हरहुन्नरी नाट्य दिग्दर्शक, लेखक आणि चतुरस्र अभिनेते योगेश सोमण... त्यांनी आजवर आपल्या लिखाणातून, अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. १९८७ पासून त्यांची रंगभूमीशी जोडलेली नाळ आजही कायम आहे. त्यांचा आजवरचा कलाप्रवास, अभिनय, लेखन, त्यांचे सावरकरप्रेम याविषयी त्यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा दिलखुलास संवाद...
नाटक जीवनात आलं आणि खेळ दूर गेला...
रंगभूमीशी आजीवन नाळ जोडलेल्या योगेश सोमण यांचा कलाक्षेत्रात येण्याचा विचारच नव्हता. त्यांची रुची खेळात होती, असे सांगताना ते म्हणतात की, “माझा तसा नाटकाशी थेट संबंध कधीच नव्हता. मला खेळांमध्ये रुची होती आणि प्रामुख्याने बॅडमिंटन मी खूप खेळत होतो. त्यात मी राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलो होतो. पण, तसा तो खर्चिक खेळ असल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबात जो निर्णय घेतला जातो की, सहसा खेळात करिअर करत नाहीत, तोच मी देखील घेतला आणि खेळापासून दूर झालो. १९८०-८५ चा तो काळ होता, जेव्हा मी खेळात करिअर न करण्याचा निर्णय घेतला आणि माझं पुढचं शिक्षण सुरु केलं. त्यानंतर १९८७ साली नाटक माझ्या जीवनात आलं आणि सारं काही दूर सारून मी केवळ रंगमंचावर रमायला लागलो. पण, आजही छंद म्हणून मी बॅडमिंटन नक्कीच खेळतो.”
...आणि शाळेतच मला एकांकिकेचे प्रयोग मिळाले
योगेश सोमण यांनी त्यांच्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा देत म्हटले की, “शाळेत मी अभ्यासू नक्कीच नव्हतो, पण मी ‘ढ’ विद्यार्थीदेखील नव्हतो. पण, मला अभ्यास आवडत नव्हता, हे तितकंच खरं. माझ्या लिखाणाची सुरुवात खरं तर शाळेपासूनच झाली. शाळेत इयत्ता सातवीत असताना स्नेहसंमेलनासाठी २०-२५ मिनिटांच्या एकांकिकेचं लिखाण केलं होतं. त्याचं सादरीकरण आम्ही चार-पाच मित्रांनी मिळून केलं होतं आणि सांगायला नक्की आवडेल की, त्या आमच्या पहिल्या एकांकिकेचे प्रयोग आम्हाला आमच्याच शाळेत मिळाले होते. पण, लिखाण तेव्हा अजून जोपासावं असं झालं नाही. शिवाय, शिक्षकांच्या ‘गुडबुक्स’मध्ये असल्यास बर्याच विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनात विशेष संधी मिळत होती. पण, मुद्दामहून मी ‘गुडबुक्स’मध्ये येणं टाळत होतो. त्याचं कारण असं होतं की, मी ज्या पुण्यातील विमलाबाई गरवारे या शाळेत शिकलो, तिथेच माझी आईदेखील शिक्षिका होती. त्यामुळे सर्व शिक्षकांचं माझ्यावर विशेष लक्ष होतं आणि मला ते फार अवघडल्यासारखं व्हायचं. त्याचमुळे मी शिक्षकांच्या नजरेपासून जितकं दूर राहता येईल तितकं राहण्याचा प्रयत्न करत होतो. ‘नृत्य’ या कलेपासून मी कायम लांब राहिलो आहे. कारण, त्याबाबतीत मी सनी देओल आहे. बीटवर मला काहीही करता येत नाही. पण, ‘नृत्य’ हा विषय माझ्या विद्यार्थ्यांना शिकवताना मात्र मला ते जमतं, पण प्रात्यक्षिक करण्यात माझं पारडं जरा हलकं आहे.
