मुंबई, दि.२१ : सिडकोतर्फे सातत्याने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता गृहनिर्माण योजना राबविण्यात येतात. सोडतीद्वारे या गृहनिर्माण योजनेतील घरांची विक्री होते. हे पाहता यंदाच्यावर्षी सिडकोतर्फे कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर २७ ऑगस्ट रोजी ९०२ सदनिकांच्या विक्रीकरिता गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती, सिडकोने दिली आहे.
कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर जाहीर करण्यात येणाऱ्या गृहनिर्माण योजनेद्वारे नागरिकांना सर्व पायाभूत सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या नवी मुंबईमध्ये आपले हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे. या गृहसंकुलांना रेल्वे, रस्ते, मेट्रो द्वारे कनेक्टिव्हिटी लाभली आहे. सिडकोच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह सिडकोचे अन्य महत्त्वाकांक्षी प्रकल्प या गृहसंकुलांपासून नजीकच्या अंतरावर आहेत. यामुळे नागरिकांना परिपूर्ण जीवनशैली अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, सिडको महामंडळातर्फे कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर मंगळवार, दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी एकूण ९०२ सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या गृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईतील कळंबोली, खारघर व घणसोली या विकसित नोडमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता ३८ व सर्वसाधारण प्रवर्गाकरिता १७५ याप्रमाणे एकूण २१३ सदनिका तसेच सिडकोच्या खारघर येथील स्वप्नपूर्ती व वास्तूविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलांतील मिळून एकूण ६८९ सदनिकांच्या विक्रीकरिता गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात येणार आहे.