शिवबांचा मावळा : गुरूनाथ मुंबईकर

    12-Aug-2024   
Total Views |
gurunath mumbaikar


छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारकार्याने झपाटलेले तळोजा येथील गुरुनाथ मुंबईकर. ते ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’विरोधात कार्य करतात. त्यांच्या विचारकार्याचा घेतलेला हा मागोवा...

आगरी समाजाचे मुंबईकर कुटुंब हे मूळचे भोईरपाडा, तळोजाचे. श्यामा आणि नीरा या दाम्पत्याला तीन अपत्ये, त्यापैकी एक गुरुनाथ. श्यामा हे भाजीपाला पिकवत आणि ते विकूनच कुटुंबाचा चरितार्थ चालवत. मात्र, गुरुनाथ सात वर्षांचे असताना श्यामा वारले. घरचा सगळा भार नीराबाईंवर आला. त्या माऊलीने कष्टाचे डोंगर रचले आणि मुलाबाळांना जगवले. पहाटे 4 वाजता त्या तळोजाहून पनवेलला जायच्या, तिथून भाजी विकत घेऊन त्या मुलुंडला जायच्या. तिथे भाजी विकून घरी यायच्या. या काळात गुरुनाथही आईला जमेल तशी मदत करायचे. इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांवरचा धडा त्यांच्यासाठी प्रेरणादायी होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून जगण्याचीही जिद्द त्यांच्यात निर्माण झाली. छत्रपतींनी मनात आणले असते तर ऐशोरामात जीवन जगले असते. पण, त्यांनी अवघे आयुष्य हिंदुत्वासाठी, स्वराज्यासाठी समर्पित केले. आपणही तसेच जगायचे, असे लहानपणीच गुरुनाथ यांनी ठरवले.

असे जरी असले तरी तो काळ कठीणच होता. घरची गरिबी होती. सगळ्याच गोष्टींची वानवा. त्यामुळे दहावी शिकल्यानंतर गुरुनाथ कंपनीत चतुर्थश्रेणीचे काम करू लागले. काम करता करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची भ्रमंती, इतिहास समजून घेऊ लागले. समविचारी लोकांचे संघटन केले. हे सगळे करताना काही गरजू माणसेही भेटत. त्यांना अडीअडचणीला मदतही करावी लागे. मात्र, सगळी सोंगं आणता येतात, पैशांची नाही. त्यामुळे अर्थार्जन वाढवण्यासाठी गुरुनाथ यांनी कर्ज काढून मंडप डेकोरेशनचा व्यवसाय सुरू केला. चार पैसे येऊ लागले. मग, त्यांनी ‘स्वराज्य सामाजिक संस्था’ आणि ‘स्वराज्य मावळा प्रतिष्ठान’ या दोन संस्था निर्माण केल्या. ते बजरंग दलाचे कार्यकर्ते. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांची अढळ श्रद्धा. देवादिकांची मंदिरे आपण पाहत असतो. मात्र, गुरुनाथ यांनी स्वत:च्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिरही बांधले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या गीताची इथे दररोज सकाळ-संध्याकाळी आरती होते. ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ या विरोधात पनवेल परिसरातील 40 गावांमध्ये त्यांचे जागरण कार्य सुरू आहे. ‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या अनेक मुलींची त्यांनी सुटका केली, तर गोरक्षक म्हणून 250च्या वर गायींची सुटका केली आहे. धर्मकार्य हे ईश्वरकार्य असे त्यांचे मत.

धर्मकार्याची जागृती करण्याचे त्यांनी लक्ष्य ठरवले, त्यासाठी कारणीभूत एक घटना आहे. ती अशी- ती सधन घरची हिंदू मुलगी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून गावात आलेली. गावात भंगार वेचायचे काम करणार्‍या मुस्लीम माणसाच्या जाळ्यात फसली.. गावातल्या लोकांनी गुरुनाथ यांना बोलावले. त्यांनी तिला खूप समजावले. पण, ती ऐकायलाच तयार नव्हती. तिचे म्हणणे की, हे कसे झाले तिला माहिती नाही. मात्र, ती त्याच्यासोबतच जाणार. कारण, तिने पाच महिन्यांपूर्वीच त्याच्याशी कोर्टात जाऊन लग्न केले होते. त्या भंगारवाल्याची बेगम झाली होती. हे सगळे ऐकून गुरुनाथ अस्वस्थ झाले. यावर उपाय काय? गुरुनाथ श्यामा मुंबईकर यांनी ठरवले की पनवेलमधील 40 गावांमध्ये याबद्दल जागृती करायची. ‘लॅण्ड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’ घडल्यानंतर मदत करण्यापेक्षा, आंदोलन-मोर्चे करण्यापेक्षा हे होऊच नये, यासाठी काम करायला पाहिजे, असे गुरुनाथ यांचे मत. त्यानुसार, पनवेल तालुक्यातील गावांमध्ये त्यांनी संपर्क आणि संवाद सुरू केला. ‘समाजाचा माणूस’ म्हणून या सगळ्या गावांनीही गुरुनाथ यांचे स्वागतच केले. गुरुनाथ गावागावांत जाऊन बांधवांचे प्रबोधन करू लागले. आपण धार्मिक आहोत, पण आता धर्म जगला पाहिजे आणि आपल्या लेकराबाळांनाही धर्म शिकवला पाहिजे, अशी जागृती ते करू लागले. ते समाजबांधवांना सांगू लागले की, रक्ताचे पाणी करून आपल्या मुलांना शिकवतो. तरीपण, अशा घटना घडतात की हीच मुले मोठी झाल्यावर त्याला कुणीपण कसे फसवू शकते? त्यासाठी त्यांना धर्मसंस्कार द्या, प्रेम द्या, विश्वास द्या.
 
‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ असे गुरुनाथ यांचे नाही. त्यांनी स्वतःच्या लेकीला प्रतीक्षालाही धर्मकार्यात जोडून घेतले. तिला स्वसंरक्षण शिकवले. दांडपट्टा, भाला, तलवारफेकीत प्रतीक्षा तरबेज झाली. त्यानंतर गुरुनाथ यांनी तिला गावोगावी जाऊन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे शिकवण्यास सांगितले. आज गुरुनाथ यांच्या माध्यमातून चार गावांत मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण सुरू आहे. या सगळ्यांसोबतच गुरुनाथ यांना एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे भूमिपुत्र जमीन विकू लागला आहे. आलेल्या पैशांचा विनिमयही योग्य होत नाही. त्यामुळे सधन समाजबांधव गरिबीच्या दुष्टचक्रात ढकलला जातो. याबद्दलही गुरुनाथ यांनी जागरण कार्यक्रम सुरू केला. कोरोनाकाळातही जीवाची पर्वा न करता, त्यांनी सेवाकार्य सुरू केले. या सगळ्यामुळे गुरुनाथ यांचे नाव सर्वांमुखी झाले. आपल्या या लोकप्रियतेबद्दल गुरुनाथ म्हणतात की “मी शिवबाचा मावळा आहे.” महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या हिंदुत्वासाठी थोडे तरी काम करायलाच हवे, ते माझे कर्तव्यच आहे, तर जिहादी मानसिकता फोफावत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा वारसा जागवणार्‍या गुरुनाथ मुंबईकर यांचे विचारकार्य हे सद्यःस्थितीत सगळ्यांसाठी प्रेरणादायीच आहे.
 
9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.