साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या बहुमोल स्मृती चिरंतन जपण्याचे काम ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’मध्ये ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासना’च्या माध्यमातून सुरू आहे. विद्यापीठात ‘ललित कला केंद्रा’ला लागूनच असलेल्या इमारतीत हे अध्यासन कार्यरत असून दै. ‘मुंबई तरुण भारत’ने या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अध्यासन प्रमुख डॉ. सुनिल भंडगे यांच्याशी संवाद साधला. तेव्हा हे अध्यासन शाहिरांच्या साहित्याचा ज्वलंत उद्गार जनमानसांत पोहोचवणारे लोकासन झाले आहे, याची प्रचिती आली. उद्याच्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने या अध्यासनाच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
35 कादंबर्या, 19 कथासंग्रह, 14 लोकनाट्ये, 11 पोवाडे, एक प्रवासवर्णन, शेकडो लावण्या, छकडी, गाणी अशी साहित्यिक श्रीमंती लाभलेला कलंदर लेखक म्हणजे अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ ‘साहित्यरत्न’ म्हणून मराठी साहित्यात जसे प्रसिद्ध आहेत, तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान, जनजागृतीचे कार्य सर्वश्रुतच. लेखन आणि समाजसुधारणा या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजूंनी दलित- वंचिताच्या उन्नतीची तळमळ मनात घेऊन आपले सारे आयुष्य वेचणार्या या थोर प्रतिभावंताची अस्सल कला प्रकट होताना तिने एक काळ जबरदस्त गाजवला. ती शाहिरी थाप आजही अमरतेचे बिरूद लेऊन मिरवते आहे.
‘फकिरा’ या कादंबरीतून एक क्रांतिकारी नायक उभा करणारे, खणखणीत आवाजात पोवाडे गाणारे अण्णाभाऊ साठे या कलंदर कलावंताचे संपूर्ण जीवन आणि लेखन अद्भुत आहे. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातल्या वाटेगावचा. वडील भाऊराव साठे आणि आई वालुबाई यांच्या पोटी दि. 1 ऑगस्ट 1920 रोजी जन्मलेले हे रत्न पुढे ‘साहित्यरत्न’ या उपाधीने वाटेगाव ते मॉस्को असा थक्क करणारा प्रवास करून मराठी लोकवाङ्मयाचा बुलंद आवाज ठरले.
अण्णाभाऊंचे लेखन चित्रमय बहारदार शैलीने नटलेले आहे. म्हणूनच त्यांच्या कादंबर्यांचे चित्रपट झाले. ‘वैजयंता’, ‘टिळा लावते मी रक्ताचा’, ‘वारणेचा वाघ’, ‘फकिरा’ इ. गाजलेले चित्रपट त्याची साक्ष आहेत. त्यांचा सारा जीवनपटसुद्धा एखाद्या चित्रपटासारखाच विलक्षण चित्रदर्शी आहे. याच सार्या आठवणींचा ठेवा पुणे विद्यापीठामध्ये ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन’ येथे चिरंतन स्वरूपात अतिशय आस्थेने जपला जात आहे. अण्णांचे साहित्य, त्यांचे जीवनचरित्र आणि त्यांच्या वस्तू यांची साठवण इथे नीट करून ठेवली आहे.
अभ्यासक व संशोधक इथे नित्यनियमाने येतात. साहित्यचर्चा करतात. विद्यापीठ, विद्यार्थी आणि समाज अशा तिन्ही स्तरांवर अण्णांच्या कार्याचा ठसा अखंड रहावा, असा अध्यासनाचा उद्देश आहे. यासाठी विद्यापीठ प्रशासन आणि अध्यासनाचे पदाधिकारी सातत्याने प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे, अण्णांचे नातू सचिन साठे यांचे या कामी सर्व प्रकारचे सहकार्य वेळोवेळी लाभते. विद्यापीठातील विविध अध्यासने ही सखोल संशोधन आणि शैक्षणिक अभ्यासात रमलेली असतात. परंतु, या लोकशाहिरांच्या नावे असलेल्या या अध्यासनाने त्यांच्या सामाजिक जाणिवेचा वारसा जपला असून, समाजातील विविध घटकांना आपल्या कामात सहभागी करून घेण्याचे धोरण निश्चित केले आहे.
