कामगार कल्याण मंडळाचे योगदान मोलाचे!

    03-Jul-2024
Total Views |
 
Raviraj Ilave
 
मुंबई : महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे योगदान महत्वाचे आहे. मंडळाच्या माध्यमातून अनेक नामवंत कलाकार, साहित्यिक, खेळाडू नावारुपाला आले असून याचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, १ जुलै रोजी प्रभादेवी मुंबई येथील हुतात्मा बाबू गेनू मुंबई कामगार क्रीडा भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
 
यावेळी बोलताना रविराज इळवे म्हणाले की, "कामगार मंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे हे माझगाव डॉक येथे कामगार म्हणून कामाला असताना मंडळाच्या कामगार क्रीडा भवनाच्या मैदानात हॉली बॉल खेळायला यायचे. एका सामान्य कामगारापासून कामगार मंत्री अशा त्यांनी केलेल्या प्रवासात मंडळाचेदेखील योगदान आहे. याचबरोबर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, कामगार कवी अविनाश दौंड, अभिनेते यशवंत दत्त, रमेश भाटकर, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, अलका कुबल, निर्मिती सावंत, विशाखा सुभेदार, आदेश बांदेकर, संजय खापरे, ज्येष्ठ नाटककार गंगाराम गव्हाणकर, विजय खानविलकर, ज्येष्ठ साहित्यिक उद्धव कानडे, पुरुषोत्तम सदाफुले, अरुण म्हात्रे, मनोहर धोत्रे, किरण भावसार, बलवंत भोयर, पद्मश्री तारानाथ शेणॉय (जलतरण), ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे (बुद्धीबळ), राष्ट्रीय मास्टर किताब विजेते प्रकाश केळकर (टेनिस), महेंद्र चिपळूणकर (टेबल टेनिस), अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू सदानंद शेट्ये (कबड्डी), जयराम शट्ये (कबड्डी), शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या रक्षा महाराव (वेटलिफ्टिंग), राष्ट्रीय खेळाडू विजय कुवळे (बॅडमिंटन) अशा अनेक मान्यवरांना मंडळाच्या सुविधांचा लाभ झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
हे वाचलंत का? -  अशाप्रकारे जर जीन्स टी-शर्टवर बंदी आली तर विद्यार्थी रस्त्यावर उतरतील!
 
याप्रसंगी कामगार नेते दिलीपदादा जगताप, कामगार विभागाचे सेवानिवृत्त उपसचिव दादासाहेब खताळ, इंटकचे माजी अध्यक्ष अनिल गणाचार्य, लेखक मनोहर धोत्रे, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सचिव तथा कवी अविनाश दौंड, लेखक नाटककार अविनाश कोल्हे, सनदी लेखापाल रवि गुलगुले, रायफल शुटींग प्रशिक्षक विश्वजित शिंदे, जिमनॅस्टिक्स प्रशिक्षक अजित शिंदे, मुंबई मोबाईल क्रेशचे प्रदीप शिंदे, नाट्यकर्मी प्रकाश बाडकर, नाट्य प्रशिक्षक व लेखक विजय सकरे, अभिनेत्री निलांबरी खामकर, गुणवंत कामगार संघटनेचे दिलीप खोंड, नाटककार राम सारंग, संगीत प्रशिक्षक वसंत कदम आदी मान्यवर उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.