लिखाण आणि दिग्दर्शन हाच माझा पिंड
नाटकाची सुरुवात विशेषत: लिखाण कसं सुरु झालं याबद्दल बोलताना सोमण म्हणाले की, “१९८७ साली व्यक्तिमत्त्व विकास आणि नाटक या प्रयोगशाळेत प्रवेश घेतला आणि तिथे जेव्हा नाटकाशी निगडित ज्या बाबी आम्हाला शिकवल्या, त्यावेळी मला जाणवलं की, मी इथे रमतो आणि मला यातल्या बर्याच गोष्टी फार व्यवस्थित समजतात. विशेषत: त्यात उत्स्फूर्त नाट्याविष्कार हा प्रकार असतो, ज्यात १५-२० मिनिटांत एखादं ‘स्किट’ बसवायचं असतं. त्यात मला आवड आहे हे माझं मलाच समजलं आणि मी ते नाटक लिहून दिग्दर्शनही करु शकतो, याची जाणीव झाली. त्यावेळी एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, आपल्याला आपला मार्ग आणि भवितव्य दिसत आहे आणि नाटक या क्षेत्रात आपण स्थिरावू शकतो, याची जाणीव झाल्यानंतर पुढे नाटक, लिखाण आणि दिग्दर्शन हा माझा पिंड ठरला.”
प्रेक्षक आणि एकपात्री नाटकांमुळे मी घडलो
प्रत्येक माणसाच्या जीवनात स्पर्धा फार महत्त्वाची असते. योगेश सोमण यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल सांगताना म्हटले की, “पहिल्यांदा मी ‘सौदा’ ही एकांकिका लिहिली होती. त्यापूर्वी मी एकपात्री नाटक करत होतो. माझ्या सबंध करिअरचा जर का मी विचार केला, तर हे नक्की सांगेन की, स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व माझ्या आयुष्यात आहे. याला कारण असं की, ते सहज उपलब्ध होणारं व्यासपीठ आहे. त्यानंतर १९८७ ते १९८८ या कालावधीत महाराष्ट्रभरातील जवळपास १७-१८ एकपात्री अभिनय स्पर्धांमध्ये मी भाग घेत गेलो. एकपात्री नाटक स्पर्धांची सुरुवात झाली ती डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एकपात्री स्पर्धा पुण्यात झाली होती. त्यात मी स्वलिखित कथेवर एकपात्री भूमिका साकारली होती आणि तिथे मला पहिलं पारितोषिक मिळालं होतं. तिथे मला जाणवलं की, मला जे लोकांसमोर सादर करायचं आहे, त्यासाठी व्यासपीठ मिळत गेलं. हे देखील उमगलं की आपली संधी आपणच निर्माण करु शकतो. त्यामुळे मला ज्यांनी घडवलं ते म्हणजे रसिक प्रेक्षक आणि या एकपात्री स्पर्धांनी.”
...मग काय आम्ही ‘पुरुषोत्तम’ गाजवलं
“बर्याच लोकांनी मला सांगितलं होतं की ‘पुरुषोत्तम करंडक’च्या मांडवाखालून एकदा गेलं पाहिजे. त्या मांडवाखालून जाण्यासाठी म्हणून मी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि पुढची तीन वर्षे फर्ग्युसन कॉलेजमधून ‘पुरुषोत्तम करंडक’साठी ९०च्या दशकात एकांकिका केल्या. कारण, फर्ग्युसन कॉलेजच्या ‘पुरुषोत्तम करंडक’च्या करिअरमध्ये १३ वर्षे काळरात्र होती आणि ज्यावेळी मी माझ्या मित्रांसोबत फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश केला, त्यानंतर फासे फिरले आणि नंतर मात्र दहा वर्षे फर्ग्युसन कॉलेजने ‘पुरुषोत्तम करंडक’ गाजवलं.”