विविध उपक्रम
‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, रमणबाग प्रशाला’, न्यू इंग्लिश स्कूल’, ‘गोखले इन्स्टिट्यूट’ अशा विविध शैक्षणिक संस्थांत चवदार तळे सत्याग्रह दिन, अण्णाभाऊंची जयंती व स्मृतिदिन असे नित्य वार्षिक उत्सव साजरे केले जातात.
टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाने ‘फकिरा’ कादंबरीवर प्रा. विजय रास्तेलिखित व निशिकांत रावजी दिग्दर्शित दोन अंकी नाटक सादर केले असून ‘मृणाल थिएटर’ प्रस्तुत या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यात दि. 10 जून 2018 रोजी अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात आणि दुसरा प्रयोग ‘निळू फुले थिएटर’ला सादर झाला.
लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर आणि अण्णांची भगिनी जाईबाई भगत-साठे श्रद्धांजली कार्यक्रमाला लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.
‘जातीभेदमुक्त विकसित भारत अभियानां’तर्गत फर्ग्युसन कॉलेजमध्ये आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचे अनुभवकथन आयोजित करण्यात आले होते. त्यात ‘पद्मश्री’ मिलिंद कांबळे व त्यांची पत्नी सीमा, डॉ. राजेंद्र हिरेमठ आणि लता अशा प्रसिद्ध दाम्पत्यांसह काही जोडपी सहभागी झाली.
अण्णांच्या 98व्या जयंतीला ‘रेडिओ सिटी’ वाहिनीने विशेष कार्यक्रम सादर केला.रतनलाल सोनग्रालिखित ‘विश्वसाहित्यकार जनगायक अण्णाभाऊ साठे’ या ग्रंथाद्वारे अण्णाभाऊंचे जीवन व साहित्य हिंदी भाषिकांपर्यंत पोहोचले. हा ग्रंथ अनेकांपर्यंत नेण्यासाठी ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या सहकार्याने एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
बालगंधर्व रंगमंदिरात ‘वारणेचा वाघ’ हा सिनेमा ‘लोकमान्य’ चित्रपटासोबत प्रदर्शित करण्यात आला होता.
पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक प्रसिद्ध कलावंत, गुणी लेखक, कवी हे अध्यासनाशी आपुलकीच्या नात्याने जोडले गेले आहेत. शिल्पकार प्रमोद कांबळेंनी अण्णांचे सुंदर शिल्प साकारून अध्यासनाला भेट दिले, तर अध्यासन आयोजित एका कवीसंमेलनात वात्रटीकाकार रामदास फुटाणे सहभागी होऊन अध्यासनाच्या या उपक्रमात मनापासून रमले.
पुरस्कार
‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार’ आणि ‘माता रमाई मातृशक्ती पुरस्कार’ असे दोन पुरस्कार विशेष कर्तबगार व्यक्तींना अध्यासनाच्यावतीने प्रदान करण्यात येतात. यातला पहिला पुरस्कार ‘शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी’चे अध्यक्ष शाहीर परिषदेचे शाहीर हेमंतराजे मावळे यांना आणि ‘मातृशक्ती पुरस्कार’ पुणे महापालिकेच्या स्वच्छता कर्मचारी स्वाती गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.
‘कोविड’ काळात ‘महर्षी कर्वे सेवा केंद्र’ यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन या संस्थेला ‘अण्णाभाऊ साठे पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सिनेदिग्दर्शक दिक्पाल लांजेकर यांच्या मातोश्री सुनिता लांजेकर, शाहीर नंदेश उमप, दीनानाथ साठे, दादा पासलकर आणि गेल्यावर्षी प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांना शाहीर साबळे यांच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटासाठी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना केदार शिंदे म्हणाले, “अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर चित्रपट काढण्याचे स्वप्न आहे. परंतु, इतक्या थोर साहित्यिकाचे बहुपेडी व्यक्तिमत्त्व, अद्भुत जीवनचरित्र आणि जागतिक कीर्तीचे साहित्य यांमुळे त्यांच्यावर सिनेमा काढणे, हे शिवधनुष्य पेलण्याइतके कठीण आहे, म्हणून हे स्वप्न साकार व्हायला बराच वेळ लागेल.”
