नवी दिल्ली : देशातील कारखान्यामधील नोकरदारवर्गाला दरमहा २० हजार रुपये किंवा त्याहून कमी वेतन मिळत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. दरम्यान, कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा एक मोठा भाग आर्थिक तणावाने ग्रस्त असून घर, आरोग्य सेवा आणि शिक्षण यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत आहे, असेही अहवालातून दिसून आले आहे.
दरम्यान, ५७.६३ टक्क्यांहून अधिक कामगार-केंद्रित नोकऱ्या दरमहा २० हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी पगाराच्या श्रेणीत येतात, असे वर्कइंडिया या तंत्रज्ञानावर आधारित कामगार-केंद्रित भर्ती मंचाने अहवालात म्हटले आहे. एकंदरीत, अनेक कामगार किमान वेतनाच्या जवळपास कमावतात, असे अहवालातून दिसून येते.
त्याचप्रमाणे, सुमारे २९.३४ टक्के कामगार-केंद्रित नोकऱ्या मध्यम उत्पन्न गटातील आहेत. या गटातील कर्मचाऱ्यांना २० हजार ते ४० हजार रुपये प्रति महिना वेतन आहे. तर दुसरीकडे, याच गटातील कामगारांना आर्थिक सुरक्षेत माफक सुधारणांचा अनुभव येतो, परंतु ते आरामदायी जीवनमान गाठण्यापासून दूर आहेत, असेही अहवालात म्हटले आहे.
विशेष म्हणजे या श्रेणीतील उत्पन्न गरजा पूर्ण करते परंतु, बचत किंवा गुंतवणुकीसाठी फारसा वाव दिसून येत नाही. ज्यामुळे या श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या वर्गाची आर्थिक दुर्बलता अधोरेखित होते. परिणामी, कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या बहुतांश कामगारांचा पगार कमी वेतनामुळे आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते.