स्वामींनी मागील काही श्लोकांतून ‘जुने ठेवणे मीपणे आकळेना’ असे सांगितले आहे. आत्मबोधीचे, आत्मतत्त्वाचे परंपरागत चालत आलेले पुरातन ज्ञान जीवाला कळत नाही. आपल्या अवगुणांनी जीव अज्ञानात वावरत असतो. मीपणा, अहंकार, देहबुद्धी, भ्रम इत्यादी कारणांनी सत्व, रज, तम या त्रिगुणांंवर आधारित प्रकृती हेच आपले स्वरूप मानल्याने माणूस खर्या ज्ञानापासून दूर राहतो, अज्ञानात वावरतो. विश्वातील चैतन्य न दिसल्याने सर्व वस्तूंना तो पाषाण समजतो.
आपल्या अंतरात्म्यातील आनंदमय जाणीव नित्यप्राप्त असूनही त्याला जाणता येत नाही, त्याचे ज्ञान होत नाही, ज्ञानासाठी श्रद्धा हवी असते. संशय हा श्रद्धेच्या विरोधात काम करतो. संशयामुळे आत्मवस्तूपर्यंत पोहोचता येत नाही. संशयी माणसाला वाटत असते की, आत्मज्ञान खरे आहे किंवा नाही संशयामुळे मन अतींद्रिय ज्ञानाला दुरावते. भगवद्गीताकारांनी ‘संशयात्मा विनश्यति’ असे म्हटले आहे. संशय घेणे ही एक मानसिक अवस्था आहे. जोपर्यंत ती बदलता येत नाही, तोपर्यंत मन संशय घेत राहणार आणि माणूस असत्याला सत्य मानून त्याच भ्रमात वावरणार. आत्मज्ञानासंबंधीचे विचार माणूस वाचतो, ऐकतो व ते त्याला समजले असे वाटते. पण, ते समजले तरी उमजले असे होत नाही. थोडक्यात, आत्मज्ञानाचे त्याला आकलन होत नाही. त्यामागील रहस्य न समजल्याने अज्ञानी जीव चुकत जातो आणि आपले काही चुकले, हेही त्याला समजत नाही. त्यामुळे आपल्या हिताचे काय ते त्या जीवाला समजत नाही, त्याचे आकलन होत नाही. हे स्वामींनी पुढील श्लोकात सांगितले आहे-
अविद्यागुणें मानवा ऊमजेना।
भ्रमें चूकलें हीत तें आकळेना।
परीक्षेवीण बांधले दृढ नाणें।
परी सत्य मिथ्या असें कोण जाणें॥143॥
मानवी जीवनात अविद्येचा विलक्षण प्रभाव सर्वत्र दिसून येतो. त्यामुळे मानवाच्या जीवनात अस्वस्थता दिसून येते. कोणताच निर्णय त्याला ठामपणे घेता येत नाही. जीवनात धरसोड वृत्ती निर्माण होते. त्यात पुन्हा देहबुद्धी आपले काम करीत असते. या देहबुद्धीच्या जोरावर जगात मानवी जीवनातील कला, संभाषणचातुर्य, विद्या आत्मसात करता येतात. त्या अहंकारमिश्रित असल्याने ते कौशल्य असते, पण त्याला खरे ज्ञान म्हणता येत नाही. असे स्वामींनी दासबोधाच्या दशक 5 समास 5 मध्ये सांगितले आहे की,
असो सकळ कळाप्रवीण।
विद्यामात्र परिपूर्ण।
तरी ते कौशल्यता, ज्ञान।
म्हणो चि नये॥ (5.5.32)
हे सारे देहबुद्धीच्या प्रभावाने घडत असल्याने त्याला ‘ज्ञान’ म्हणता येत नाही. देहबुद्धीचे रूपांतर आत्मबुद्धीत केल्यावर अज्ञान मावळते आणि आत्मज्ञान प्रकट होते, असे स्वामींनी सांगितले आहे. अविद्यागुणांमुळे खर्या ज्ञानाचे आकलन होण्यास भौतिकज्ञान किंवा तर्कविद्या यांचा उपयोग होत नाही. अविद्येतून भ्रमाची निर्मिती होते. भ्रमाचा उल्लेख संत ‘माया’ असा करतात. भ्रमामुळे वस्तू मुळात आहे तशी न दिसता, ती वेगळीच असल्याचा भास होतो व त्यातून जे दिसते ते सत्य आहे, असे वाटू लागते. त्यासाठी माणूस धडपड करू लागतो. याचे सर्वात चांगले उदाहरण मृगजळाचे सांगता येईल. उष्ण प्रदेशात सूर्याचे प्रकाशकिरण अत्यंत तीव्र असताना त्यांचे कमी-अधिक प्रमाणात परावर्तन होऊन ते आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात. त्यातील कमी-अधिक तीव्रतेने दृश्यातील स्थिर वस्तू हलत असल्याचा भास निर्माण होतो. त्याचे साधर्म्य पाण्यावर हलणार्या लाटांशी असल्याने त्या ठिकाणी पाणी असल्याचा भास निर्माण होतो. त्याला ‘मृगजळ’ म्हणतात. रानावनात भटकणार्या तहानलेल्या हरिणांना पाण्याचा भास झाल्याने पाण्यासाठी ते मैलोन्मैल धावतात. ते धावतील तसे मृगजळ पुढे पुढे जाते. पण, ते भासमान जल आहे, हे त्यांना समजत नाही.
