समाजाचा आरसा, लोकांचे आचार-विचार, आजूबाजूला घडणार्या घटना, लाखो-करोडो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे आणि मोठे माध्यम म्हणजे चित्रपट, नाटक आणि वेबसीरिज. गेल्या काही काळात वास्तवदर्शी आणि चरित्रपटांची सर्रास लाट ही मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही दिसून आली. भयपट, रहस्यपट, विनोदी किंवा विनोदी-भयपट याच बाजातील अनेक कलाकृती प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरल्या. आपण म्हणतो की, अमुक एक कलाकार केवळ विनोदी भूमिकाच साकारु शकतो किंवा एखादा कलाकार केवळ खलनायकाचीच भूमिका उत्तम सादर करू शकतो. पण, मराठी कलाकारांनी भाषेचे अथवा माध्यमाचे बंधन न पाळता, आपली कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा मार्मिक प्रयत्न कायमच केला आहे. म्हणूनच हिंदी चित्रपटसृष्टीतही सध्या मराठी कलाकारांचा, दिग्दर्शकांचा विशेष बोलबाला दिसून येतो. तेव्हा जाणून घेऊयात अशाच काही हरहुन्नरी कलाकारांबद्दल...
अभिनेत्री सई ताम्हणकरने हिंदी सिनेसृष्टीत मराठीचं नाव उंचावर नेलं आहे. पण, तिच्यापाठोपाठ आता आणखीनही काही मराठी अभिनेत्रींनी वेबसीरिजमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी चंद्रमुखी अर्थात अभिनेत्री अमृता खानविलकर हिने तिच्या अदाकारी, नृत्यकौशल्य आणि अभिनयाने सगळ्यांना घायाळ केले. आता ‘36 डेज’ हा तिच्या हिंदी वेबसीरिजमधून ती एका नवी भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. या वेबसीरिजपूर्वी ‘लुटेरे’, ‘चाचा विधायक हैं हमारे’ या सीरिजमध्येही तिची छोटेखानी पण महत्त्वपूर्ण झलक पाहायला मिळाली होती. आता ‘36 डेज’ या वेबसीरिजमध्ये ‘फॅमिली मॅन’ ‘फेम’ अभिनेता शारीब हाश्मीसोबत अमृता स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या सीरिजमधील तिच्या भूमिकेची खासियत म्हणजे, एका मराठी मुलीचं पात्र अमृताने साकारले आहे. इथे एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते, ती म्हणजे मराठी कलाकारांना बरेचदा हिंदी चित्रपटांमध्येही मराठीच भूमिका ‘ऑफर’ केली जाते. पण, त्याचे विशेष कौतुक यासाठीदेखील करावेसे वाटते की, हिंदी किंवा अन्य कोणतीही भाषा ही मराठी आणि मराठी कलाकारांशिवाय अपुरीच आहे.
चंदेरी दुनियेत ठरावीक काळासाठी एखाद्या अभिनेत्री किंवा अभिनेत्याला प्रेक्षक डोक्यावर घेतात. अशीच सध्याची ‘महाराष्ट्राची क्रश’ म्हणजे अभिनेत्री ह्रता दुर्गुळे. चित्रपट, नाटकांपेक्षा कोणताही मराठी कलाकार महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचतो तो मालिकांच्या माध्यमातून. ह्रतादेखील ‘दुर्वा’ आणि ‘फुलपाखरू’ या मालिकांमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांत पोहोचली. सौम्य, नाजूक असा अभिनय करणारी ह्रता आता तिच्या आगामी पहिल्या हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार असून, त्यात ती थेट पोलिसांची भूमिका साकारणार आहे. बरं, या वेबसीरिजचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे, या सीरिजचे दिग्दर्शकही मराठी आहेत. ‘बंध नायलॉन’चे या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय प्रवास सुरू करणारे जतीन वागळे यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले असून, त्यात मराठमोळी ह्रता झळकणार आहे. याशिवाय, आगामी अनेक नव्या प्रोजेक्ट्समधून ह्रताचा धडाकेबाज अंदाज पाहण्याची संधी नक्कीच तिच्या चाहत्यांना मिळणार आहे.
आता अभिनेत्रींनंतर जरा दिग्दर्शकांकडे वळूयात. 2016 पासून प्रेक्षकांना ‘सैराट’चं वेड लावणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रातील विविध धाटणीचे विषय अतिशय उत्तमरित्या चित्रपटांमधून साकारले. आता नागराज यांनी हिंदी ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाकेदार प्रवेश केला असून ‘मटका किंग’ या वेबसीरिजचे ते दिग्दर्शन करणार आहेत. विजय वर्मा या सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार असून, त्याच्यासोबत मराठमोळे कलाकार - सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ जाधवदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, सिद्धार्थदेखील या वेबसीरिजच्या माध्यमातून हिंदी ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ‘मटका किंग’ या वेबसीरिजमध्ये ‘मटका किंग’ रतन खत्रीचे जीवन दाखवले जाणार आहे. तसेच, 60-70च्या दशकात मुंबईतला कापसाचा व्यापारी मटका जुगाराचा व्यवसाय कशा पद्धतीने चालवत होता, हे देखील पाहायला मिळणार आहे.
काही अभिनेत्यांचे चाहते हे तर अगदी जगभर विखुरलेले. अशा कलाकारांची यादी खरंतर हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी. त्यात अभिनेते इरफान खान यांचं नाव अग्रस्थानी घेता येईल आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांना मिळाली होती. आणि आता ‘इश्क-विश्क बियाँड’ या चित्रपटातून पुन्हा एकदा त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपले नाव रोवले आहे. मराठीतील दिग्दर्शक हिंदीत यशस्वी चित्रपट साकारत असल्यामुळे एकीकडे जरी मनात आनंद, अभिमान आणि समाधान या संमिश्र भावना असल्या, तरीही मराठीतच मराठी चित्रपट काहीसे मागे पडल्यासारखे जाणवते. मराठी चित्रपटसृष्टीत आशय आणि विषयांच्या बाबतीत नावीन्यपूर्ण अधिक कल्पक प्रयोग व्हावे, अशी अपेक्षा आहे. मात्र, सध्यातरी हिंदी चित्रपट, वेबसीरिजचं माध्यम मराठी कल्लाकार गाजवत आहेत, याचं विशेष कौतुक!