तिमिराकडून तेजाकडे...

Total Views |
 
Mansa
 
तब्बल 44 वर्षे नेत्रदान आणि अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम करणार्‍या पुष्पा आगाशे यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा
 
नेत्रदान-सर्वश्रेष्ठदान’ हे घोषवाक्य आपण नेहमीच वाचतो. आपल्या मुंबई शहरापेक्षा छोटा असणारा श्रीलंका हा देश, जगातील ४० इतर देशांना डोळ्यातील कॉर्निया पुरवतो. कोलंबो विमानतळावर जगभरातील सर्व विमाने थांबतात, ते केवळ याची वाहतूक करण्यासाठी, हे वाचून आपल्या देशासाठी आपल्याला काय करता येईल का? या विचाराने पुष्पा आणि श्रीपाद आगाशे हे दाम्पत्य भारावले. आगाशेंच्या कुटुंबात कोणालाही दृष्टिदोष किंवा तत्सम आजार नाही, किंवा आगाशे दाम्पत्याचे वैद्यकीय शिक्षणही नाही, मात्र तरीही ते शेकडो नागरिकांना नेत्रदान आणि अवयवदानाची संपूर्ण माहिती देतात. नोव्हेंबर १९८० मध्ये श्रीलंकेतील नेत्रदानाची महती याबाबत एक माहितीपर लेखच हा आगाशे दाम्पत्याच्या सामाजकार्याकडे वळण्यास निमित्त झाला. १९८१ पासून आगाशे दाम्पत्य अविरतपणे नागरिकांमध्ये नेत्रदान आणि अवयवदानाविषयी जनजागृती करते आहे.
 
पुष्पा आगाशे यांचे पती श्रीपाद आगाशे हे चेन्नईपासून ८० किलोमीटर अंतरावर असणार्‍या, कल्पाकम येथील इंदिरा गांधी रिसर्च या ऑटोमिक एनर्जी सेंटरमध्ये ड्राफ्ट्समन म्हणून कार्यरत होते. १९७६ मध्ये या दोघांचा संसार सुरू झाला. १९८०-८१ मध्ये जेव्हा या दोघांनी नेत्रदानविषयक काम करायचे ठरविले; तेव्हा पहिले उभयतांनी परिपूर्ण ज्ञान आत्मसात करण्याचा निर्णय घेतला. अशावेळी पुष्पा यांना भारतातील पहिली आय बँक ’एग्मन’ ही चेन्नईतच असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच वेळ न दवडता श्रीपाद आगाशे यांनी एग्मन आय बँक गाठली. या आय बँकेनेही आगाशे यांना जनजागृतीसाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन केले.
 
यावेळी आगाशे यांनी बँकेकडे काही फॉर्मची मागणी केली. मात्र, त्यावेळी झेरॉक्ससारख्या सुविधा उपलब्ध नसल्याने केवळ पाच फॉर्म घेऊन आगाशे माघारी परतले. केवळ माहिती घेऊन शांत न राहता,आगाशे दाम्पत्याने लगेचच रिसर्च सेंटरमध्ये नेत्रदानाची माहिती देणारी एक आवाहनवजा सूचना कार्यालयाच्या फलकावर लावली. या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. पुढे दरवर्षी कार्निव्हलमध्ये नेत्रदानाचे फ्री स्टॉल लावले. स्टॉल अधिक आकर्षक कसा होईल, यावर भर दिला. आकर्षक घोषवाक्ये, चित्रे आणि ड्राफ्ट्समन असल्याने आकर्षक फॉन्ट, यामुळे आगाशेंचा स्टॉल कार्निव्हलमध्ये आकर्षक दिसला. आगाशे दाम्पत्यासह त्यांचे दोन मित्रही पुढे या चळवळीत जोडले गेले. ते देखील या कार्निव्हलमध्ये सहभागी होऊन नेत्रदान आणि देहदान याची माहिती देऊ लागले. १९९२ पर्यंत चेन्नईत आगाशे दाम्पत्याचे या मोहिमेशी संबंधित कार्य सुरू होते. चेन्नईत असेपर्यंत आगाशे दाम्पत्याने कार्यालय आणि परिचितांकडून जवळपास १ हजार २०० अर्ज भरून घेतले.
 