वस्तूमात्राचे यथार्थ ज्ञान नसणे म्हणजे अज्ञान होय. तथापि, अज्ञानाला ज्ञानाचा दर्जा दिल्याने माणसाच्या आयुष्यात गोंधळाची स्थिती निर्माण होते. त्याला भ्रमाची साथ मिळते. अज्ञानामुळे भ्रमनिर्मिती स्थिती खरी मानली जाते. त्यातून आपल्या हिताचा विचार निसटून जातो. त्याचे नीट आकलन होत नाही. हित-अहित यांची सरभेसळ झाल्याने खर्या हिताचा माणूस विचार करू शकत नाही. खोट्याला उराशी बाळगून त्याची परीक्षा न झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होते. खोट्याचे खोटेपण उघडकीला आल्यावर फजितीची वेळ येते.
बुद्धीच्या ठिकाणी भ्रम निर्माण करणे, हे अविद्येचे कार्य असल्याने माणूस सत्य ज्ञानापासून दूर राहतो. भ्रम असत्याला खरे मानायला मदत करतो. परंतु, असत्य गोष्ट हिताची असू शकत नाही. त्यासाठी विद्येचा, असत्यांचा जाणीवपूर्वक त्याग केल्याशिवाय खरे हित कशात आहे, ते समजणार नाही. तथापि, सर्वसाधारणपणे असे दिसून येते की, सत्य-असत्याची नीट पारख करता न आल्याने माणसाला असत्य हे सत्य असल्याचे वाटू लागते. त्याची फसगत होते, पण ते समजायला वेळ लागतो. परमार्थातील खरे सुख शोधता न आल्याने माणूस ऐहिक गोष्टी सुखप्राप्तीसाठी जमा करीत जातो व त्यात फसत जातो. त्यातून सुख प्राप्त न झाल्याने आपण खोटी कल्पना खरी मानली, हे नंतर समजते. परमार्थातील सत्यासत्याची कल्पना स्पष्ट करण्यासाठी जी भाषा वापरली जाते, त्या भाषेची सामान्य माणसाला सवय नसते. तत्वज्ञानाच्या आकलनात विचारांचे बारकावे समजण्यासाठी बुद्धीला ताण द्यावा लागतो. पण, त्यासाठी रोजच्या व्यवहारातील दृष्टांत दिल्यास ते लगेच समजते. स्वामींनी या श्लोकात सहज समजेल असा दृष्टांत देऊन आपला विचार स्पष्ट केला आहे. स्वामी म्हणतात, समजा एखाद्या माणसाला एक नाणे मिळाले. त्याची शहानिशा न करता त्याने ते कनवटीला बांधून ठेवले. परंतु, बाजारात गेल्यावर त्या नाण्याचे खरेखोटेपण कळते. खोटे नाणे बाजारात स्वीकारले जात नाही. तद्वत आपण अनेक खोट्या कल्पना त्यांची परीक्षा न करता उराशी बाळगलेल्या असतात. खोट्या कल्पनांच्या ठिकाणी खरेपणा पाहिल्याने भ्रमाची निर्मिती होते.
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील फुलरई गावात भोलेबाबाच्या सत्संगप्रसंगी चेंगराचेंगरी होऊन 121 लोक मृत्युमुखी पडल्याचे वृत्त वाचले. अद्ययावत पोशाखात फिरणारा हा भोलेबाबा प्रत्यक्ष ईश्वराशी संभाषण करतो, असे स्वतःच सांगतो आणि लोक त्यावर विश्वास ठेवतात. त्याने बोलावलेल्या सत्संगात हजारोंनी लोक जमतात, त्याच्या पाया पडायला धडपडतात. त्यात 121 जणांना प्राण गमवावे लागतात. यावरून हेच दिसून येते की, आपल्या विचारातील खरेखोटेपणा न तपासता आल्याने खोट्याच्या आहारी जाऊन लोक आपले अहित करून घेतात. स्वामी या श्लोकात म्हणतात त्याप्रमाणे, ‘परी सत्य मिथ्या असे कोण जाणें’ हा भ्रम झाल्याने त्यांचे हित चुकले, हेही त्यांना कळेनासे होते.
7738778322