ट्रम्प आणि हॅरिस यांच्यातील वाढती चुरस

    13-Aug-2024   
Total Views |
american presidential election
 

कमला हॅरिस यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर अध्यक्षपदाची चुरस पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. अमेरिकेतील माध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांमध्ये ट्रम्प यांच्याबद्दल पराकोटीचा द्वेष आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली आहे. जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वादविवादाच्या पहिल्या फेरीमध्ये बायडन पूर्णपणे निष्प्रभ ठरले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाला आणि केवळ नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले. कानाला गोळी चाटून गेल्यानंतरही त्यांनी रक्तबंबाळ अवस्थेत आपल्या समर्थकांना आपला लढा सुरुच ठेवायला सांगितले. यावेळी दि. 5 नोव्हेंबर 2024 रोजी होणार्‍या निवडणुकीत ट्रम्प यांचा विजय औपचारिकता आहे, असे वाटू लागले. त्यानंतर त्यांनी उपाध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून जे. डी. वान्स यांचे नाव घोषित करून आश्चर्याचा धक्का दिला. आपल्या ख्रिस्ती मतपेढीला न चुचकारता अमेरिकेतल्या श्रमिकांचे तसेच सैनिकांचे प्रतिनिधित्व करणार्‍या वान्स यांना उमेदवारी देऊन त्यांनी नवीन मतपेढी आकृष्ट केली. दबावाखाली आलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने अध्यक्ष जो बायडन यांना निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यायला भाग पाडले. त्यांनी उपाध्यक्ष कमला हॅरिस या अध्यक्षपदाच्या उमेदवार असतील असे घोषित केले.

अल्पावधीतच डेमोक्रॅटिक पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी हॅरिस यांना पाठिंबा दिला. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाठिंबा दिल्यामुळे कमला हॅरिस यांना अल्प काळात पक्षाचे अधिकृत उमेदवार होण्यासाठी आवश्यक असलेली मतांची जोडणी करता आली. कमला हॅरिस यांना उमेदवारी मिळाल्यावर डेमोक्रॅटिक पक्षाला मिळणार्‍या देणग्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर अमेरिकेतील पुरोगामी माध्यमांनी कमला हॅरिस यांच्या प्रतिमा संवर्धनासाठी जोर लावला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अमेरिकेला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करुन देऊया,’ या घोषणेला अमेरिकेत समानता, सक्षमता आणि कायद्याचे राज्य या घोषणांनी उत्तर दिले. भारतात ज्या प्रमाणे सोनिया गांधींची प्रतिमा पुरोगामी माध्यमांनी उभी केली होती, तसाच प्रकार अमेरिकेत चालू आहे. तुलना करण्याचे कारण म्हणजे, कमला हॅरिस यांनी उमेदवारी घोषित झाल्यापासून पत्रकारांना एकही मुलाखत दिली नाही. त्या आपले भाषण टेलिप्रॉम्प्टरशिवाय करू शकत नाहीत.

अमेरिका आजही जगातील एकमेव महासत्ता म्हणून ओळखली जाते. अमेरिकेच्या अध्यक्षांना जागतिक विषयांचे सखोल ज्ञान असणे अपेक्षित असते. अनेकदा राजकीय नेते अमेरिकेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचतात, तेव्हा त्यांना जगाची फारशी माहिती नसते. ते मुख्यतः स्थानिक राजकारणातच गुंतलेले असतात. पण, अध्यक्षपदावर बसताच ते आंतरराष्ट्रीय विषय आत्मसात करतात. कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष झाल्या, तेव्हा त्या नवख्या होत्या. पण, गेल्या चार वर्षांमध्ये 17 परदेश दौरे केले असून 21 देशांना भेट दिली आहे. त्यांनी 150 हून अधिक जागतिक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. असे असताना त्यांच्या भाषणांतील मुद्दे ऐकले तर धक्का बसतो. केवळ भावनांना हात घालून अमेरिकेतील कृष्णवर्णीय, हिस्पॅनिक आणि गरिबांची मतं मिळवण्याची त्यांची योजना असावी असे वाटते.

कमला हॅरिस यांच्याबाबत सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांची विचारधारा नेमकी काय आहे, तेच कळत नाही. कॅलिफोर्निया राज्याच्या सिनेटर आणि त्यापूर्वी सरकारी वकील म्हणून त्यांनी अवघ्या आठ वर्षांपूर्वी विविध विषयांवर अत्यंत टोकाची डावी भूमिका घेतली होती. अशा भूमिका अमेरिकेच्या अन्य राज्यांमध्ये चालणार नाही, असे लक्षात आल्यावर त्यांनी अचानक त्याच विषयांवर अत्यंत मध्यममार्गी भूमिका घेतली आहे. ‘हमास’विरुद्ध इस्रायलच्या युद्धात अध्यक्ष जो बायडन इस्रायलच्या पाठी अत्यंत खंबीरपणे उभे राहिले. उपाध्यक्ष म्हणून कमला हॅरिसही सरकारच्या निर्णयांसाठी जबाबदार आहेत. पण, उमेदवारी जाहीर होताच त्यांनी मतपेटीचे राजकारण करायला सुरुवात केली. अरब आणि मुस्लीम मतांसाठी त्यांनी इस्रायलवर टीका करायला सुरुवात केली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करण्यासाठी आले असता कमला हॅरिस सिनेटच्या पदसिद्ध अध्यक्ष असूनही या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्या.

