अमेरिकेतील भारतीयांची सर्वांगीण कामगिरी आणि योगदान अधोरेखित करणारा ‘इंडियास्पोरा इम्पॅक्ट रिपोर्ट’ नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, संस्कृती ते सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रांत अमेरिकेतील भारतीयांचा प्रभाव या अहवालात अधोरेखित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने या अहवालाची निर्मिती करणार्या ‘बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (BCG) च्या ‘प्रोजेक्ट लीडर’ अमृता ओक यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा विशेष संवाद...
सर्वप्रथम ‘इंडियास्पोरा इम्पॅक्ट’या अहवालाविषयी आणि त्याच्या निर्मितीमागच्या उद्देशाविषयी काय सांगाल?
‘इंडियास्पोरा’चे संस्थापक एम. आर. रंगास्वामी यांच्या इंद्रा नुयी यांच्याशी झालेल्या गप्पांमधून ही कल्पना पुढे आली. यापूर्वी स्वतंत्रपणे मोहनबीर साहनी यांनाही काही वर्षांपासून याबाबतचा अहवाल तयार करण्यात रस होता. हा अहवाल विकसित करण्याकरिता जेव्हा ‘इंडियास्पोरा’ने ’इउॠ’ वर आमच्याशी संपर्क साधला; तेव्हा याचे उत्तर सहज होकारार्थी होते. केन, चक आणि गीता यांच्यासोबत सुकाणू समितीमध्ये इंद्रा नुयी आणि मोहनबीर सहानी यांनाही स्थान देण्याचे भाग्य आम्हाला लाभले.
या अहवालाच्या ‘प्रोजेक्ट लीडर’ म्हणून, त्याच्या निर्मितीदरम्यान प्रमुख आव्हाने कोणती होती?
आम्ही हाती घेतलेल्या कामांत पहिले आव्हान होते, ते म्हणजे संपूर्ण लोकसंख्येचे योगदान सर्वसमावेशक पद्धतीने कसे ‘कॅटलॉग’ करता येईल, याचा विचार करणे. आम्ही इतर तत्सम अहवालांवर एक नजर टाकली. परंतु, त्यात आम्हाला काही उणिवा आढळल्या. आम्ही आर्थिक, नावीन्य, सामाजिक न्याय, सांस्कृतिक आणि सरकारी अशा सहा आयामांचा विचार आणि विस्तार केला. मग, या परिमाणांमध्ये, आम्हाला प्रत्येक पैलू मोजणारे ‘मेट्रिक्स’ अर्थात मानके विकसित करायची होती- आम्ही अशी एकूण 40 मानके विकसित केली. एकदा ती रचना तयार झाल्यानंतर, पुढील आव्हान होते डेटा संकलनाचे. मला विशेषत: एक आयाम आठवतो, जो मी अनेक वेळा पुन्हा तपासला आहे- 13 टक्के वैज्ञानिक प्रकाशनांमध्ये (8 पैकी 1) भारतीय सह-लेखक होते. मी स्वत: पीएच.डी. केली असल्यामुळे मला या यशाचा खूप अभिमान आहे आणि या यशासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे.
या अहवालात भारतीय अमेरिकन लोकांचे विविध क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण योगदान असल्यापैकी कोणती क्षेत्रे तुमच्यासाठी विशेषतः आश्चर्यकारक आहेत?
आरोग्य आणि विज्ञान : अमेरिकेच्या आरोग्यसेवा प्रणालीतील डॉक्टरांपैकी सुमारे दहा टक्के डॉक्टर हे भारतीय- अमेरिकन आहेत. अमेरिकेतील आरोग्यसेवा कर्मचार्यांमध्ये भारतीय अमेरिकन लोकांचा मोठा सहभाग आहे. विशेषत: अंतर्गत औषधे, ‘कार्डिओलॉजी’ आणि ‘ऑन्कोलॉजी’ यांसारख्या क्षेत्रांमध्ये भारतीय डॉक्टर्स दिसून येतात.
