मानवानं निसर्गातीलच एक घटक असलेल्या सापाशी साधलेला हा संवाद. विशेषत: विदर्भात ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाला असेल त्यावेळी त्याच्या शरीरातील सापाचं विष उतरवण्यासाठी मांत्रिकाद्वारे हा मंत्र म्हटला जातो. या मांत्रिकांसाठी विदर्भात अरबाडी असा खास शब्द आहे. शिवाय दरवर्षी नागपंचमीला हे अरबाडी म्हणजेच मांत्रिक आपल्या शिष्यांना वारूळापर्यंत घेऊन जातात, तिथे पूजा करतात आणि या मंत्राची उजळणी करतात. विदर्भात नागपंचमीला आणखी काय काय केलं जातं? तिथे नागपंचमी कशी साजरी केली जाते? नागपंचमीची पूजा कशी करतात? या सगळ्याबद्दल जाणून घेऊया.
खरंतर, शेतकऱ्यांचा निसर्गातील सर्वात जवळचा मित्र आणि ज्याच्याविषयी प्रत्येकाच्याच मनात कायम भीती असते असा प्राणी म्हणजे साप. कधीकाळी साप दिसला की, तो आपल्याला काही करण्याच्या आधी भीतीपोटी आपणच त्याला मारून टाकतो. पण प्रत्येकच साप हा काही विषारी नसतो. त्यामुळे सापाला मारण्याचं प्रमाण कमी व्हावं, सापाविषयी जनजागृती व्हावी आणि सापाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी नागपंचमी हा सण साजरा केला जातो.
नागपंचमी हा श्रावणातला महत्वाचा सण. श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी. खरं म्हणजे ग्रामीण भागात या सणाला विशेष महत्व. या दिवशी स्त्रिया नागाची पूजा करून त्याला दुध आणि लाह्यांचा नैवद्य दाखवतात. यावेळी त्याच्या वारूळाचीदेखील पूजा करतात. पावसाळ्यात नागांच्या बिळात पाणी गेल्यामुळे ते नष्ट होतात. त्यामुळे या काळात अनेक नाग बिळातून बाहेर येतात. शिवाय नागांचा हा प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे नाले, ओढे, नद्या, झुडूपं अशा अनेक ठिकाणी लहान-मोठे साप आढळतात. विशेष म्हणजे सापाला दूध पाजलं की, आपल्याला विषबाधा होत नाही, अशी एक समजूत आहे. पण यात तथ्य नाही. सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे उंदीर शेतातील पीक खाऊन नासाडी करतात. मात्र, साप उंदीर खात असल्यानं त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात.
विदर्भात लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी उत्साहात नागपंचमी साजरी करतात. इथली मुलं आजही नागपंचमीला शाळेत जाताना आपल्या पाटीवर एका बाजूला नागाचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला सरस्वती काढतात. शिवाय सोबत हळदी, कुंकू, लाह्या, फुटाणे असं पुजेचं सामानही घेऊन जातात. त्यानंतर शाळेत पाटीवर काढलेल्या या सर्व नागांची पूजा केली जाते.
त्यानंतर शेतकरीही लाह्य, फुटाणे, ज्वारीचे दाणे असं मिश्रण करून आपल्या संपूर्ण शेतात फेकतात. यादिवशी वर्षभर उंदरांपासून आपल्या पीकांचं रक्षण करणाऱ्या सापाविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. ग्रामीण भागातील महिला लाह्या, फुटाणे, दूध, केळी आणि पुजेचं साहित्य घेऊन जात नागाची आणि वारुळाची पूजा करतात. शिवाय यादिवशी काहीही चिरणे, कापणे, भाजणे, तळणे, नांगरणे या गोष्टी वर्ज्य समजल्या जातात. आपल्या हातून चुकूनही नागाला ईजा होऊ नये, ही त्यामागची भावना. त्यामुळे यादिवशी पुरणपोळीऐवजी पुरणाचे दिंड करण्याची प्रथा आहे. शिवाय यादिवशी विदर्भातील प्रत्येक घरी शिऱ्याचा प्रसाद केला जातो. या प्रसादाला कढई असं विशेष नाव आहे. आणि नागपंचमीला केल्या जाणाऱ्या शिऱ्याच्या प्रसादासाठीच कढई हा खास शब्द वापरला जातो. एवढंच नाही तर नागपंचमीला घरोघरी वेगवेगळ्या प्रकारच्या करंज्याही केल्या जातात. काही भागात नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणी म्हणत झोके घेतात.
मुख्य म्हणजे ग्रामीण भागात नागपंचमीच्या दिवशी बाजार चौकात काही माणसं लाह्या, फुटाणे भाजून देतात. गावातील लोक आपल्या घरचे चने आणि मोतीचुर घेऊन जातात आणि ही मंडळी त्याचे फुटाणे आणि लाह्या तयार करून देतात. गावातील मंदिरात दिवसभर नागपंचमीची गाणी लावली जातात. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो.
मध्य प्रदेशातील सातपूडा पर्वत रांगेचा एक भाग असलेलं पछमडी हे एक थंड हवेचं ठिकाण. इथे नागद्वार हे महादेवाचं प्रसिद्ध मंदिर. नागपंचमीच्या काळात दरवर्षी लाखों भारतीय याठिकाणी दर्शनाला जातात. विदर्भातीलही अनेकजण या यात्रेकरिता जात असतात.
निसर्गात सर्वच प्राण्यांना आपापलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. सर्वच साप विषारी नसल्यामुळे सरसकट सापांविषयी भीती बाळगून त्यांना मारून टाकणं योग्य नाही. साप हा निसर्गाचा एक घटक आहे. तो उंदीर, घुशी, बेडूक इ. प्राण्यांना खाऊन त्यांचं नियंत्रण साधतो. निसर्गाचं संतुलन साधायचं असेल, तर या निसर्गघटकांचं संरक्षण होणं गरजेचं आहे. त्याकरिता आपल्या संस्कृतीमधील नागपंचमीसारखे सण महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे निसर्गाच्या संवर्धनाकरिता असे सण-उत्सव काही अंधश्रद्धांना वगळून जाणीवपूर्वक साजरे करणं गरजेचं आहे.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....