कमला हॅरिस यांच्या जोडीला डेमोक्रॅटिक पक्षाचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून पेनसिल्वानिया राज्याचे गव्हर्नर जोश शापिरो यांचे नाव आघाडीवर होते. पण, त्यांनी विद्यार्थीदशेत लिहिलेल्या लेखात पॅलेस्टिनी लोकांना इस्रायल-पॅलेस्टाईन शांतता करारातील सगळ्यात मोठा अडथळा आहे, असे म्हटल्याचे समोर आल्यामुळे त्यांना पॅलेस्टिनी लोकांची माफी मागायला लावली. त्यामुळेच त्यांच्याऐवजी मिनिसोटा राज्याचे गव्हर्नर टिम वॉल्झ यांची निवड करण्यात आली, असे म्हटले जाते. वॉल्झ हे टोकाच्या डाव्या विचारसरणीचे आहेत. गाझा युद्धादरम्यान अमेरिकेतल्या अनेक विद्यापीठांमध्ये हिंसक आंदोलनं उभी राहिली. त्यांत यहुदी विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले. तेव्हापासून अमेरिकेतल्या यहुदी समाजात अस्वस्थता आहे. पारंपरिकरित्या 80 टक्क्यांहून अधिक ज्यू धर्मीय मतदार डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करतात. पण, या घटनांमुळे या वर्षी अनेकजण पहिल्यांदाच रिपब्लिकन पक्षाला मतदान करतील असे वाटते. केवळ एवढ्यावरच न थांबता अमेरिकेतील इस्रायल समर्थक संस्थांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अरब-मुस्लीमधार्जिण्या उमेदवारांना प्राथमिक फेरीतच पराभव करण्यासाठी ताकद लावली.

म्यानमारमधील यादवी युद्धाचा फायदा घेऊन तेथे ख्रिस्ती देश स्थापन करण्यासाठी बांगलादेशमध्ये सत्तांतर घडवण्यात आले. त्यात अमेरिकेतील संस्थांनी बजावलेली कामगिरी आता लोकांसमोर येऊ लागली आहे. बायडन सरकारच्या छुप्या पाठिंब्याशिवाय हे सत्तांतर शक्य नव्हते. या सत्तांतराची सगळ्यात जास्त झळ बांगलादेशमधील हिंदूंना सोसावी लागली. शेकडो हिंदूंना मारण्यात आले असून हिंदूंची अनेक गावं जाळण्यात आली. गाझा पट्टीकडे डोळे लावून बसलेल्या मानवाधिकारवादी संघटनांनी बांगलादेशच्या हिंदूंकडे दुर्लक्ष केले. अगदी ‘न्यूयॉर्क टाईम्स’नेही आपल्या मथळ्यात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांना बदला म्हणून एका प्रकारे हिंदूंनाच दोष दिला. ज्यू लोकांप्रमाणे अमेरिकेतील भारतीयही डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करतात. स्वतः कमला हॅरिस यांची आई जन्माने हिंदू होती. दुर्दैवाने भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांमध्ये मतदानाचे प्रमाण खूप कमी आहे. पण, त्यांच्यातीलही एक वर्ग आता रिपब्लिकन पक्षाकडे वळू लागला आहे.

कमला हॅरिस यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर अध्यक्षपदाची चुरस पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. अमेरिकेतील माध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांमध्ये ट्रम्प यांच्याबद्दल पराकोटीचा द्वेष आहे. ‘फॉक्स न्यूज’ वगळल्यास ‘न्यूयॉर्क टाईम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘एनबीसी’, ‘एमएसएनबीसी’, ‘एबीसी’ अशा प्रस्थापित माध्यमांनी उघडउघड ट्रम्पविरोधी भूमिका घेतली आहे. दि. 6 जानेवारी 2021 रोजी ट्रम्प यांच्या भाषणानंतर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अमेरिकेच्या संसद भवनात धुडगूस घातला. त्याचे निमित्त करून ट्विटर, फेसबुक आणि युट्यूबसारख्या समाजमाध्यमांनी ट्रम्पवर बंदी घातली. त्यानंतर ट्रम्प यांनी स्वतःचे ‘ट्रुथ’ हे समाजमाध्यम सुरू केले. कालांतराने जेव्हा एलॉन मस्कने ‘ट्विटर’ विकत घेतले आणि त्याचे ‘एक्स’ असे नामकरण केले, तेव्हा त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रित केले होते.

पण, तेव्हा ट्रम्प यांनी त्यास नकार दिला होता. पण, वाढती स्पर्धा पाहून ट्रम्प यांनी ‘ट्विटर’वर परतण्याचा निर्णय घेतला. एलॉन मस्क यांनी स्वतः ट्रम्प यांची मुलाखत घेतली आणि ती दहा लाखांहून अधिक लोकांनी थेट प्रक्षेपणात ऐकली. पुढच्या महिन्यात ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात दोन वादविवादांच्या फेर्‍या आहेत. तोपर्यंत या निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहोचेल. अमेरिकेतील निवडणुकांचे भारतावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असल्याने भारतीय वंशाच्या लोकांनी त्यात सक्रियता वाढवणे आवश्यक आहे.

अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.