या पुरस्काराचे स्वरूप रोख रु. पाच हजार, विद्यापीठ सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि समता सप्तक असे आहे. समितीचे सदस्य म्हणून प्रा. डॉ. प्रशांत साठे, प्रा. डॉ. गौतम बेंगाळे, प्रा. डॉ. श्यामा घोणसे, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर कुंभार, प्रा. डॉ. गणेश राऊत, प्रा. डॉ. तानाजी हातेकर, प्रा. विजय रास्ते हे सर्व मान्यवर काम करीत आहेत.
अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनिल भंडगे यांनी भावी उपक्रमांची माहिती दिली. लवकरच ‘चरित्रप्रकाशन समिती’मार्फत अण्णाभाऊंचे साहित्य एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. तसेच, अण्णाभाऊंच्या कादंबर्यांवरील चित्रपटांचे पोस्टर्स, त्यांच्या नित्य वापरातल्या काही वस्तू अध्यासनात ठेवण्यात येणार आहेत. असे सांगून त्यांनी विश्वास पाटीललिखित ‘अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान’ हे पुस्तकही लवकरच प्रसिद्ध होत असल्याची माहिती दिली.
विद्यापीठीय अध्यासनाच्या या कामात सर्व भाषा विभागांची मदत होते. त्यांपैकी हिंदी भाषा विभागप्रमुख प्रा. विजयकुमार रोडे हे अण्णाभाऊ साठे अध्यासनाशी विशेषत्वाने जोडले गेले आहेत. त्यांनी आपले अध्यासनाशी असलेले भावबंध उलगडले. ते म्हणाले की, “लोकशाहीर साठे अध्यासनाशी माझे भावनिक नाते आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या सहकार्याने संशोधनकार्य करणार्या होतकरू व्यक्ती किंवा संस्था यांना ठोस रकमेचे अनुदान उपलब्ध करून चांगल्या दर्जाचे संशोधन व्हावे, यासाठी आम्ही प्रस्ताव मांडणार आहोत,” अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
अध्यासनात नियमित येणारे एक अभ्यासक सूर्यकांत गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, “मी अर्थशास्त्रात पीएचडी करतो. पण, मला अण्णाभाऊंचे सामाजिक लेखन आकर्षित करते. म्हणून मी इथे नियमित येऊन वाचन करतो. माझे अनेक मित्र आणि मी इथल्या उपक्रमांत सहभागी होतो.”
“मातंग विकास संस्थे’चे राजेश रासगे हे आपल्या समाजबांधवांसह अध्यासनाच्या सर्व उपक्रमांना सहकार्य करतात. त्यांची संस्था अध्यासनाशी संयुक्तपणे कार्यक्रम करते. हे आमचे हक्काचे ठिकाण आहे,” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
एकूणच, पुणे शहरातल्या अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक व्यासपीठांशी नाते जोडून लोकाभिमुख झालेल्या या अध्यासनाने आपल्या कार्याचा योग्य तो ठसा समाजमनावर उमटवला आहे, याचा प्रत्यय देणारी ही प्रत्यक्ष अध्यासन भेट संस्मरणीय ठरली.
मुंबईतील ‘चिराग नगरी’ झोपडपट्टीत दि. 18 जुलै 1969 रोजी अण्णाभाऊंनी अखेरचा श्वास घेतला. परंतु, साहित्यरूपाने आपल्यातच चिरंतन असलेल्या अण्णाभाऊंच्या स्मृती ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’ने या अध्यासनाच्या माध्यमातून निष्ठेने जपल्या आहेत आणि हाच शाहिरांच्या स्मृतींना खर्या अर्थाने मानाचा मुजरा आहे!
अमृता खाकुर्डीकर
amruta.khakurdikar@gmail.com