भारतीयांच्या समरस समाजासाठी...

    19-Aug-2024   
Total Views |
rushikesh khanderao adhangale
 
कंत्राटी कारकून ते बँकेचे मॅनेजर झालेले, समाजाच्या समरस विकासाचा ध्यास असलेले, सिद्धार्थ कॉलनी चेंबूरचे ऋषीकेश खंडेराव अढांगळे. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...

महिन्यांपूर्वीची घटना. चेंबूर पोलीस स्थानकासमोर तेलाचा टँकर उलटला. 30 ते 40 लीटर तेल रस्त्यावर सांडले. ही सगळी घटना तिथून दुचाकीवरून जात असताना ‘त्या’ तरुणाने पाहिली. त्यांनी तत्काळ त्यांचे वाहन थांबवले. वाहतूक थांबवणार्‍या संबंधित यंत्रणेला संपर्क केला. मित्रांनाही बोलवून घेतले. लोकांना विनंती करत राहिले की, या मार्गावर तेलाचा टँकर उलटला आहे, मार्ग बंद आहे. त्यांच्या या कृत्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले. त्या तरुणाचे नाव आहे, ऋषीकेश अढांगळे!

सिद्धार्थ कॉलनीत राहणारे ऋषीकेश ‘जनकल्याण बँके’त मॅनेजर आहेत. जिथे यश तर सोडाच, एक संधी मिळायचीही वानवा असते, जिथे स्वतःला यश मिळवण्यापेक्षा ‘मी हे करू शकतो’असे सांगण्यासाठीसुद्धा प्रचंड कष्ट करावे लागतात, त्या परिस्थितीतून आलेल्या ऋषीकेश यांचे बँकेत मॅनेजर होणे, हीसुद्धा अभिमानास्पद गोष्ट आहे. परिसरातील अनेक सामाजिक संस्थांशी ऋषीकेश जोडलेले आहेत. ‘डायनामिक स्पोर्ट्स क्लब’, ‘गाथा बुद्धविहार’ आणि इतर अनेक संस्थांच्या माध्यमातून ते सातत्याने सामाजिक कार्य करत असतात.

अढांगळे कुटुंब मूळचे सिन्नर, वडांगळी गावचे. खंडेराव अढांगळे आणि प्रमिला अढांगळे यांना चार अपत्ये. त्यापैकी एक ऋषीकेश. खंडेराव हे महेंद्रा कंपनीमध्ये कर्मचारी होते. ते उत्तम कवी. खंडेराव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अढळ श्रद्धा आणि निष्ठा. ते सिद्धार्थनगर कॉलनीमध्ये समाजबांधवांसाठी हिरिरीने काम करायचे. त्याकाळी चेंबूर परिसरातील गरीब वस्त्यांमध्ये घरोघरी शौचालये नव्हती. आयाबायांना दूर जावे लागे. खंडेराव यांनी महानगरपालिकेच्या मदतीने शौचालये बांधली. त्यावेळी ‘मोकळ्या जागेवर शौचालये का बांधायची,’ असे म्हणत अनेकांनी त्यांना विरोध केला. पण, खंडू पुरून उरले. “आयाबहिणींना असे उघड्यावर बसावे लागते. जीव गेला तरी मी काम पूर्ण करणारच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजविकासाचा जो मार्ग दाखवला, तो मी सोडणार नाही,” असे त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. हे सगळे ऋषीकेश यांनी पाहिले होते. त्याकाळी कवी नामदेव ढसाळ अढांगळेंच्या घरी येत असत.

