लग्नाची मागणी, फोटो व्हायरल करण्याची धमकी आणि बरंच काही.. उरण हत्या प्रकरणात आता अनेक नवनवीन खुलासे पुढे येताहेत. उरणमधील तरुणी यशश्री शिंदेच्या हत्येबाबत मुख्य आरोपी दाऊद शेखने पोलिसांना आपल्या गुन्ह्याची कबुली तर दिलीच, शिवाय ही हत्या कशी केली, त्यामागे काय कारण होतं? तो यशश्रीला कधीपासून ओळखत होता? त्यांच्यात नेमकं काय घडलं? या सगळ्याची कबुलीही त्याने दिलीये. हीच माहिती जाणून घेऊया.
दिनांक २५ जुलैला मृत तरुणी यशश्री शिंदे दाऊद शेखला भेटायला गेली. त्यानंतर २७ तारखेला तिचा मृतदेह सापडला. मात्र, यशश्रीची हत्या केल्यानंतर दाऊद शेख फरार झाला होता. दिनांक ३० जूलै रोजी कर्नाटकमध्ये पोलिसांनी दाऊदला बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्याला पनवेल सत्र न्यायालयात हजर करून ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलीये. दाऊदवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याशिवाय त्याच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याची कलमेही लावण्यात आली आहेत.
चौकशीदरम्यान दाऊदने अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "दाऊद आणि यशश्री हे दोघं एकाच शाळेत शिकत होते. त्यांचा परिचय होता आणि यातूनच तो तिच्या मागे लागला होता. त्यातच २०१९ मध्ये त्याच्यावर पॉक्सोअंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हातून तुरुंगातून सुटल्यानंतर कोरोनाकाळात तो आपल्या गावी परत गेला. मध्यंतरी तो मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. तो तिला भेटायला बोलवत होता आणि भेटायला आली नाही तर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकीही तो द्यायचा. त्यानंतर २३ तारखेला दाऊद शेख कर्नाटकमधून मुंबईत परत आला. २४ तारखेला तो यशश्रीला भेटला आणि तिला परत भेटण्याची मागणी करत होता. पण ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. त्यानंतर २५ तारखेला त्याने तिला परत बोलवलं. ती भेटायला गेल्यावर तू माझ्यासोबत का राहत नाही, यावरून त्यांच्यात भांडण झालं. तो आधीच आपल्याबरोबर चाकू घेऊन आला होता. त्याने तिच्यावर वार केले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तो तिथून परत कर्नाटककडे पळून गेला," अशी माहिती त्यांनी दिलीये.
दाऊद शेख यशश्रीकडे लग्नाची मागणी करत होता. तसंच तिला कर्नाटकला सोबत येण्याचीही मागणी करत होता. परंतू, तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. एवढंच नाही तर मृत्यूपूर्वी यशश्रीने तिच्या एका मित्राला फोन केला होता. "मी अडचणीत आहे. मला सोडव," अशी विनंती ती त्याला करत होती. परंतू, तो नेटवर्कमध्ये नसल्यानं त्यांच्यात व्यवस्थित बोलणं झालं नाही," अशीही माहिती पोलिसांनी दिलीये.
एकीकडे हे प्रकरण ताजं असतानाच बुधवारी अमरावतीमध्ये एकतर्फी प्रेमातून एका आरोपीने १८ वर्षीय युवतीच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची घटना पुढे आली. हे सगळं बघितल्यानंतर सध्या प्रश्न हा उपस्थित होतो की, या घटना घडण्यामागे नेमकं कारण काय? लोकांना कुणाचाच धाक उरलेला नाहीये का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एखाद्याच्या हत्येपर्यंत पोहोचण्याइतपत हे कुठलं प्रेम?
या प्रकरणांमध्ये समाज म्हणून आपली काय भूमिका आहे आणि या घटनांना आळा घालण्यासाठी आपल्याला काही करता येईल का? याचाही विचार व्हायला हवा. याबद्दल दै.मुंबई तरुण भारतने पुढाकार घेऊन संवाद आपल्या कन्यांशी, माझं शहर लव्ह जिहाद मुक्त शहर, ही चळवळ उभी केली आहे. या अंतर्गत दै.मुंबई तरुण भारतच्या पत्रकार योगिता साळवी यांनी राज्यभरात आत्तापर्यंत २०० सभा घेतल्या आहेत.
उरण सारख्या घटनांमध्ये पालकांचीही मोठी जबाबदारी आहे. पालकांनी आपल्या मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा, हा या मोहिमेचा उद्देश्य आहे. मुलं प्रत्येकवेळी आपल्या आईवडिलांशी बोलतीलच याबद्दल शाश्वती नाहीच. मात्र, पालक आणि मुलांनीही एक विश्वासाचा बंध नात्यात निर्माण करायला हवा, जेणेकरून अशा प्रसंगात योग्य ती कारवाई करता येऊ शकते.
गेल्या महिन्यात वसईत एका तरुणीची प्रियकरानं लोखंडी पान्याने वार करून निर्घृण हत्या केली होती. ही घटना भरदिवसा घडली. ही घटना घडत असताना लोकांची गर्दीही जमली. पण आरोपी तरुणीवर वार करत राहिला आणि सर्व लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. शिवाय काहीजण तर या घटनेचा व्हिडीओ घेण्यात धन्यता मानत होते. मात्र, तिच्या बचावासाठी कुणीच पुढे सरसावलं नाही. जर तेव्हा गर्दीतील लोकांनी त्या आरोपीला अडवलं असतं तर आज ती मुलगी वाचू शकली नसती का? हा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला.
यापूर्वीच्या आलेल्या बातम्यांचा उल्लेख केला तर, कट्टरपंथींनी सऱ्हास आपली नावं बदलून मुलींशी प्रेमसंबंध जोडण्याचा प्रयत्न केलाय. याबद्दलही तरुणींनी जागरूक असण्याची गरज आहे. बऱ्याचदा अशा घटना काही दिवस चर्चेत राहतात त्यानंतर पुन्हा याबद्दल चर्चा होताना दिसत नाही. मुळात यशश्री शिंदे असो किंवा श्रद्धा वाळकर प्रकरण असो, या घटनांकडे बघितल्यानंतर सत्य एकच असतं ते म्हणजे मुलीची हत्या. खरंतर यशश्री आणि श्रद्धाच्या मारेकऱ्यांनी त्यांच्यातल्या विकृतीचंच दर्शन घडवलंय. कायदा पोलीस आणि सुशासन या गोष्टी आहेतच आणि राहतीलही पण सुरुवात आपल्या घरापासून झाली तर भविष्यात कुणा श्रद्धाला किंवा कुणा यशश्रीला आपला जीव गमवावा लागणार नाही.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....