आरबीआय गर्व्हनरांच्या नेतृत्वाची पंतप्रधानांकडून दखल; 'ग्लोबल फायनान्स'कडून दुसऱ्यांदा सर्वोच्च सेंट्रल बँकर म्हणून निवड
21-Aug-2024
Total Views | 135
मुंबई : अमेरिकास्थित 'ग्लोबल फायनान्स' मासिकाने सलग दुसऱ्यांदा जागतिक स्तरावर सर्वोच्च सेंट्रल बँकर म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी निवड झाली आहे. 'ग्लोबल फायनान्स' मासिकाने दिलेल्या 'A+' रेटिंग मिळवित गर्व्हनर दास यांनी यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.
दरम्यान, ग्लोबल फायनान्स सेन्ट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्स २०२४ च्या क्रमवारीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सलग दुसऱ्यांदा “ए प्लस” श्रेणी मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या 'एक्स'वरील पोस्टद्वारे म्हटले की, “या यशस्वी कामगिरीबद्दल आणि ती देखील दुसऱ्यांदा करुन दाखवल्याबद्दल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वात आर्थिक विकास आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या कार्याचा हा सन्मान आहे", असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे 'ग्लोबल फायनान्स' मासिकाच्या मानकांनुसार, महागाई नियंत्रण, आर्थिक वाढीचे लक्ष्य, चलन स्थिरता आणि व्याजदर व्यवस्थापनातील कामगिरीवर आधारित 'A' ते 'F' ग्रेड दिले जातात. ग्लोबल फायनान्समध्ये जागतिक स्तरावर होणाऱ्या आर्थिक क्रियाकलाप आणि बाजारपेठांचा संदर्भ म्हणजेच, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणूक, चलन विनिमय दर, सीमापार व्यवहार आणि देशांमधील भांडवलाचा प्रवाह यांचा समावेश करण्यात येतो.