मातृतेजाची जननी...

Total Views |
vaishali patil


आपला पती, नातेवाईक, शेजारीपाजारी असे सगळेच मुलाने शास्त्रीय नृत्य शिकण्याच्या विरोधात असले तरी ही माऊली आपल्या मुलाच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. अशा या सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील यांच्या मातोश्री वैशाली पाटील यांच्याविषयी...

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.’ खरेच, या जगात आपण येतो ते आई-वडिलांमुळे. नऊ महिने आपल्या उदरात आई सर्व सुख-दुःखांपासून आपले रक्षण करून सुरक्षित ठेवते आणि ज्यावेळी आपण तिच्या पोटातून या जगाचा एक अविभाज्य भाग होण्यासाठी पहिले पाऊल टाकतो, तेव्हा प्रचंड वेदना सहन करून ती आपल्याला जन्म देते. प्रत्येक आईचा आनंद, तिची स्वप्ने ही आपल्या लेकरांमध्ये ती पाहात असते. अशाच वैशाली सुरेश पाटील या माऊलीची कथा जाणून घेऊया...

सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील यांच्या मातोश्री वैशाली पाटील यांचे बालपण कल्याणमध्ये गेले. तिथेच त्यांनी दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण पूर्ण केले. बालपणापासून त्यांना नृत्य करण्याची फार आवड होती. शाळेतील वार्षिक संमेलनात त्या आवर्जून भाग घेत असत. पण, त्यांच्या घरी आईवडिलांचा त्यांच्या नृत्याबद्दल आक्षेप होता. वडील रेल्वेत नोकरी करत होते आणि आई गृहिणी. वैशाली यांना चार बहिणी आणि एक भाऊ. त्यामुळे सहा मुलांचा सांभाळ एकटीने करणे वैशाली यांच्या आईसमोरही आव्हानात्मक होते.

कारण, आठजणांचे पोट भरणे हे ४० वर्षांपूर्वीच्या काळात अतिशय तुटपुंज्या पगारात म्हणजे दिव्य होते. पगार फार कमी, पण घरात सदस्यांची संख्या अधिक असल्यामुळे मुलाबाळांवर लक्ष ठेवणे वडिलांना जमायचे नाही. त्यातही पदरात पाच मुली असल्यामुळे वैशाली यांच्या आईने कायम त्यांच्या नृत्यापेक्षा किंवा इतर आवडींपेक्षा शिक्षणावर अधिक भर दिला आणि त्याचवेळी अगदी सातवी-आठवीत असतानाच वैशाली यांनी एक गोष्ट मनाशी पक्की केली, ती म्हणजे भविष्यात माझ्या मुलांना मी नृत्य शिकवणार किंवा नृत्याच्या क्षेत्रात त्यांना करिअर करण्याची संधी देत, आई म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार.

१९८० साली वैशाली यांचे लग्न झाले. पदरात दोन मुली आणि एक मुलगा म्हणजेच आशिष पाटील. त्यांचे पती नोकरी करत असल्यामुळे साहजिकच पुन्हा त्यांच्या आईने जे जीवन जगले, ते पुन्हा वैशाली यांच्या वाट्याला आले. पण, आपल्या आईसारखे न वागता, त्यांनी आपल्या मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात नशीब आजमावण्याची संधी दिली आणि आई व मार्गदर्शक अशा दुहेरी भूमिकेत त्या प्रवास करू लागल्या. आशिषला नृत्याची आवड अगदी शिशुवर्गापासूनच होती. लहानपणापासून केवळ टीव्हीमध्ये नृत्य पाहात तो शिकला आणि मुलगा असूनही त्याच्या नृत्य करण्याला वैशाली यांनी आई आणि त्याच्या गुरू म्हणून त्याला प्रोत्साहन दिले.

कारण, दोन मुली असूनही मुलाला नृत्याचे वेड लागल्यामुळे वैशाली यांच्या पतीनेही त्यांना खडेबोल सुनावले होते. शिवाय नातेवाईक, शेजारीपाजारी यांनीही मुलगा असून मुलींचे कपडे घालून अदाकारी करत नृत्य करतो आणि त्यातही आई त्याला पाठिंबा देते, असे टोमणे मारले. पण, या सगळ्या नकारात्मक विचारांना दूर सारत केवळ आपले नृत्याचे स्वप्न आणि मुलाला स्वतःहून त्या कलेची लागलेली गोडी यांमुळे वैशाली यांनी आशिषला ‘नृत्यातच पुढे तुझे नशीब घडव’ असा सल्ला दिला आणि त्याच्या या खडतर प्रवासात त्या चालत गेल्या.

तिन्ही मुलांचे शिक्षण, त्याचा खर्च हे सारे काही पूर्ण करण्यासाठी वडिलांची नोकरी सुरू होतीच, पण काही वर्षांनी जेव्हा ते निवृत्त झाले, त्यानंतर पुढे आर्थिक अडचणींचा डोलारा कसा सांभाळायचा, यादृष्टीने वैशाली यांनी त्यांच्या पतीसोबत मिळून किराणा मालाचे दुकान सुरू केले. स्वतः दहावी उत्तीर्ण असूनही आपल्या मुलांनी खूप शिकले पाहिजे, असा वैशाली यांचा अट्टाहास होता आणि त्यामुळे अगदी काटकसर करून त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना शिक्षण दिले. तिघांपैकी आशिष आणि त्यांच्या एका मुलीने विज्ञान शाखेत, तर आणखी एका मुलीने वाणिज्य शाखेत शिक्षण घेतले.

आशिष मुलगा असूनही त्याने शास्त्रीय नृत्य करण्यावर अनेकांनी शितोंडे मारले. लोकांचे टोमणे ऐकून आशिष चक्क आपले जीवन संपवायला निघाला होता. पण, वैशाली पुन्हा ढाल बनून त्याच्यासोबत उभ्या राहिल्या आणि नातेवाईक, शेजारी आणि प्रसंगी आपल्या पतीच्याही विरोधात जात त्यांनी आशिषच्या नृत्याला मानसिकरित्या प्रोत्साहित केले. जसे वैशाली यांना शाळेपासूनच नृत्याची आवड होती, त्याच पाऊलांवर पाऊल ठेवून मुलाने वाटचाल केली आणि ती माऊली त्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला, स्पर्धेलात्याच्यासोबत गेली आणि लोकांच्या नजरा, विचार, शाब्दिक वार यांपासून जितके शक्य होईल, तितके त्याचे रक्षण त्यांनी केले.

आईसाठी तिचे लेकरू म्हणजे तिचे सर्वस्व असते. बर्‍याचवेळा आपल्या मुलाच्या चुका ती पाठीशीदेखील घालते आणि अनेकवेळा मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याच्या चुका सुधारून त्याला नवी दिशादेखील दाखवते. आशिष यांच्या आईनेदेखील त्यांच्या नृत्यांगना होण्याच्या छोट्याशा रोपट्याला आशिष यांच्या पदरात घातले आणि माळी म्हणून त्या रोपट्याचे खतपाणी घालून संगोपन करून त्याला मोठे केले आणि त्याने घेतलेला मोकळा श्वास हा आपल्याच शरीराचा एक अविभाज्य भाग आहे, याचा स्वीकार करत एका आईची ताकद दाखवून दिली. दै. ‘मुंबई तरुण भारत’चा या माऊलीला मानाचा मुजरा!


रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.