केशकर्तनालयात पुरुषांचे केस कापण्यापासून ते नंतर मेकअपच्या क्षेत्रापर्यंत यशस्वी मजल मारलेल्या न्हावी समाजाच्या सुकन्या अमृता उषा वास्के यांच्याविषयी...
कुठल्याही समाजात स्त्री-पुरुषांच्या कामांची एक सर्वसाधारण विभागणी आधीपासूनच केलेेली असते. पण, घरातील पुरुषांचे एकामागून एक आकस्मिक निधन झाल्यामुळे प्रसंगी स्त्रीला आर्थिक भार आपल्या खांद्यावर उचलण्यासाठी अपरिहार्यपणे पुढाकार हा घ्यावाच लागतो. न्हावी समाजातील अमृता उषा वास्के यांच्याबाबतीतही असंच काहीसं घडलं. मुलीच्या हातात कात्री असू शकते आणि ती चक्क पुरुषांचे केसही कापू शकते, ही कल्पना अजूनही जगद्मान्य नाही. पण, आपल्या कुटुंबाचा, आई आणि मोठ्या बहिणीचा सांभाळ करण्यासाठी लोकांच्या नजरांना झुगारून अमृता यांनी त्यांच्या पिढीजात न्हावी व्यवसायात पाऊल ठेवले आणि महिला उद्योजिका म्हणून नाव कमावले. जाणून घेऊयात त्यांच्या संघर्षमय प्रवासाबद्दल....
अमृता यांचे बालपण दादरमधील शिवाजी पार्क येथे गेले. साने गुरुजी विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ‘कीर्ती’ आणि ‘नॅशनल कॉलेज’मध्ये त्यांनी प्रवेश घेत अनुक्रमे बारावी आणि पदवीचे शिक्षण पूर्ण केले. मुळात अमृता यांनी ‘मॅनेजमेंट’ किंवा ‘एच.आर’ या क्षेत्रात ‘एमबीए’ करून थेट परदेशी जावं, अशी त्यांच्या भावाची इच्छा होती. पण, त्यांच्या कौटुंबिक अडचणींमुळे त्यांचा तो प्रवास अर्धवटच राहिला. अमृता यांच्या आजोबांचं दादर शिवाजी पार्क येथे ‘अशोक सलून’ होते. पिढ्यान्पिढ्या त्यांचा न्हाव्याचा व्यवसाय सुरू होता. आजोबांच्या निधनानंतर अमृता यांच्या वडिलांनी, त्यांच्या निधनानंतर भावाने आणि भावाच्या निधनानंतर अमृता आणि त्यांच्या आईने तो व्यवसाय हाती घेतला. मुळात न्हावी म्हणजे पुरुषच असणार, या विचारांना छेद देत अमृता यांनी थेट हातात कात्री घेऊन पुन्हा ठप्प पडलेला व्यवसाय सुरू केला. काही काळानंतर अमृता यांनी पुरुषांसोबत स्त्रियांसाठीही तेथेच पार्लर सुरू केले. पण, ‘अशोक सलून’ या नावामुळे स्त्रिया पार्लरमध्ये येण्यास संकोचत होत्या. त्यामुळे सलूनचे नाव ‘वास्केस’ करत दुकानाचा पूर्णपणे कायापालट अमृता यांनी केला. त्यासाठी २० लाख रुपयांचे त्यांनी कर्जही काढले आणि रात्रंदिवस मेहनत करून ते फेडलेसुद्धा.