उद्योजकता : भारतीय उद्योजकांनी अमेरिकेमध्ये 72 ‘युनिकॉर्न स्टार्टअप्स’ सुरु केले आहेत, ज्यांचे मूल्य एकत्रितपणे 195 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. यामध्ये एआय, डिजिटल हेल्थकेअर आणि फिनटेकसारख्या अत्याधुनिक क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. या स्टार्टअप्सनी अमेरिकेतील नावीन्यतेवर ‘भारतीय डायस्पो‘राचा प्रभाव अधोरेखित केला आहे.
राजकीय आणि नागरी नेतृत्व : अमेरिकेच्या राजकारणात भारतीय अमेरिकन नागरिकांची वाढती दृश्यमानता हे आणखी एक क्षेत्र आहे, जे माझ्यासाठी वेगळे आहे. भारतीय-अमेरिकन मतदारांचा वाढता प्रभाव, विशेषतः ‘स्विंग’ राज्यांमध्ये (अशी राज्ये जिथे मतदार डेमोक्रॅटिक किंवा रिपब्लिक यापैकी कुठल्याही एका पक्षाला कौल देतात) भविष्यातील अमेरिकन निवडणुकांना आकार देऊ शकतो.
‘फॉर्च्यून 500’ कंपन्यांमध्येही भारतीय-अमेरिकन नागरिक मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावर असून, या कंपन्यांच्या प्रगतीत त्यांचा सिंहांचा वाटा राहिला आहे. त्याविषयी काय सांगाल?
2023 पर्यंत भारतीय वंशाच्या सीईओंनी 16 (आता 15) ‘फॉर्च्यून 500’ कंपन्यांचे नेतृत्व केले आहे. या कंपन्यांनी अंदाजे 978 अब्ज कमाई केली आणि जागतिक स्तरावर 2.5 दशलक्ष लोकांना रोजगार दिला. हे नेते तंत्रज्ञान, फार्मास्युटिकल्स आणि ग्राहकोपयोगी वस्तूंसह विविध क्षेत्रांतील कंपन्यांचे संचालन करत आहे आणि जागतिक बाजारपेठांमध्ये नावीन्य आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
उदा. ‘मायक्रोसॉफ्ट’मध्ये सत्या नाडेला, ‘वर्टेक्स फार्मास्युटिकल्स’मधील रेश्मा केवलरामानी, ’ऋशवएु’ येथे राज सुब्रमण्यम
या अहवालात अमेरिकेतील संशोधन क्षेत्रातील भारतीय-अमेरिकन नागरिकांचे योगदानही अधोरेखित करण्यात आले आहे. त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
2023 मधील अमेरिकेतील सर्व वैज्ञानिक प्रकाशनांपैकी अंदाजे 13 टक्के भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांनी सह-लेखन केले होते. भारतीय अमेरिकन नागरिकांनी अमेरिकेत संशोधन आणि नवकल्पनांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ‘पेटंट’ आणि शैक्षणिक प्रकाशनांच्या कार्यातही भारतीय-अमेरिकन नागरिकांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. खालील काही महत्त्वाच्या उदाहरणांवरुन त्याचा आढावा घेता येईल.
पेटंट : भारतीय अमेरिकन संशोधकांकडे असलेल्या ‘पेटंट’चा वाटा 1975 मध्ये 1.9 टक्क्यांवरून 2019 मध्ये दहा टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यामध्ये संगणक तंत्रज्ञान क्षेत्राचा विशेष समावेश आहे. यामध्ये 11 टक्के पेटंटमध्ये भारतीय सह-लेखकांचा वाटा आहे.
भारतीय संस्कृती अमेरिकेतही मुख्य प्रवाहात आल्याचे विविध सण-उत्सवांप्रसंगी विशेषत्वाने दिसून येते. तेव्हा, या सांस्कृतिक एकात्मतेचा अमेरिकन समाजावर पडलेल्या एकूणच प्रभावाविषयी काय सांगाल?
भारतीय पाककृती, योग आणि आयुर्वेद अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. या सगळ्यांचा अमेरिकन आरोग्यपद्धती आणि पाककृतींच्या विविधतेवर प्रभाव दिसून येतो. दिवाळी आणि होळीसारखे सण आता अमेरिकेतही अगदी प्रमुख सार्वजनिक कार्यक्रम म्हणून साजरे केले जातात. कला, मनोरंजन आणि सामुदायिक केंद्रांमधील भारतीय प्रभावामुळे ही सांस्कृतिक एकात्मता आणखीनच वाढली आहे. माझ्या वैयक्तिक नोंदीनुसार, माझे बरेच मित्र आहेत, ज्यांना आता भारतीय संस्कृतीतील बारकावे आणि प्रादेशिक फरकांमध्ये खूप रस आहे.
