरासरी एक हजारांहून अधिक लोक या योजनेचा लाभ घेत आहेत.

तळागाळात काम करतो तेव्हा कार्यकर्ता जमिनीवर असतो, असे म्हणतात. पण, ज्यावेळी तो लोकप्रतिनिधी होतो त्यावेळी त्याच्या डोक्यात पक्षाच्या पदाची आणि लोकप्रतिनिधीची हवा जाते, असे सहसा म्हणतात. मात्र, नरेंद्र हे त्याच्या पूर्ण विरुद्ध आहेत. मोठमोठी पदे भूषविली तरी जनमानसाच्या हाकेला धावून जाणारा हक्काचा माणूस अशी त्यांची ख्याती आहे.