वैभवसंपन्न’ मूर्तिकार अलकाताई...

    03-Jul-2024   
Total Views |
Alka Maduskar


गिरणगावात गेली ३० वर्षे अविरतपणे आपल्या कुटुंबासहित गणरायाची सुबक मूर्ती घडविणार्‍या अलकाताई मादुस्कर यांच्या जीवनप्रवासाचा मागोवा घेणारा हा लेख...

'बुद्धीची देवता’ म्हणजे गणराय. अशा या गणरायाच्या भक्तीत काही जण बालवयातच तल्लीन होऊन जातात. ६४ कला आणि १४ विद्यांची देवता असलेल्या बाप्पाला कलाकार मंडळीही आपल्या कलाआविष्कारांतून वंदन करतात. त्यापैकी काहींना अवगत असते ती मूर्तिकला. आपल्या आवडत्या बाप्पाची अशीच सुबक मूर्ती आपल्याच हातून घडवणे हेसुद्धा एकाअर्थी विलक्षणच. मुंबईतील गिरगावच्या झावबावाडी परिसरात राहणार्‍या प्रिया प्रदीप मादुस्कर म्हणजेच सर्वांच्या लाडक्या अलकाताई यांची गोष्ट साधारण अशीच. गणपतीचे त्यांना बालपणापासून वेड आणि आज लग्नानंतर गेली ३० वर्षे बाप्पाच्या आखीवरेखीव मूर्त्या त्यांनी साकारल्या आहेत..

अलकाताईंचे बालपण गुजरातमध्ये गेले. आई, वडील, तीन भाऊ असे त्यांचे कुटुंब. बालपण खेडेगावात गेल्याने परिस्थितीदेखील तशी हलाखीचीच. शिरगावच्या कन्हैयालाल देविचंद बोरलाईवाला म्हणजेच केडीबी हायस्कुल येथे अलकाताईंचे शालेय शिक्षण, तर नारगोळच्या जमशेटजी टाटा महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. शाळेतील एक गमतीशीर आठवण म्हणजे चौथी-पाचवीत असताना शिक्षकांनी मुलांना झिबर्‍यावाली बाहुली काढायला सांगितली होती. अलकाताईंनी काढलेली बाहुली पाहून शिक्षकांना त्यांचे कौतुक वाटले. या मुलीच्या हातात कला आहे, हे शिक्षकांनी तेव्हाच हेरले. त्यात अल्काताईंचे अक्षरही मोत्यांच्या दाण्यासारखे सुरेख. त्यामुळे त्यांनी ‘कमर्शिअल आर्ट’ क्षेत्रात करिअर करायचे ठरविले. या क्षेत्रात प्रवेश घेऊन अलकाताईंनी आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयानंतर त्यांनी दादर प्रायव्हेट एजंसीमध्ये काही काळ नोकरी केली.

अलकाताईंना लहानपणापासूनच चित्रकलेची विलक्षण आवड. ‘टेक्स्टाईल डिझाईन’ बनवण्यात त्यांचा हातखंडा. जाहिरात क्षेत्रातील कामाचा अनुभवही गाठीशी होताच. इतकेच नव्हे, तर विविध पुस्तकांच्या मुखपृष्ठांचीही त्यांच्या चित्रकौशल्याने शोभा वाढवली. दोन वर्षांच्या नोकरीनंतर त्यांच्या कुटुंबीयांकडून स्थळदर्शन सुरु झाले. नशीब किंवा योगायोग, पहिलेच स्थळ आले ते झावबावाडीतील प्रसिद्ध गणपतीवाले मादुस्कर म्हणजे मूर्तिकार प्रदीप मादुस्कर यांचे. पहिलेच स्थळ आणि उत्तर काय द्यायचे, या विचारात असताना चक्क स्वतः गणपती बाप्पाने अलकाताईंच्या स्वप्नात येऊन साक्षात्कार केला व मुलाकडच्यांना होकार देण्यास सांगितले. हा जणू त्यांच्यासाठी शुभसंकेतच होता. दोन्ही घरांतून होकार आल्यानंतर अलकाताई प्रदीप मादुस्कर यांच्याबरोबर विवाहबंधनात अडकल्या. मादुस्कर कुटुंबासोबतच त्यांचे येथील गणपती कारखान्याशीही नाते जुळत गेले.

