मुंबई : देशात गेल्या काही काळात महिला, मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या अमानुष घचना समोर येत आहेत. कोलकाता मधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येची घटना ताजी असताना बदलापूरमधील दोन चिमुकल्या शाळकरी विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. या प्रकरणावर देशभरातून, राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असताना अभिनेता रितेश देशमुख याने देखील तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
रितेश देशमुखने बदलापूरमधील घटनेला निषेध करत छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या शिक्षेचा दाखला दिला आहे. रितेशने पोस्ट लिहिली आहे की. "एक पालक म्हणून मी पूर्णपणे वैतागलोय, दुखावलोय आणि प्रचंड चिडलोय. दोन चार वर्षांच्या मुलींवर शाळेतील पुरुष सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. शाळा ही मुलांसाठी त्यांच्या स्वतःच्या घरांइतकीच सुरक्षित जागा असायला हवी.या राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळात दोषींना 'चौरंग' शिक्षा द्यायचे. हेच कायदे आपल्याला पुन्हा कृतीत आणण्याची गरज आहे".
काय आहे 'चौरंग' शिक्षा?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात कोणत्याही गुन्ह्याला माफी नव्हती. रांझे गावच्या बाबाजी ऊर्फ भिकाजी गुजर पाटलाने एका महिलेशी गैरवर्तन केले म्हणून त्याला 'चौरंग' शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली होती. चौरंग म्हणजे, आरोपीचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम करणे. दरम्यान, बदलापूर घटनेचा उल्लेख करत इतिहासातील हा न्यायाचा दाखला रितेशने दिला.