अमृता यांचा हा प्रवास खरंतर फार सोप्पा नव्हता. असं म्हणतात की, त्यांच्या हातात पिढीजात व्यवसाय आला, तो त्यांना पुढे न्यायचा होता. पण, केवळ मालक असून चालत नाही, तर आपला व्यवसाय किंवा उद्योग उंच शिखरावर नेण्यासाठी शिक्षण फार गरजेचं असतं आणि त्याचमुळे अमृता यांनी हेअर, मेकअपच्या शिक्षणासाठी शासनातर्फे शिकवला जाणारा कोर्स केला. त्यानंतर, ‘मेकअप’ या भागात त्यांचा विशेष कल निर्माण झाल्यामुळे त्यांनी अन्य आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सचे कोर्स केले. अशाप्रकारे शिक्षणाच्या जोरावर त्यांनी महिला उद्योजिका म्हणून स्वत:ला सिद्ध केले. एकीकडे त्यांचं आर्थिक गणित उत्तम सुरू होतं, पण काळाचा घात झाला आणि अमृता यांचा मोठा अपघात झाला. तो अपघात इतका भयंकर होता की, अजूनही त्यांच्या नाकाच्या हाडाला झालेल्या इजेमुळे मेंदूच्या नसांना दुखापत झाली. त्यांना ‘ओपन ब्रेन सर्जरी’चा सल्ला डॉक्टरांनी दिला असून, भारतात ती शस्त्रक्रिया होत नसल्यामुळे आणि ती केल्यामुळे त्यांच्या जीवाला आजही धोका असल्यामुळे अमृता त्याच जखमेसोबत आयुष्य जगत आहेत आणि आपला व्यवसाय करत आहेत. केवळ, पार्लरवरच सीमित न राहता, अमृता यांनी मनोरंजनसृष्टीकडे वळण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, मेकअपचे धडे त्यांनी सुप्रसिद्ध रंगभूषाकार पंढरीदादा जुकर यांच्याकडे घेतले. त्यांच्यासोबतीने कलाकारांच्या मेकअपसाठी त्यांनी पंढरीदादांसोबत साहाय्यक म्हणून काम केले आणि त्यानंतर ‘झी मराठी वाहिनी’सोबत अनेक कार्यक्रम आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये ‘मेकअप आर्टिस्ट’ म्हणून काम केलं. तसेच, ज्यावेळी आर्थिक अडचणी होत्या, त्यावेळी कॅटलॉग शूटिंग, लग्नसोहळे, प्रीवेडिंग शूटदेखील केलं. अमृता यांनी नाइलाजास्तव हा मार्ग स्वीकारला.
अमृता या उद्योजिका तर आहेतच, याशिवाय समाजकार्यातही त्यांचा मोठा हातभार आहे. ‘गाझा कारवा’ या रोडट्रीपमध्ये त्या सामील झाल्या होत्या. ‘गाझा-इस्रायल’मध्ये झालेल्या युद्धावेळी तेथील लहान मुलांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी भारतातून काही प्रतिनिधींची निवड करण्यात आली होती. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी निवड झालेल्या चार जणांपैकी एक अमृता वास्के होत्या. त्यांनी रस्तामार्गाने सात देशांच्या सीमा पार केल्या होत्या. त्यात पाकिस्तान, इराण, तुकीर्ये, सीरिया, लेबनॉन असे सात देश त्यांनी पार करत गाझामध्ये समाजकार्य करण्यासाठी तेथे पोहोचल्या होत्या. त्यांच्या या अद्भुत कामासाठी त्यांना १२ पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आले होते. स्त्री म्हणजे चूल-मूल आणि स्त्रियांनी शिक्षण घेतले तरीही त्यांनी काम करायचे नाही. केवळ, घरातच राहायचे, अशी विचारसरणी असणार्या आपल्या आजोबांच्या चहूबाजूचे कुंपण तोडून अमृता वास्के यांनी आज प्रामुख्याने न्हावी हा व्यवसाय केवळ पुरुषप्रधान आहे, हा ठपका पुसून टाकला असून, आपल्या समाजात एक आदर्श निर्माण केला. शिवाय, त्यांच्या या प्रवासात त्यांच्या पतीनेदेखील त्यांना खंबीरपणे साथ दिल्यामुळे स्वत:ची स्वप्नं पूर्ण करण्याचा विश्वास त्यांना लग्नानंतरही मिळाला आहे. अमृता वास्के यांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी ‘दै. मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!