रामकृष्ण विष्णू मादुस्कर यांच्या ८६ वर्षे जुन्या कारखान्यात गेली ३० वर्षे अलकाताई कार्यरत आहेत. राजेशाही रुप असलेले वैभवसंपन्न गणपती म्हणून आजही मादुस्करांच्या गणपतीची विशिष्ट ओळख. पती प्रदीप मादुस्कर, मुले गणेश आणि गौरव, त्यांच्या पत्नी या सर्वांसोबत अलकाताई आज हा व्यवसाय सांभाळतात. मादुस्कर कुटुंबाव्यतिरिक्त कारखान्यात एकूण दहा कारागीर आहेत. त्यांना अलकाताईंनी कधीच नोकर म्हणून वागवले नाही. आपल्या मुलांप्रमाणे त्यांनाही जीव लावला. अशावेळेला जात-पात बघायची नसते, हा मोठा संदेश त्या आपल्या स्वभावातून देतात.

अलकाताईंचा स्वभाव अतिशय बोलका. सासरीसुद्धा त्या अगदी माहेरी असल्यासारख्याच नांदायच्या. लग्नानंतर नोकरी सोडली होती म्हणून हाताला काहीतरी काम हवे, याकरिता त्यांनी आपल्या सासर्‍यांना कारखान्यात जाऊ का, म्हणून विचारले. सासर्‍यांना आधी प्रश्न पडला की, ‘कमर्शिअल आर्ट’मध्ये शिकलेली मुलगी गणपतीच्या मूर्त्या कशा काय बनवेल? मात्र, अलकाताईंनी जेव्हा पहिल्यांदा कारखान्यात पाऊल टाकले, तेव्हा इतर कारागीर कशा मूर्त्या बनवत आहेत, याचे त्यांनी निरीक्षण केले. मग स्वतःहून त्यांनी शाडूच्या मातीला आकार द्यायला सुरुवात केली. तेव्हापासून लागलेली गोडी आजतागायत कायम आहे. अलकाताई गृहिणी असल्या, तरी रोज सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत त्या कारखान्यात मूर्ती घडवण्यात व्यस्त असतात. एवढे करून त्या घरसुद्धा व्यवसस्थित सांभाळतात.

आपल्या जीवनातील असाच एक प्रसंग त्या सांगतात. गणपतीचे दिवस होते. बरेचजण ट्रक-टेम्पोतून वाजत-गाजत गणपती नेत होते. त्यांपैकी एक मूर्ती नेण्यासाठी नेमका छोटा टेम्पो आला होता. मूर्तीच्या आकारमानानुसार सहजासहजी ती मूर्ती टेम्पोमध्ये बसवणे शक्य नव्हते. समोरच्या मंडळींना याचा अंदाज आला नाही आणि डोळ्यांदेखत टेम्पोसहित मूर्ती कलंडली. त्याक्षणी त्यांना प्रचंड वाईट वाटले. मात्र, आज मादुस्कर कुटुंबावर स्वतः गणरायाचा वरदहस्त आहे, असे म्हणायला निश्चितच हरकत नाही. गिरगावातील वैभवसंपन्न गणपती म्हणून मादुस्करांच्याच मूर्तीची विशेष ओळख तयार झाली असून, अलकाताई आणि सर्व कुटुंबीयांनी साकारलेल्या गणेशमूर्ती कित्येक कलाकार, मान्यवरांच्या घरी विराजमान झाल्या आहेत. त्यात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे, मंगेशकर घराणे, अशा अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

प्रिया प्रदीप मादुस्कर यांच्या हातातील ही कला सदैव शाबूत राहो, त्यांच्या हातून अशीच निरंतर गणरायाची सेवा घडत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना व त्यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे अनेकानेक शुभेच्छा!

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक