दीदींच्याच राज्यात लाखो भगिनी बेपत्ता

    08-Jul-2024   
Total Views |
west bengal womens missing cases


प. बंगालच्या संदेशखालीतील अत्याचार तर आता देशात सर्वत्र माहिती झाले आहेत. पण, धक्कादायक बाब म्हणजे, प. बंगालमधून महिला बेपत्ता होण्याचे प्रमाणही वर्षागणिक वाढते आहे. ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी’ संस्थेच्या माहितीनुसार, त्या राज्यातून लाखो महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यानिमित्ताने महिला मुख्यमंत्री असलेल्या प. बंगालमधील महिलांच्या बिकट परिस्थितीचेे भीषण वास्तव अधोरेखित करणारा हा लेख....

प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बनर्जी यांचे सरकार अस्तित्त्वात आल्यानंतर त्या राज्यात भारताचा कायदा अस्तित्त्वात आहे की नाही, असे वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या राज्यातील धर्मांध मुस्लीम समाजास प. बंगालमध्ये ‘शरिया’ कायद्याचाच अंमल आहे, असे वाटू लागले आहे. त्या कायद्यानुसार अपराधी व्यक्तींना शासन करण्यात हे धर्मांध मागेपुढे पाहात नाहीत. अशीच एक घटना प. बंगालमध्ये घडली. ताज्मुल हक नावाच्या एका गुंडाने एका जोडप्यास कथित अनैतिक संबंध असल्यावरून भररस्त्यामध्ये झोडपून काढले. कायदा हातात घेणार्‍या त्या मुस्लीम गुंडास अडविण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही. सर्वजण उघड्या डोळ्यांनी हा सर्व तमाशा पाहात होते. प. बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चोपरा या गावामध्ये योगिनी एकादशीच्या दिवशी ही घटना घडली. ताज्मुल हक नावाच्या गुंडाने कायदा हातात घेऊन काझीच्या भूमिकेत जाऊन त्या दोघांना शासन केले. या गुंडास ‘जेसीबी’ या नावानेही ओळखले जाते.

तृणमूल काँग्रेसचा स्थानिक आमदार हमिदुल रहमान याचा या गुंडास पूर्ण आशीर्वाद असल्याने त्याला कोणाचेच भय नव्हते. प. बंगालमध्ये आपण जेथे काम करतो, त्या भागात ‘शरिया’ कायदा अस्तित्त्वात आहे, असे समजून या गुंडाचा आणि त्याच्या समर्थकांचा तेथे नंगा नाच सुरू आहे. दुर्गा, काली आणि जगत्धात्री या देवीच्या तीन रुपांसाठी प्रसिद्ध असलेल्या प. बंगालमध्ये एका अबलेवर एका मुस्लीम गुंडाकडून अशी मारझोड करण्यात आली. प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी एक महिला असताना त्या राज्यात एका गुंडाकडून असे कृत्य घडते, याला काय म्हणावे? प. बंगालमध्ये आठवडाभराच्या कालावधीत अशा प्रकारच्या १२ घटना घडल्याचे सांगण्यात येते. संदेशखालीतील अत्याचार तर आता देशात सर्वत्र माहिती झाले आहेत. प. बंगालमधून महिला बेपत्ता होण्याचे प्रमाणही वाढते आहे. ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी’ संस्थेच्या माहितीनुसार, त्या राज्यातून २०१७ साली २४ हजार, ९३७, २०१८ साली २८ हजार, १३३ आणि २०१९ साली ३१ हजार, २९९ महिला बेपत्ता झाल्या आहेत. ही केवळ २०१९ सालापर्यंतची आकडेवारी आहे. या आकडेवारीवरून २०२४ सालापर्यंत किती अभागिनी बेपत्ता झाल्या असतील, याची कल्पनाच न केलेली बरी! दुर्गेची उपासना करणार्‍या बंगालमध्ये महिलांवर कसा अन्याय केला जातो, तसेच मुस्लीम गुंड ‘हम करे सो कायदा’ याप्रमाणे कसा धुडगूस घालत आहेत, ते यावरून लक्षात येते!

लाखो भाविकांच्या उपस्थितीत जगन्नाथ रथयात्रा!

