जळगाव : लाडकी बहिण योजनेच्या निमित्ताने देण्यात येणारे पैसे हे फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीजेची ओवाळणी नाही तर वर्षभर दिला जाणारा माहेरचा आहेर आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे. जळगाव येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून मिळणाऱ्या दीड हजार रुपयांतून आपण आपल्या कुटुंबाला सांभाळण्याचं काम करणार आहोत. काही लोकं म्हणतात की, दीड हजार रुपयांमध्ये काय होणार? काही म्हणतात भीक देताहेत, पण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना लाज वाटायला हवी. काहीजण म्हणतात की, ही योजना फक्त निवडणूकीपुरती आहे, पण ही योजना एका महिन्यात तयार झालेली नाही तर त्यासाठी ८ ते १० महिने तयारी करावी लागली."
"विरोधक म्हणाले की, लाडकी बहिण आणली, लाडक्या भावांचं काय? पण खरंतर बोलणाऱ्यांना सख्खा भाऊ, चुलत भाऊसुद्धा महत्वाचा नाही," असा टोलाही मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता लगावला. "त्यांनी बोलल्यानंतर आम्ही लाडक्या भावांनासुद्धा प्रशिक्षण भत्ता देण्याच निर्णय घेतला. हे सरकार सगळ्यांचंच आहे. महाविकास आघाडीने कधीही देण्याचा प्रयत्न केला नाही. तिथे फक्त लेना बँक आहे देना बँक नाही. पण महायूती सरकार हे देणारं सरकार आहे. त्यामुळे आम्ही अनेक योजना राबवत आहोत," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "ही फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीजेची ओवाळणी नाही तर वर्षभर दिला जाणारा माहेरचा आहेर आहे. योजना सुरु झाल्यावर विरोधकांना लगेच पोटदुखी सुरु झाली. पण त्यांना माझ्या या मायभगिणी जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही," असेही ते म्हणाले.