रसिका शिंदे-पॉल
मुंबई : ७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यात मराठी चित्रपटाने विशेष बाजी मारली असून मधुगंधा कुलकर्णी निर्मित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे. याच निमित्ताने चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेते सुबोध भावे यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. १२ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित झालेला ‘वाळवी’ हा चित्रपट दोन लग्न झालेल्या जोडप्यांच्या आयुष्याभोवती फिरणारा आहे.
सुबोध भावे म्हणाले की, “मनोरंजनसृष्टीच्या माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी भूमिका केलेल्या कोणत्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नव्हता. पण मी ज्या चित्रपटाचा भाग होतो त्यातील कलाकरांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. म्हणजे बालगंधर्वसाठी आनंद भाटे, विक्रम गायकवाड किंवा कट्यार काळजात घुसली या चित्रपटासाठी गायक महेश काळे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पण चित्रपटाला मिळाला नव्हता. पण वाळवी या चित्रपटाचा मी भाग आहे आणि त्या चित्रपटालाच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे याचा अतिशय आनंद झाला आहे. आणि मला वैयक्तिक पातळीवर सर्वाधिक आनंद हा वाळवीचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्यासाठी झाला आहे. कारण, इतकी वर्ष उत्तमोत्तम चित्रपट त्यांनी आजवर दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाची योग्य पावती त्यांना या राष्ट्रीय पुरस्काराच्या स्वरुपात मिळाली असे नक्कीच म्हणेन”.
‘वाळवी’ चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगायचे झाल्यास अवनी म्हणजेच अनिता दाते -केळकर आणि अनिकेत म्हणजे स्वप्नील जोशी हे दोघं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. आर्थिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही म्हणून त्यांच्यासमोर आत्महत्या हाच उपाय आहे, असं त्यांना वाटतं. मात्र, प्रत्यक्षात ही आत्महत्या नसून खुनाचा प्रयत्न आहे आणि त्याचं प्लॅनिंग अनिकेत आणि त्याची प्रेयसी देविका म्हणजेच शिवानी सुर्वे यांनी केलं आहे. अनिकेतला त्याच्या बायकोपासून सुटका मिळवण्यासाठी हे कारस्थान रचलेलं असतं. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये अजून एक व्यक्ती सामील असते. त्यामुळे काटकारस्थानचा नेमका हेतू काय होता? याची उत्तरं चित्रपट पाहिल्यावरच मिळतील.