बदलापुरात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. कोवळ्या वयाच्या दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत असताना, विरोधक मात्र राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नांत दिसतात. ही घटना इतकी क्रूर होती, की जनभावनांचा उद्रेक होणे रास्त. परंतु, आंदोलनाला जाणीवपूर्वक हिंसक वळण लावण्यात आले. काही राजकीय शक्ती त्यामागे होत्या, हे आता तपासात उघड होऊ लागले आहे. रक्षाबंधनामुळे जमाव जमणार नाही, ही बाब ध्यानात घेऊन सोमवारचे आंदोलन पुढे ढकलण्यात आले. जमावाला व्हॉट्सअॅपद्वारे एकत्र जमण्याचे आवाहनही करण्यात आले. कोणी कोणत्या दिशेने कुठे जायचे, यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. शिवाय, आंदोलनस्थळी पोहोचण्याआधी त्यांच्या हातात ’महायुती सरकार’ विरोधातील छापील बॅनर देण्यात आले. जे रविवारी रात्री छापून तयार होते, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते एकेक करून माध्यमांसमोर येत राहिले. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना तर पीडित मुलींविषयी सहवेदना व्यक्त करण्यापेक्षा गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्याची घाई अधिक. देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीचा आकसभाव त्यांच्या प्रतिक्रियेत पदोपदी दिसत होता. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी या घटनेच्या निषेधार्थ मंत्रालयावर मोर्चा काढला. पण, त्यांच्या मतदारसंघात (संघर्षनगर, चांदिवली) अडीच वर्षांच्या चिमुरडीवर एका जिहाद्याने लैंगिक अत्याचार केले, तेव्हा त्यांनी साधी प्रतिक्रिया देणेही टाळले. ते हिरवी मते नाराज होतील म्हणूनच ना? उरणमधील यशश्री शिंदे ही भगिनी ‘लव्ह जिहाद’ची शिकार ठरली, तिच्याप्रति यांनी कधी सहवेदना व्यक्त केल्या नाहीत. ना सुप्रियाताई पुढे आल्या, ना वर्षा गायकवाड किंवा सुषमा अंधारे. म्हणजेच हे सगळे निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच सुरू आहे ना? तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी बदलापूरमधील त्या कोवळ्या मुलींचा वापर का करता आहात? राजकीय पोळ्या भाजायच्याच असतील, तर अन्य मार्गांचा अवलंब करा. पण, कोवळ्या जीवांच्या आयुष्याशी खेळ करणे थांबवा!
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? मुख्यमंत्रिपदासाठी तुमची पसंती कुणाला? अशा सर्वेक्षणांचे सध्या पेव फुटलेले दिसते. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची नावे त्यात येणे स्वाभाविक. पण, अलीकडे एका अनपेक्षित नावाची त्यात भर पडली. ते नाव म्हणजे रोहित पवार. शरद पवार गटात सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासारखे मातब्बर नेते मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत असताना, एकाएकी रोहित पवार यांचे नाव कसे काय पुढे आले? याचा मागोवा घेता काही धक्कादायक बाबी पुढे आल्या. आपली राजकीय प्रतिमा उंचावण्यासाठी रोहित पवारांनी एका खासगी एजन्सीशी करार केला असून, त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून ‘प्रोजेक्ट’ करण्यासाठी सोशल मीडियावर मोहिमा उघडण्यात आल्या आहेत. अजित पवारांची जागा घेण्याचे त्यामागचे मनसुबे. पण, रोहितच्या या खेळीने जयंत पाटलांची धडधड चांगलीच वाढली आहे. लोकसभेला राज्यात आठ जागा मिळाल्यानंतर जयंत पाटलांनी त्याचे सर्व श्रेय घेण्यास सुरुवात केली. पक्षाच्या मुख्यालयाबाहेर जयंतराव ‘किंगमेकर’ ठरल्याची बॅनरबाजीही झाली. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत कुरघोडीचे राजकारण सुरू झाले. आगामी विधानसभा निवडणुकीचे नेतृत्व कोणी करायचे, यावरूनही प्रचंड वाद. पवारांची पसंती जयंत पाटील असले, तरी रोहित पवार पक्षाची कमान हाती घेण्यास अतिउत्सुक. सुप्रिया सुळेंचाही त्यांना छुपा पाठिंबा. रोहितच्या आडून त्या स्वतःचा स्वार्थ साधू पाहत आहेत. दोघांच्या भांडणाचा लाभ घेण्याचा त्यांचा हेतू. त्यासाठी त्यांनी रोहितच्या मदतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाटेत काटे पेरण्यास सुरुवात केली. त्याची खबर लागताच जयंत पाटील अस्वस्थ झाले असून, रोहित पवारांचा ’करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी संधीची वाट पाहत आहेत. या अंतर्गत द्वंद्वात कोण वरचढ ठरेल? आत्याच्या सहकार्याने रोहित पवार जयंत पाटलांना शह देतील, की सुप्रिया सुळेंकडून त्यांचा राजकीय बळी दिला जाईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.