१९८३ मध्ये पुष्पा आगाशे यांना मॅटलॉजीमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून नोकरीची संधी मिळाली होती. मात्र, १९९२ मध्ये पुष्पा आगाशे यांची मुंबईकडे बदली झाली. मुळातच मुंबईकर असणार्‍या आगाशे दाम्पत्याचा मुंबईकडे आणि आईवडिलांकडे ओढा होताच. अशावेळी कौटुंबिक जबाबदारी सांभाळत दाम्पत्याने बदली करून घेत, मुंबईकडे प्रस्थान केले. चेन्नईत वास्तव्यास असतानाही आगाशे दाम्पत्य सातत्याने मुंबईतील सरकारी रुग्णालये आणि आय बँकांशी जोडलेले होते. मुंबईत होणार्‍या प्रत्येक फेरीत ते आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी, मुंबईतील आय बँक आणि तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधत. कोणतीही वैद्यकीय पार्श्वभूमी नसलेल्या आगाशे यांनी, कॉर्निया कसा काढतात आणि पुढे तो अंध व्यक्तीच्या डोळ्यात कसा बसविला जातो हे प्रत्यक्षरित्या पाहिले. १९९२ मध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे घेतलेला जनजागृती उपक्रम अत्यंत यशस्वी झाला. पुढे रेल्वे प्रशासनानेही नेत्रदानविषयक जनजागृती करण्यासाठी उपक्रम घेण्याचे आगाशे दाम्पत्यांना निमंत्रण दिले. १९९६ पासून आगाशे यांनी नेत्रदान, अवयवदानविषयक व्याख्यान देण्यासही सुरुवात केली. श्रीपाद आगाशे यांची जनजागृतीपर ’डोळसदान’ ही एकांकिका व ’प्रकाशाची पहाट’हा नेत्रदानावरील कवितांचा संग्रह प्रकाशित झालेला आहे. रात्रंदिवस हे दाम्पत्य या मोहिमेशी जोडलेले आहे. आज त्यांच्या या बहुमोल योगदानामुळे अंदाजे ४५० पेक्षा अधिक नेत्रदान झाले असून, त्यामुळे अनेक दृष्टीहीनांचा प्रवास तिमिरातून तेजाकडे असाच झालेला आहे.
 
आठवणीतल्या प्रसंगात पुष्पा आगाशे सांगतात की एकदा एका पालकांनी त्यांचे लहान मूल गमावले. मुंबईतील एका सरकारी रुग्णालयात ही घटना घडली. इतक्या दुःखाच्या क्षणी त्यांनी नेत्रदानाचे एक पोस्टर पाहिले, आणि त्यांच्याही मनात आले की आपल्या मुलाचे डोळे दान करावे. त्यामुळे एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी मिळेल. तेव्हा त्यांना कोणीतरी आमचा नंबर दिला. धो-धो पावसात त्या लहान मुलाचे वडील आय बँकेत मध्यरात्री आपल्या मुलाचे डोळे दान करण्यासाठी धावपळ करत होता, हा अनुभव आजही माझ्या अंगावर शहारा आणतो, असे पुष्पा आगाशे सांगतात. खरंतर, पुष्पा आगाशे आणि त्यांच्यासारख्या अनेक संघटना आज नेत्रदान, अवयवदान याचे महत्त्व नागरिकांमध्ये रुजवत आहेत. अशावेळी सरकारनेही काही पावले उचलावीत, जेणेकरून नेत्रदान करणार्‍याची अंतिम इच्छा तर पूर्ण होईलच, मात्र एखाद्या अंध व्यक्तीच्या जीवनात आशेचा किरण यामुळे उगवेल. आगाशे दाम्पत्याला, भविष्यातील यशासाठी दै.‘मुंबई तरुण भारत’कडून हर्दिक शुभेच्छा!
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.