ओडिशामधील जगन्नाथपुरी येथे दरवर्षी आषाढ महिन्यात आयोजित रथयात्रा महोत्सवास देशाच्या विविध भागांतील लाखो भाविक एकत्र येत असतात. ‘याचि देही, याचि डोळा’ हा भव्य-दिव्य सोहळा अनुभवता यावा, यासाठी भगवान जगन्नाथाचे हे भक्त जगन्नाथपुरी येथे दरवर्षी एकत्र येतात. रविवारी सुरू झालेल्या या रथयात्रेस राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांचीही उपस्थिती होती. रथयात्रेच्या मार्गालगत उभारलेल्या मंडपातून राष्ट्रपतींनी हा सर्व सोहळा अनुभवला. या रथयात्रेसाठी निर्माण करण्यात आलेल्या तीन रथांवर भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या मूर्ती विराजमान झाल्यानंतर विविध धार्मिक विधी संपन्न झाले. पुरीच्या जगन्नाथ मंदिरातून मिरवणुकीने या तीनही मूर्ती रथामध्ये विराजमान करण्यात आल्या. भगवान जगन्नाथाची मूर्ती ‘नंदिघोष’ नावाच्या रथात, भगवान बलभद्राची मूर्ती ‘तालध्वज’ रथात आणि देवी सुभद्रेची मूर्ती ‘देवदालन’ नावाच्या रथात विराजमान करण्यात आली. पुरीच्या गोवर्धन पीठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी रथांवर जाऊन भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे दर्शन घेतले. त्यानंतर पुरीचे राजे गजपती दिव्य सिंह देव यांनी तीनही रथांवर जाऊन मूर्तींचे दर्शन घेऊन त्या रथांचा परिसर आपल्या हातातील सोन्याच्या झाडूने स्वच्छ केला. हे सारे नित्य सोपस्कार पार पडल्यानंतर रथयात्रेस प्रारंभ झाला. तत्पूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतले. या रथांना राष्ट्रपतींनी प्रदक्षिणा घातली. राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यासपीठावरून उतरून पुरीचे राजे गजपती दिव्य सिंह यांच्या पारंपरिक पालखीपाशी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. हा सर्वच सोहळा डोळ्यांत साठवून ठेवण्यासारखा होता. या रथयात्रेस आलेले माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सन्मानाने मंचावर आमंत्रित केले. देशाच्या राष्ट्रपतींपासून सर्वसामान्य भाविकांपर्यंत असे सर्वजण भगवान जगन्नाथाच्या या महान यात्रेचा आनंद घेत होते. सर्व धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर संध्याकाळी रथ ओढण्यास प्रारंभ झाला. सर्वप्रथम भगवान बलभद्राचा रथ, त्यानंतर देवी सुभद्रेचा रथ आणि सर्वात शेवटी भगवान जगन्नाथाच्या रथाचा गुन्देचा मंदिराच्या दिशेने प्रवास सुरू झाला. ५३ वर्षांनंतर प्रथमच जगन्नाथाचा रथ यंदाच्या वर्षी दोन दिवस ओढला जाणार होता.


‘एसएफआय’वर कम्युनिस्ट नेत्याची टीका

केरळमध्ये डाव्या आघाडीचे सरकार आहे. पण, त्या डाव्या आघाडी सरकारमधील घटक पक्षांतील नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. केरळच्या कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बिनोय विश्वम यांनी “एसएफआय’ने आपली वर्तणूक बदलली नाही, तर ही संघटना डोईजड झाल्यावाचून राहाणार नाही,” असा इशारा डाव्या आघाडीतील नेत्यांना दिला आहे. केरळच्या डाव्या सरकारमध्ये कम्युनिस्ट पक्ष हा क्रमांक दोनचा पक्ष आहे. त्या पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘एसएफआय’च्या वर्तणुकीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. “वेळीच या संघटनेवर योग्य वचक न बसविला गेल्यास ती एक दिवस डोईजड होऊन बसेल,” असा इशारा त्यांनी दिला आहे. विश्वम यांचे हे वक्तव्य लक्षात घेता, केरळच्या डाव्या आघाडीमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. तसेच, यानिमित्ताने आघाडीतील मतभेद जनतेसमोर आले आहेत. “एसएफआय’ या संघटनेत जी नवी पिढी आली आहे, त्या पिढीस डावे तत्त्वज्ञानही समजलेले नाही आणि आधुनिक जगामध्ये आपली जबाबदारी काय आहे, हेही त्यांच्या लक्षात आलेले नाही,” अशी टीका विश्वम यांनी केली आहे. “या संघटनेच्या सदस्यांनी डाव्या विद्यार्थी चळवळीच्या इतिहासाचा अभ्यास करावा आणि योग्य दिशेने वाटचाल करावी,” असे विश्वम यांनी म्हटले आहे. उजव्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याने केलेली ही टीका लक्षात घेऊन माजी मंत्री ए. के. बालन हे ‘एसएफआय’च्या बचावासाठी पुढे आले. त्यांनी या विद्यार्थी संघटनेचे जोरदार समर्थन केले आणि “या संघटनेची बदनामी करण्याचा प्रयत्न आपला पक्ष खपवून घेणार नाही,” असे म्हटले आहे. “एसएफआय’ म्हणजे कोणीही यावे आणि बडवून जावे, असा रस्त्याच्या कडेला पडलेला ढोल नाही,” असेही बालन यांनी म्हटले आहे. या निमित्ताने केरळच्या डाव्या आघाडीत ‘एसएफआय’ या संघटनेवरून असलेले मतभेद असे चव्हाट्यावर आले आहेत.


ब्रिटनमध्ये १२ शीखांसह २८ भारतीय विजयी

ब्रिटनमध्ये नुकत्याच निवडणुका संपन्न झाल्या. त्यामध्ये तेथील मजूर पक्षाकडून उभे असलेले मूळ भारतीय वंशाचे २८ उमेदवार विजयी झाले. यामध्ये १२ शीख व्यक्तींचा समावेश आहे. कॅनडाखालोखाल एवढ्या मोठ्या संख्येने शीख उमेदवार ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आता दिसणार आहेत. मजरू पक्षाकडून निवडून आलेल्यांमध्ये शबाना महमूद या महिलेचा समावेश आहे. ही महिला पाकव्याप्त काश्मीरशी संबंधित असून ती सातत्याने भारताचा आणि इस्रायलचा द्वेष करीत आली आहे. निवडणुकीतील विजयानंतर या महिलेची कायदामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सातत्याने भारतविरोधी भूमिका घेण्यासाठी ही महिला प्रसिद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौर्‍याआधी २०१५ साली या लोकप्रतिनिधीने आणि तिच्या काही सहकार्‍यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून त्यामध्ये आपल्या काही मागण्या मांडल्या होत्या. “काश्मीरमध्ये सार्वमत घ्यायला हवे,” अशीही शबाना महमूद यांची मागणी आहे. भरताने ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर त्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात या महिलेने भारतविरोधी प्रचार केला होता. आता ही भारतविरोधी आणि इस्रायलविरोधी शबाना महमूद कायदा खात्यास कसा न्याय देते, ते पहायचे!

९८६९०२०७३२

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.