स्वातंत्र्यवीर सावरकर हा विचार मनात कायम धगधगत असतो...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित विविध कलाकृती योगेश सोमण यांनी आजवर सादर केल्या आहेत आणि भविष्यातही ते अशाच काही कलाकृती घेऊन येणार आहेत. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “सावरकरांच्या बाबतीत माझं असं झालं की, दहावीपासून माझ्या मेंदूच्या एका कोपर्यात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा विचार धगधगत असतो. रंगकर्मी म्हणून मी सावरकर वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी पहिलं म्हणजे बाबूजी अर्थात सुधीर फडके ज्यावेळी ‘वीर सावरकर’ चित्रपट करत होते, तेव्हा बासू भट्टाचार्य ज्या काळात त्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते, त्यावेळी मी त्यांचा साहाय्यक दिग्दर्शक होतो. त्यापूर्वी मी सावरकरांच्या ‘जन्मठेप’ या पुस्तकाचं नाट्यरुपांतर केलं होतं आणि ३२ कलाकार मिळून आम्ही ते सादर करत होतो. त्यानंतर १९९६ साली मी ‘सह्याद्री’ वाहिनीवर सहा भागांची एक मालिका केली, ज्यात सावरकरांचं बालपण ते लंडन हा कालखंड दाखवला होता. मग पुढे मला असं वाटलं की, अजून लोकांपर्यंत सावरकर पोहोचणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी एकलनाट्याचा उपयोग करायचं मी ठरवलं आणि मग ‘मी विनायक दामोदर सावरकर’चे एकपात्री प्रयोग सर्वत्र सुरु केले. कारण, तोपर्यंत सावरकरांवर अश्लाघ्य भाषेत टीका सुरु झाली होती, ती थांबवण्यासाठी कलाकार म्हणून मी काय करु शकतो, हा विचार केला आणि तो प्रयोग सुरु झाला. पुढे असं सुचलं की, सावरकर अजून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रपटापेक्षा वेबसीरिजचा विचार करावा आणि मग त्यात सावरकर माणूस, राजकारणी, विचारवंत, साहित्यिक, तत्त्वज्ञ, क्रांतिकारक म्हणून कसे आहेत, हे सर्व काही दाखवायचं असेल, तर वेबसीरिजच्या माध्यमातून ते आपण मांडू शकतो आणि ते मिशन सुरू झालं.”
अभिनय ही ‘क्रिएटिव्हिटी’ नसून ते एक ‘क्राफ्टवर्क’
कलाकार म्हणून स्वत:मधील गुणदोष स्वीकारणं फार महत्त्वाचंं असतं. त्याबद्दल बोलताना सोमण म्हणतात, “खरं सांगायचं तर मी अभिनय फार उत्तम करतो, असं मला वाटत नाही. माझं असं मत आहे की, अभिनय ही ‘क्रिएटिव्हिटी’ नसून ते एक ‘क्राफ्टवर्क’ आहे. अभिनयात नवं काहीच घडत नाही. अभिनयात नवं काहीतरी घडलं आहे, याचा आर्विभाव आणतात. त्यामुळे अभिनेता किंवा अभिनेत्री हे दिग्दर्शक, लेखक यांच्या हातातील ‘पपेट’ आहेत, असं माझं स्पष्ट मत आहे. आजपर्यंत मी नाटकाचं लिखाण आणि दिग्दर्शनात फार रमलो, तितका मी अभिनयात कधीच फारसा गुंतलो नाही. आजवर केवळ अभिनयाच्या जोरावर मला भूमिका मिळाल्या, पण ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट मला माझ्या दिसण्यावरुन मिळाला, हे नक्की सांगेन. त्या चित्रपटात मनोहर पर्रिकर यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती हवी होती आणि सुदैवाने माझ्यात ते साधर्म्य कास्टिंग दिग्दर्शक, चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांना दिसले आणि त्या महत्त्वाच्या चित्रपटाचा मी भाग झालो, याचा आनंद आहे.”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष सुरु होत असून, त्याच निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्रीगुरूजी यांच्या जीवनावर एकलनाट्य करणार आहे. वर्षभरात त्याचे १०० प्रयोग करावे असा मानस आहे, असेही यावेळी बोलताना योगेश सोमण यांनी सांगितले.