भारतीय-अमेरिकन समुदाय स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक सेवेत कितपत कार्यरत आहेत?
भारतीय-अमेरिकन समुदायाचे प्रतिनिधित्व आणि एकात्मता राखण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक सेवांमध्ये सहभाग आवश्यक आहे. त्यांचा सहभाग सामाजिक न्यायासाठी, भेदभावाशी लढा देऊन आणि न्याय्य धोरणे राबवून व्यापक सामाजिक समस्यांवर परिणाम करू शकतो.
हा अहवाल ‘भारतीय डायस्पोरा’च्या सामाजिक प्रयत्नांवर प्रकाश टाकतो. याचा अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांवर काय परिणाम होईल, असे वाटते?
‘भारतीय डायस्पोरा’चे सामाजिक न्याय क्षेत्रात प्रयत्न वर्षानुवर्षे लक्षणीयरीत्या विकसित झाले आहेत. कालांतराने, भारतीय-अमेरिकन नागरिकांनी शिक्षण, आरोग्यसेवा आणि दारिद्य्र निर्मूलन यांसारख्या मोठ्या सामाजिक समस्यांना सामोरे जाण्यासाठी ‘अमेरिकन इंडिया फाऊंडेशन’ (अखऋ) सारख्या संस्था आणि सेवाभावी संस्था स्थापन करण्यास सुरुवात केली. हे योगदान निरक्षरता कमी करण्यासाठी, आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी आणि उपेक्षित समुदायांना सक्षम बनविण्यात मदत करत राहतील.
भविष्याचा विचार करता, ’भारतीय डायस्पोरा’ महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो अशी क्षेत्रे कोणती?
सार्वजनिक सेवा आणि राजकारण : जसजसे भारतीय अमेरिकन अमेरिकेच्या राजकारणात आणि सार्वजनिक सेवेत रुजू होत आहेत; तसतसे धोरण निर्मिती, नागरी हक्कांसाठी लढा देण्यात आणि अमेरिका-भारत संबंध अधिकाधिक वृद्धिंगत करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे सरकारमध्ये अधिकाधिक भारतीय-अमेरिकन नागरिकांचे प्रतिनिधित्व दिसून येईल आणि सामाजिक न्यायसंबंधी कार्यामध्ये त्यांचा सहभाग आणखीन वाढू शकतो.
सामाजिक प्रभाव : दारिद्य्र, शिक्षण, हवामान बदल आणि आरोग्य विषमता यांसारख्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करून, ‘डायस्पोरा’च्या प्रयत्नांचा विस्तार होण्याची अपेक्षा आहे. धोरणात्मक मदत कदाचित तात्कालिक गरजा आणि दीर्घकालीन उपायांना पूरक ठरेल, ज्यामुळे अमेरिका आणि भारतातील समुदायांनाही फायदा होईल.
सांस्कृतिक देवाणघेवाण आणि प्रसारमाध्यमे : भारतीय ‘डायस्पोरा’चा अमेरिकेतील कला, माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्र आणि एकूणच सांस्कृतिक देवाणघेवाणीवर प्रभाव असाच कायम राहील. यामध्ये जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीचा प्रचार करणे, आंतरसांस्कृतिक संवादाला चालना देणे आणि हॉलीवूड आणि अन्य जागतिक माध्यमांच्या व्यासपीठांवर प्रतिनिधित्व वाढवणे, यांचा समावेश आहे.
हा अहवाल अमेरिकेत स्थायिक भारतीयांच्या योगदानावर भाष्य करतो. म्हणूनच या अहवालातील डेटा हा खूपच सूचक आहे- भारतीय वंशाचे नागरिक अमेरिकन समुदायामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत आणि सर्वच क्षेत्रांत त्यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे. हा अहवाल खर्या अर्थाने सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या लोकशाहीतील नागरिकांमधील नातेसंबंधाचा उत्सव आहे.