डोळे झांकुनी करिती पाप...

    03-Jul-2024   
Total Views |
uttar pradesh Hathras Stampede


२०२० साली १९ वर्षीय मुलीवरील सामूहिक बलात्काराने हादरलेले हाथरस, परवाच्या चेंगराचेंगरीच्या भीषण दुर्घटनेनंतर पुन्हा आक्रोशात बुडाले. चेंगराचेंगरीच्या या प्रकरणात त्या सत्संगाचा आयोजक भोलेबाबा गजाआड होईलच. पोलीस, प्रशासकीय व्यवस्थेतही कदाचित निलंबनाच्या कारवाया होतील. पण, यापूर्वीच्या अशाच घटनांमधून आपण कोणताही बोध घेतलेला नाही, हेच या प्रकरणावरून सिद्ध होते.

मृतदेहांचे एकावर एक विखुरलेले खच, त्याशेजारी बसलेल्या नातेवाईकांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, तर कोणाच्या आपल्या जीवलगांना त्या प्रेतांच्या गर्दीत विषण्णपणे शोधणार्‍या हतबल नजरा... उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील फुलराईमधील भोलेबाबाच्या सत्संगानंतरचे त्या मैदानातील मंगळवारचे हे विदारक चित्र... सत्संग संपला आणि हा बाबा गर्दी होण्यापूर्वी अनुयायांसह परतीच्या मार्गाला लागला. बाबाचे चरणस्पर्श नाही, किमान त्या भोलेबाबाचे पाय लागलेल्या जमिनीची धूळ आपल्याला मिळावी, म्हणून भक्तांची जीवघेणी शर्यत उसळली. तिथेच सगळी धुळधाण उडाली आणि चेंगराचेंगरीत १२७ जणांचा हकनाक बळी गेला. मृतांची संख्या आणखीन वाढण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा विशेषत्वाने धार्मिक स्थळी घडणार्‍या चेंगराचेंगरीच्या घटना, अनुयायांची मानसिकता आणि एकूणच नियोजन-व्यवस्थापनातील फोलपणा चव्हाट्यावर आला आहे.

लाखो लोक जमा झालेल्या या बाबाचे नाव ‘भोलेबाबा’ असले, तरी भोळेपणाचा त्यात यत्किंचितही अंश नसावा. कारण, ही घटना घडल्यानंतर हा बाबा त्याच्या भक्तांच्या मदतीला धावून आला नाहीच, उलट तो स्वतःच मोटारीने धावत सुटला आणि फरारही झाला. त्यामुळे ज्या बाबाच्या मागे त्याचे अनुयायी धावत होते, त्या भोलेबाबाच्या मागावर आता उत्तर प्रदेशचे पोलीस हात धुवून लागले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकार या ढोंगीबाबाला आज ना उद्या गजाआड करेलच. कदाचित बाबाच्या आश्रमांवरही बुलडोझर फिरतील. पुढे न्यायालय शिक्षा वगैरेही सुनावेल. पण, प्रश्न हाच आहे की, यापूर्वी घडलेल्या अशाच शेकडो घटनांमधून आणि परवाच्या या हाथरसच्या दुर्देवी घटनेतून जनता, आयोजक, प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत का?


