नवी दिल्ली : कोलकात्याच्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार – हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बंगाल पोलिसांच्या निष्काळजीपणावर कठोर शब्दात ताशेरे ओढले. याप्रकरणी पुढील सुनावणी ५ सप्टेंबर रोजी होणार आहे. आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बलात्कार – हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या निष्काळजीपणाबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या हत्येचा गुन्हा अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदवण्यात पोलिसांनी बराच वेळ घेतल्याविषयी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
सरन्यायाधी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पार्डिवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील पोलिस कारवाईबाबत प्रश्न विचारले. ते म्हणाले की, 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:10 ते 7:10 या वेळेत मृतांचे शवविच्छेदन झाले हे अतिशय आश्चर्यकारक आहे. यानंतर रात्री साडेअकरा वाजता अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली. नियमानुसार अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यापूर्वी शवविच्छेदन केले जाते. असे कसे होऊ शकते, असा सवाल न्यायालयाने केला.
ही अत्यंत अस्वस्थ करणारी वस्तुस्थिती आहे. बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करणाऱ्या कोलकाता पोलिस अधिकाऱ्याला कोर्टाने पुढील सुनावणीत हजर राहण्याचे निर्देश दिले आणि गुन्हा नोंदवण्याच्या वेळेची माहिती देण्यास सांगितले आहे. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आंदोलक डॉक्टरांना कामावर परतण्यास सांगितले. कामावर परत आल्यास कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासनही न्यायालयाने त्यांना दिले.