साहित्य, कविता, डॉ. बाबासाहेबांचे विचार, समाजाची परिस्थिती यावर नामदेव ढसाळ आणि खंडेराव यांच्या चर्चा होत असत. एकदा, कवी नामदेव ऋषीकेश यांना म्हणाले, ”ऋषी, कोणत्याही परिस्थितीत तू खूप शिक. शिकलास तर जिथे राहतोस, तिथल्या समस्या, त्रास दूर करू शकशील. शिकलास तर ती ताकद येईल. आपल्या बाबासाहेबांनीही कोणत्याही परिस्थितीत शिकायला हवे.” असेच सांगितले. नामदेव ढसाळांचे ‘खूप शिक’ हे म्हणणे ऋषीकेश यांच्या मनावर कोरले गेले. ऋषीकेश ‘चेंबूर एज्युकेशन’च्या शाळेत शिकले. शाळेचे तांबे सर आणि विठ्ठल कांबळे सर हे दोघेही रा. स्व. संघाचे स्वयंसेवक. तांबे सरांचे ऋषीकेश यांच्या घरी नेहमी येणे-जाणे. विठ्ठल सरांचाही संपर्क कायम. त्यामुळे रा. स्व. संघाच्या राष्ट्रनिष्ठ आणि समाजशील विचारांचे संस्कारही ऋषीकेश यांच्यावर झाले.

त्यांना लहानपणी मोठे पोलीस अधिकारी व्हावे, असे वाटायचे. दहावीपर्यंत हे स्वप्न कायम होते. मात्र, ते दहावीला असतानाच खंडेराव यांना कंपनीच्या अतिरिक्त कर्मचारी निवृत्ती या योजनेनुसार कामातून निवृत्त व्हावे लागले. त्यामुळे घरात आर्थिक ओढाताण सुरू झाली. त्यामुळे ऋषीकेश यांनी ठरवले की चटकन नोकरी मिळेल, असे शिक्षण घ्यायचे. त्यांनी महाविद्यालयात ‘कॉम्प्युटर टेक्नोलॉजी’ विषय घेऊन शिक्षण सुरू केले. महाविद्यालयात ‘जनकल्याण सहकारी बँके’ने कॅम्पस मुलाखतीद्वारे ‘अ‍ॅप्रेंटिसशिप’साठी उमेदवार निवडले. त्यात ऋषीकेश यांची निवड झाली. ‘अ‍ॅप्रेंटिसशिप’ ते कंत्राटी कामगार असे सात वर्षे त्यांनी बँकेत काम केले. काम करता करताच त्यांनी एम.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. काही वर्षांनी ‘जनकल्याण सहकारी बँके’त मॅनेजरपदाच्या नियुक्तीसाठी जाहिरात आली. त्यावेळी तोंडी आणि लेखी परीक्षा देऊन मुलाखत देऊन ऋषीकेश बँकेत मॅनेजर पदावर नियुक्त झाले.
 
या सगळ्या काळात त्यांनी त्यांचे सामाजिक कार्यही सुरू ठेवले. त्यामुळेच कोरोनाकाळात महानगरपालिकेने त्यांना ‘नोडल ऑफिसर’ म्हणूनही नियुक्त केले. दररोज सात हजार अन्न पाकिटे चेंबूरच्या गरजू गरीब वस्तीमध्ये वितरीत करायचे. आरोग्य उपचार सुरक्षा यांसदर्भात लक्ष द्यायचे, हे ते काम. या काळात ऋषीकेश यांच्या आईला कोरोना झाला. त्यामुळे ऋषीकेश यांना कुटुंबासकट क्वारंटाईन व्हावे लागले. 14 दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये असताना तिथूनच त्यांनी ‘नोडल ऑफिसर’चे काम पूर्ण केले. त्या 14 दिवसांत त्यांच्या कामामध्ये कोणताही खंड पडला नाही.

कोरोनाकाळातच नाही तर 2005च्या पूरसदृश परिस्थितीमध्ये ऋषीकेश यांनी जीवावर उदार होत बचावकार्य केले. असे हे ऋषीकेश अढांगळे. त्यांचे मत आहे की, ”आपण सगळे भारतीय आहोत. भारताचा समाजाचा विकास हेच आपले ध्येय आहे. त्यासाठी आपसातील जातीय, प्रांतिक, भाषिक दरी दूर करून एकोप्याने भारतीय म्हणून जगले पाहिजे, तशी परिस्थिती निर्माण व्हावी, संवर्धित व्हावी म्हणून काम केले पाहिजे.”

ऋषीकेश अढांगळे यांच्यासारख्या व्यक्ती केवळ चेंबूरसाठीच नव्हे, तर अवघ्या समाजासाठी महत्त्वाच्या आहेत.

9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.