uttar pradesh Hathras Stampede


भोलेबाबा आणि त्याच्यासारख्या शेकडो ढोंगीबाबांनी देशाच्या कानाकोपर्‍यांत भक्तीचा बाजार मांडला आहे. केवळ ग्रामीण नाही, तर अगदी उच्चशिक्षित, सुशिक्षितवर्गही अशा बाबांच्या भूलथापांना बळी पडतो. महिलावर्गाचे प्रमाणही यामध्ये लक्षणीय. हाथरसचा भोलेबाबाही असाच सरकारी सेवेतून निवृत्ती पत्करलेला. नंतर पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान करून तो प्रवचने देऊ लागला. उत्तर प्रदेशातील महिलावर्गामध्ये बाबाची लोकप्रियता शिगेला पोहोचली. घरासमोरील हॅण्डपंपचे पाणी वापरून आजार बरे करतो, म्हणून या बाबाची पंचक्रोशीत ख्याती. अगदी मोठे नेते, मंत्रिमंडळीही बाबाच्या चरणी नतमस्तक होऊ लागले. अशा या बाबाने भोळ्या भक्तांना गळाला लावले. पण, हाच बाबा प्रारंभी आपल्याच कुटुंबातील मुलांना बेदम मारहाण करायचा. एवढेच नाही, तर सख्ख्या भावाच्या निधनानंतरही हा बाबा त्याच्या घराकडे फिरकला नाही. असा हा ‘सफेद कपडेवाला बाबा’ आपल्या कुटुंबाचा सख्खा झाला नसला, तरी उत्तर प्रदेशच नव्हे, तर मध्य प्रदेश, राजस्थानपर्यंत त्याने बस्तान बसविले. या बाबाची लीला इतकी अपरंपार की, आग्र्यातील एका सत्संगाच्या मैदानात पावसाचे पाणी साचल्यानंतर, तब्बल २० हजार महिलांनी म्हणे आपल्या साडीच्या पदरांनी ते संपूर्ण मैदान कोरडे केले. एवढेच नाही, तर याच बाबाने ‘कोविड’च्या काळात फारुखाबादमध्ये ५० जणांच्या सत्संगाच्या नावावर तब्बल ५० हजारांची गर्दी जमवली व तेव्हा प्रशासनाच्याही नाकीनऊ आले होते. पण, तेव्हाच जर या बाबावर कठोर कारवाईचा बडगा उगारला गेला असता, तर कदाचित आजचा एवढा मोठा अनर्थ टळलाही असता.

सूरजपाल उर्फ नारायण साकार हरी उर्फ भोलेबाबाच्या हाथरसच्या सत्संगाला पोलिसांची परवानगीही होती. पण, ती परवानगी घेताना आयोजकांनी दिलेला गर्दीचा आकडा हा ८० हजारांचा होता, तर प्रत्यक्षात अडीच लाखांची गर्दी तिथे उसल्याचे सांगितले जाते. अशा सत्संगात गर्दीचे नियोजन, व्यवस्थापन, सोयीसुविधा आदींची सर्वस्वी जबाबदारी ही आयोजकांचीच. तसेच, सत्संग संपल्यानंतरही गर्दीला बाहेर जाण्याच्या सूचना करणे, त्यासाठी तत्पर स्वयंसेवकांची फौज तैनात ठेवणे हेही आयोजकांचेच कर्तव्य. पण, या सर्वच बाबतीत आयोजक अपयशी ठरले. आयोजकांबरोबर पोलीस प्रशासनानेही या गर्दीचा अंदाज घेतला असता किंवा आयोजकांनी गर्दीनियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाला वेळीच पाचारण केले असते, तरी हे मानवी हलगर्जीपणाचे मृत्यू टाळता आले असते. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, अनुयायांची मानसिकता. अशा गर्दीच्या ठिकाणी अनुयायांनी अतिउत्साहीपणा टाळणे, मार्गदर्शक सूचनांचे, दिशादर्शक फलकांचेे काटेकोरपणे पालन करणे हेही क्रमप्राप्तच. शक्यतो अशा गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहणे कधीही सोयीस्कर. पण, तिथे गेल्यावरही सजग, जागृत राहणे, आपले आप्तजन, लहान मुले, सोबतच्या वस्तूंची काळजी घेण्याची जबाबदारी ही सर्वस्वी अनुयायांचीच! कारण, म्हणतात ना, जान हैं तो जहान हैं...

श्रद्धा-अंधश्रद्धा, भक्ती-अंधभक्ती यांचे द्वंद्व हे तसे वर्षानुवर्षांचे. पण, आपण गुरूस्थानी, भक्तीस्थानी ज्या व्यक्तीला मानतो, पूजतो त्याची पार्श्वभूमी, त्याचे चारित्र्य, अध्यात्मिक ज्ञानपातळी याचीही आजच्या काळात शहानिशा अनुयायांनी जरूर करावी. कारण, एकदा गुरू मानल्यानंतर ती व्यक्ती आपल्याला अध्यात्मिक दिशादिग्दर्शन करणारी, परमार्थाचा मार्ग दाखवणारी असते. पण, देवासमान मानलेले हे गुरूच, त्यांच्या भक्तांच्या जीवाशी भोलेबाबासारखा असा जीवघेणा खेळ करत असतील, तर भक्तांनी त्यांची सदसद्विवेकबुद्धी जागृत करण्याची हीच ती वेळ. संत तुकाराम महाराज सांगतात तसे-

ऐसे कैसे जाले भोंदू। कर्म करोनि म्हणति साधु॥१॥
अंगी लावूनियां राख। डोळे झांकुनी करिती पाप॥२॥
दावुनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा॥३॥
तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती॥४॥
|

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची