या जगातील असंख्य दृश्य अशाश्वत वस्तू आपण रोजच पाहत असतो, त्या भोवतालची स्थिती अनुभवत असतो. याला अध्यात्मात ‘विषय’ असे म्हणतात. त्या विषयसेवनातून आनंदाची प्राप्ती होईल, अशी जीवाने कल्पना केल्यामुळे जीव त्यांच्या उपभोगासाठी धडपडत असतो. त्यातून क्षणैक सुखाचा भास झाला तरी आनंदाची प्राप्ती होत नाही. मात्र, त्याद्वारे अहंभाव, अज्ञान, गर्व, ताठा जन्माला येतात. हे देहबुद्धीमुळे घडत असते, असे स्वामींनी यापूर्वीच्या श्लोकांतून सांगितले आहे.
माणसाला आपल्या मूळ स्वस्वरूपाचे आकलन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत देहबुद्धी, अहंकार, अज्ञान यापासून त्याची सुटका होत नाही. यासाठी मनाला सांगावे की, विवेकपूर्ण विचारांच्या साह्याने तू जीवाच्या उगमस्थानापर्यंत जा आणि स्वभावतःच असलेल्या स्वस्वरूपाचा शोध घे. त्या शोधातून आत्मज्ञान प्राप्त होईल. आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी स्वामींनी विवेक वैराग्याची आवश्यकता सांगितली आहे.
समर्थांनी विवेकाची शिकवण आणि महती ‘दासबोधा’त ठिकठिकाणी प्रतिपादित केली आहे. समर्थांच्याइतका विवेकाचा पुरस्कार, जगातील इतर तत्त्ववेत्त्यांनी क्वचितच केला असेल. जागतिक तत्त्ववेत्त्यांचा विचार करता तत्त्वज्ञानात विवेकाचा पुरस्कार नेदरलॅण्ड्सच्या स्पिनोझा या तत्त्ववेत्त्याने केलेला दिसून येतो. त्याचा कालखंड इ.स. 1632 ते 1677 असा आहे. म्हणजे, तो समर्थांचा समकालीन होता. त्याचे वास्तव्य आणि कार्यक्षेत्र युरोपात होते, त्यामुळे त्यांना एकमेकांची माहिती असणे केवळ दुरापास्त. स्पिनोझा आणि समर्थ हे दोघे विवेकाचे पुरस्कर्ते. भिन्नभिन्न ठिकाणी एकाच कालखंडात आढळतात, हे आश्चर्यच आहे!
विवेकपूर्ण विचाराने या जगातील दृश्यवस्तू व तज्जन्य घटना याकडे पाहता आले पाहिजे. जगात आढळणार्या असंख्य अशाश्वत गोष्टींचे पुढे काय होणार, या संबंधीचा विचार स्वामी आता पुढील श्लोकातून सांगत आहेत. जगातील अशाश्वत दृश्यवस्तू विघटनशील असल्याने कालांतराने त्यापैकी काहीही शिल्लक राहणार नाही, या अशाश्वत गोष्टींच्या जास्त नादी न लागता आपण शाश्वत अशा ब्रह्मवस्तूचा शोध घेत गेले पाहिजे. त्यासाठी विवेकपूर्ण विचारांची साथसंगत करत प्रयत्न केले पाहिजेत. हे स्वामींना साधकांच्या, शिष्यांच्या मनावर बिंबवायचे आहे. तो मनाच्या श्लोकातील श्लोक असा आहे-
दिसे लोचनीं ते नसे कल्पकोडी।
अकस्मात आकारलें काळ मोडी।
पुढे सर्व जाईल कांहीं न राहे।
मना संत आनंत शोधून पाहें ॥146॥
या श्लोकातील शेवटच्या ओळीच्या अर्थातून स्वामींनी मनाला उपदेश केला आहे, की ’हे मना, तू संत म्हणजे कायम टिकणारे आहे, जे ’आनंत’ म्हणजे अंत नसलेले कायमस्वरूपी चिरंतन तत्त्व आहे, म्हणजे जे शाश्वत आहे, अशा सद्वस्तूचा, ब्रह्माचा शोध घेत राहा, त्यासाठी प्रयत्नशील राहा.’ हा विचार स्वामींना महत्त्वाचा वाटतो, त्यामुळे स्वामींनी श्लोक क्रमांक 146 ते 150 या पाच श्लोकांत त्याचा पाठपुरावा केला आहे. त्यातील प्रत्येक श्लोकाची शेवटची ओळ ‘मना संत आनंत शोधून पाहे’ अशीच ठेवली आहे. या पाच श्लोकांच्या समुच्चयाला समर्थवाङ्मयाचे अभ्यासक ल. रा. पांगारकर यांनी, राघवाच्या पंथातील निर्गुणबोधाचे ‘दिग्दर्शन’ या अभ्यासगटाखाली आणले आहे. पांगारकरांच्या मते, श्लोक क्रमांक 135 पर्यंत साधकाने सगुणोपासनेच्या द्वारा राघवाचा पंथ कसा आक्रमिता येईल, याचे विवरण आहे. पांगारकरांनी केलेले श्लोकांचे वर्गीकरण ग्राह्य मानून निर्गुणबोधाच्या दृष्टीतून या श्लोकांचे विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे.
’विवेके स्वस्वरूपीं भरावे’ या मागील लेखात आपण ’जगन्मिथ्या’ म्हणजे हे जगत खोटे आहे, यासंबंधी रामदास स्वामींचे विचार समजून घेतले. स्वामींच्या मते, या जगातील दृश्य वस्तू विघटनशील असल्याने ती कायमस्वरूपी असू शकत नाही. म्हणून, ती मिथ्या म्हणजे खोटी आहे. आज जरी जगातील दृश्यवस्तू डोळ्यांना दिसत असली, तरी ती भविष्यात, तशीच राहील याची खात्री देता येत नाही. ‘जगन्मिथ्या’चा तो तत्त्वज्ञानविषयक धागा पुढे चालू ठेवून स्वामी प्रस्तुत श्लोकात सांगत आहेत की, आज ज्या वस्तू आपल्या डोळ्यांना दिसतात; त्या कल्पकोडी म्हणजे अनंतकाळापर्यंत टिकणार्या नाहीत. कालांतराने त्या नष्ट होणार्या आहेत. जगातील सर्व दृश्य वस्तुजात, स्वामी म्हणतात त्याप्रमाणे, विघटनक्षम असल्याने भविष्यात जोडल्या गेलेल्या घटकांचे विघटन झाल्याने त्या वस्तू शिल्लक राहणार नाहीत. तसेच पंचमहाभुतांनी बनलेल्या वस्तूंचे अस्तित्व तात्पुरते असते. ते कायमस्वरूपी असणार नाही. हा आपला नित्याचा अनुभव आहे.
पंचमहाभुतांच्या आश्रयाने आकार धारण करणे आणि मोडून टाकणे, या क्रिया सतत घडत असतात. आज जरी एखादी प्रचंड वास्तू दिमाखात ठामपणे उभी असलेली दिसली; तरी तिला भविष्यात काही होणार नाही, हे कोणी सांगू शकत नाही. इमारत, पूल किंवा तत्सम, भक्कमपणे उभ्या असलेल्या वस्तू यांची झीज होणार असल्याने त्यांच्या अंतिम काळच्या तिथीचा (Expiry date) अंदाज दिलेला असतो. त्या वस्तू अंतिम तिथीपर्यंत अभंग राहतात, असेही नाही. अकस्मात, एखादे नैसर्गिक संकट येऊन त्या वस्तूंची मोडतोड संभवते. भूकंप, अतिवृष्टी, त्सुनामी या आपत्ती होत्याचे नव्हते करून टाकतात. तुम्हाला आठवत असेल की, जुलै 2013 मध्ये उत्तराखंड भागात पावसाने थैमान घातले, नद्यांना महापूर आले.
अलकनंदा नदीच्या काठच्या इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे काही मिनिटांत धडाधड कोसळताना दूरदर्शनवर पाहिल्या. ’अकस्मात आकारले काळ मोडी’ या स्वामींच्या उद्गाराची त्यावेळी प्रचीती आली. याचा अर्थ कशाचीही शाश्वती देता येत नाही. डोळ्यांना दिसणारे जे आकाराला आले, त्याचा कधी ना कधी तरी नाश होणार आहे. सृष्टीची ही कार्यपद्धती अटळ आहे. हा विचार सतत पुढे नेला, तर हे सर्व क्षणभंगूर आहे, त्याची मनाला खात्री पटते. अशावेळी आपण शाश्वताचा शोध घेणे व त्यावर मन केंद्रित करणे आवश्यक आहे, अशी खात्री पटले. दासबोधातही स्वामींनी असाच उपदेश केला आहे.
दृष्टीसि दिसे मनासि भासे।
तितुकें काळांतरीं नासे।
म्हणोनि दृश्यातीत असे।
परब्रह्म तें ॥ 6-9.47॥
परब्रह्म तें शाश्वत । माया तेचि अशाश्वत।
ऐसा बोलिला निश्चितार्थ । नाना शास्त्रीं॥ 6.9.48
म्हणून, माणसाने आपल्या जीवनात शाश्वत परब्रह्माचा शोध घ्यावा. त्यातच खरे समाधान आहे. क्षणभंगूर अशाश्वताच्या नादी लागल्याने - दुःख, निराशा पदरात पडणार आहे. म्हणून, वेळीच सावध होऊन सन्मार्गाला लागावे व सत्याचा शोध घ्यावा.
7738778322