बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची खात्री करावी!
संयुक्त राष्ट्रांकडे स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांची महत्त्वाची मागणी
23-Aug-2024
Total Views | 59
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Swami Jitendranand Saraswati) हिंदू रक्षा समिती वाराणसीने बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवरील हिंसाचार आणि अत्याचाराविरोधात वाराणसी येथे निषेध रॅली काढली. निषेध रॅलीमध्ये, बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी संयुक्त राष्ट्रांना त्वरित हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली आहे. रॅलीच्या सुरुवातीला पार पडलेल्या जाहीर सभेत अखिल भारतीय संत समिती आणि गंगा महासभेचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी उपस्थितांना याबाबत संबोधित केले.
स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यावेळी म्हणाले की, "बांगलादेशातील शेख हसीना यांचे लोकशाही सरकार उलथून टाकल्यानंतर बांगलादेशातील कट्टर अराजकतावाद्यांनी बळजबरी केली. हिंदू, शीख आणि इतर अल्पसंख्याकांची धार्मिक स्थळे, दुकाने, घरे उद्ध्वस्त केली. हिंदू महिलांचे याठिकाणी अपहरण केले जात आहे. बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ, जागतिक मानवाधिकार आयोग आणि अल्पसंख्याक आयोगाने तातडीने पावले उचलावीत."
पुढे ते म्हणाले, "भारत आपल्या शेजारील हिंदू आणि अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांवर गप्प बसू शकत नाही. कारण जगात शांतता राखण्याची भारताची वचनबद्धता आहे. पाकिस्तान आणि काही परकीय शक्ती अशांतता पसरवण्यासाठी बांगलादेशातून भारतातही दहशतवादी घुसवू शकतात. याबाबतही आपण सतर्क राहिले पाहिजे."
जाहीर सभेच्या शेवटी ठराव मंजूर करण्यात आला की, आज काशीमध्ये सर्व सनातनी, हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी, वाराणसीतील सर्व व्यापारी संघटना, समाजाच्या रक्षणासाठी दक्ष राहणाऱ्या धार्मिक संघटना, महामहिम राष्ट्रपती आणि भारत सरकारला विनंती केली की बांगलादेशात तसेच जगातील सर्व देशांमध्ये जेथे हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन अल्पसंख्याक आहेत, त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत. यासाठी हिंदु रक्षा समिती, काशी आणि काशीतील सामाजिक व व्यापारी संघटना भारत सरकारचे ऋणी राहतील.