मुंबई : पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी ८ लेन नाशिक फाटा ते खेड अशा ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची निर्मिती करण्यात येणार आहे. आगामी ५० वर्षांतील वाढत्या वाहतुकीचा विचार करुन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ७ हजार ८२७ कोटी इतका खर्च येईल. या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली.
नाशिक फाटा ते पुण्याजवळील खेड पर्यंत 30 किलोमीटर आठ लेन उन्नत राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर बांधा-ऑपरेट-हस्तांतरण (BOT) वर विकसित केला जाईल. यासाठी अंदाजित 7,827 कोटी इतका खर्च येईल. एलिव्हेटेड कॉरिडॉर पुणे आणि नाशिक दरम्यानच्या NH-60 वरील चाकण, भोसरी इत्यादी औद्योगिक केंद्रांवरून निघणाऱ्या/जाणाऱ्या वाहतुकीसाठी अखंड हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. या कॉरिडॉरमुळे पिंपरी-चिंचवडमधील गंभीर गर्दीही कमी होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जाणारा पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी, कासारवाडी, मोशी परिसरात होणारी वाहतूक कोंडी आणि भविष्यकालीन नियोजन म्हणून हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. महामार्गावरील नाशिक फाटा ते मोशीपर्यंत प्रशस्त आठ पदरी रस्ता होणार आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूंना २ लेन सर्व्हिस रोडसह विद्यमान रस्त्याचे ४/६ लेनमध्ये सुधारणा करणे आणि सिंगल पिलरवर टायर-१ येथे ८ लेन ‘एलिव्हेटेड फ्लायओव्हर’चे बांधकाम करण्यात येईल. यामध्ये ८ पदरी रस्ता, मेट्रो लाईन (डबल डेकर), सर्व्हीस रोड, रॅम्प याचा समावेश आहे.
सध्यस्थितीला मोशी या ठिकाणी प्रतिदिन ९६ हजाराहून अधिक वाहनांची, तर खेडमध्ये ६७ हजाराहून अधिक वाहनांची प्रतिदिन रहदारीची नोंद आहे. भविष्यातील वाढत्या रहदारीचा विचार करुन प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मोशीतून तब्बल ६ लाख ७० हजाराहून अधिक वाहनांची प्रतिदिन रहदारी सुलभपणे होवू शकते. खेडचा विचार केला असता प्रतिदिन ३ लाख ९७ हजाराहून अधिक वाहनांची रहदारी प्रतिदिन होईल, अशी क्षमता पुणे-नाशिक ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची राहील असा अंदाज आहे.
स्थानिक प्रवाशांसाठी ‘रोड रॅम्प’ सुविधा
पुणे-नाशिक महामार्गाच्या ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’चे काम पूर्ण झाल्यानंतर पुण्यावरून येणाऱ्या गाड्या विना अडथळा चाकणच्या दिशेने जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. नाशिक फाट्यापासून मोशीपर्यंत जाणाऱ्या स्थानिक प्रवाशांसाठी काही ठिकाणी ‘रोड रॅम्प डाऊन’ करून जाण्याची सुविधा असेल. त्याचपद्धतीने मोशीपासून नाशिक फाट्यापर्यत येणाऱ्यासाठी अशाच सुविधा असतील. तसेच, पुणे विमानतळावरून चाकणकडे जाण्यासाठी मार्गिका राहणार आहे.
या प्रकल्पामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच चाकण परिसराच्या विकासातील एक मोठा अडथळा दूर होईल. यामुळे या भागातील ऑटोमोबाईल क्षेत्र तसेच इतर उद्योगांसाठी लॉजिस्टिक्स क्षमता वाढेल, वाहतूक खर्च कमी होईल तसेच ट्रॅफिक जाम आणि प्रदूषणाची समस्या दूर करण्यास मदत होईल. या कॉरिडॉरला मंजुरी दिल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री