परिस्थिती आणि अंधत्व अशा आव्हानांना सामोरे जात, समाजापुढे नवा आदर्श निर्माण करणार्या नाशिकच्या अंजली संदेश नारायणे यांच्याविषयी...
नाशिकमध्ये जन्मलेल्या अंजली नारायणे यांचे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण पुष्पावती रूंगटा कन्या विद्यालयात, तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण लासलगावच्या जिजामाता कन्या विद्यालयात झाले. अंजली जन्मतः अंध नव्हत्या. प्राथमिक शाळेत असताना आपण बाहेरून, उजेडातून घरात आलो की, आपल्याला काही दिसत नाही, हे त्यांच्या लक्षात आले. अंजली यांच्या आईवडिलांनी यावर उपाय शोधण्यासाठी अनेक रुग्णालयांना भेटी दिल्या. इयत्ता तिसरीत असताना त्यांना चश्माही लागला. पुढे इयत्ता अकरावी-बारावीत कॉमर्स शाखेतून शिक्षण घेत असताना ‘अकाउंट्स’ विषयाचा अभ्यास करत असताना अंजली यांच्या लक्षात आले की, आपण करत असलेली बॅलन्सशीटच्या रकान्यांमधील आकडेमोड वर-खाली लिहिली जात आहे. त्यामुळे आपल्याला टॅली करणे अवघड जातेय. आपल्या डोळ्यांचा त्रास आधीपेक्षा वाढल्याची जाणीव त्यांना झाली.
तिथूनच त्यांच्या अंधत्वाकडे जाणार्या प्रवासाची सुरुवात झाली. त्याच सुमारास, अंजली यांच्या ऑडिटर असलेल्या वडिलांची लासलगावहून नाशिकला बदली झाली. बी.कॉमचे शिक्षण घेण्यासाठी अंजली यांनी केटीएचएम महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या बी.कॉम.च्या तृतीय वर्षाला असताना, महाविद्यालयाच्या पोर्चमध्ये, पुरेसा सूर्यप्रकाश येईल, तिथे मांडी घालून बसत पेपर दिले. या परीक्षेत प्रथम श्रेणीत गुण मिळवत १९९४ साली त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी मिळवली. त्यांना रंग ओळखणे कठीण झाले. १९९६ साली अंजली ‘एलएलबी’ करत होत्या, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नंतर ते सोडून दिले. लग्नाचा तगादा लागल्यानंतर त्यांनी लग्नाची घाई न करता पुढील शिक्षणासाठी अंध शाळेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘नॅब’ या अंधशाळेत जाऊन नंदिनी बेनरावल यांची भेट घेतली. यावेळी त्यांना अहमदाबाद-वस्त्रापूर येथील ‘ब्लाइंड पीपल्स असोसिएशन’ संस्थेची माहिती मिळाली.
दिव्यांगांसाठी कार्य करणारी भारतातील ही सर्वात मोठी संस्था असल्याने वडिलांच्या सोबतीने अंजली १९९७ साली अहमदाबाद येथे दाखल झाल्या. वाणिज्य शाखेची पार्श्वभूमी असतानाही भविष्यात चरितार्थ चालविण्यासाठी ‘ब्लाइंड पीपल्स असोसिएशन’ येथे फ़िजिओथेरपीचा दिव्यांगांसाठी असणारा कोर्स केला. मूळचे मुंबईचे संदेश नारायणे हेदेखील तिथे शिक्षण घेण्यासाठी आले होते. शिक्षण घेत असताना दोघांची ओळख झाली. पुढे, २००१ मध्ये ओळखीचे रूपांतर विवाहात झाले. २००४ साली दोघांनी नाशिकच्या एमजी रोड येथे छोटासा दवाखाना टाकला. अंध व्यक्ती उपचार कसे करेल, यामुळे त्यांच्याकडे रुग्णच येत नव्हते. पुढे २००९ साली दोघांनाही ‘बँक ऑफ बडोदा’मध्ये नोकरी लागली. यादरम्यान, २००२ साली अंजली यांनी एका बाळाला जन्म दिला. तेव्हा त्यांनी डॉक्टरांना विचारले, “बाळाला नीट दिसतं ना?” डॉक्टरांनी बाळ टकमक पाहत असल्याचे सांगितल्यावर, अंजली यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. एके दिवशी बाळाला अंघोळ घालताना त्याच्या नाकातोंडात पाणी गेले.
बाळाचा आवाज येईना. लक्षात येताच, त्याला पालथे करून पाणी काढले. रंग कळत नसल्याने बाळाच्या शर्ट-पँटची वेगवेगळी बटणे अंजली स्पर्शाने ध्यानात ठेवत. बाळाची शी-शू काढणे, पेज तयार करणे, कानात पेज किंवा रस जाऊ नये म्हणून गळ्याभोवती कापड बांधणे, असे सगळेच त्या करत. बाळाच्या हालचालींची जाणीव व्हावी म्हणून त्यांनी मुलगा नचिकेतच्या पायात पैंजणांची घुंगरं बांधली. अंजली या ‘स्वाध्याय’ परिवाराच्या असल्याने साहजिकच त्या अध्यात्म, भगवंत, हिंदुत्व, स्वातंत्र्यवीर सावरकर, देशकार्य यांच्याशी जोडल्या गेल्या होत्या. ‘दिव्यांग व्यक्ती नेहमी इतरांकडून घेण्याचे काम करतात, देण्याचे नाही’, असे म्हटले जाते; पण हा समज समाजातून काढून टाकण्यासाठी ‘समर्थ भारत मंच’ची २०१९ साली स्थापना केली.
२०१९ साली ‘समर्थ भारत मंच’च्या वतीने, ‘बदलत्या भारतात हिंदुत्वाची वाढती जबाबदारी’ या विषयावर पहिले चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. दर महिन्याच्या १९ तारखेला विविध विषयांवर वेबिनार्स आयोजित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
कोरोना काळात २०२१ साली ऑनलाईन संस्कृत पाठशाळा घेतली. ऑडिओ बुक्स आणि व्याख्याने यांचा नावीन्यपूर्ण असा ‘ज्ञानगंगा’ नावाचा व्हॉट्सअॅप समूह साधारण २०२० मध्ये सुरू केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्यावरील मृणालिनीताई जोशी यांनी लेखन केलेले ‘राष्ट्राय स्वाहा!’ या पुस्तकाचे ध्वनिमुद्रण केले. दि. २४ मार्च २०२३ रोजी ‘राष्ट्राय स्वाहा’च्या लोकार्पणाचा पुण्यात भव्यदिव्य सोहळा पार पडला. या ध्वनिमुद्रित पुस्तकाला लाखाहून अधिक श्रोते अल्पावधीतच लाभले. आजवर २५हून अधिक पुस्तके या उपक्रमासाठी ध्वनिमुद्रित केली गेली आहेत. फिजिओथेरपीच्या वैद्यकीय कार्यातून अंजली या आजही निःशुल्क सेवा देत आहेत. ‘समर्थ भारत मंच’च्या रूपातून ‘राष्ट्राय स्वाहा’सारखी संस्कारमूल्ये, राष्ट्रमूल्ये देणारी पुस्तके ध्वनिसंचात आणली. ‘नेत्र दिव्यांगांनी राष्ट्रनिर्मितीसाठी उचललेले एक पाऊल’ असा पण करत तरुण-तरुणींमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवणार्या अंजली नारायणे यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...