‘माझ्यातील बुद्धाचा शोध’ या मानसी चिटणीस यांच्या काव्यसंग्रहाला नुकताच ‘बाबा भारती साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला. त्यानिमित्ताने या समाजशील कवयित्रीच्या साहित्यजीवनाचा घेतलेला मागोवा...
काही वर्षांपूर्वी मानसी चिटणीस एकाचवेळी आठ वर्तमानपत्रांमध्ये सदरलेखन करीत असत. त्यावेळी सामाजिक चळवळीत काम करणार्या अनेकांशी त्यांचा संपर्क आला. सगळ्यांच्या बोलण्यात बुद्धांचे तत्वज्ञान, बुद्धांनी सांगितलेली चार आर्यसत्ये, बुद्धांनी सांगितलेला अष्टांगमार्ग हे विषय येतच असत. कोकणातील चित्पावन ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या मानसी चिटणीस यांनी बुद्धांनी सांगितलेल्या आर्यसत्यांचा अभ्यास केला. त्या अभ्यासाचा आणि वास्तविक जीवनातील घडामोडींचा अर्थ लावला आणि त्यातून त्यांचा ‘माझ्यातील बुद्धाचा शोध’ हा काव्यसंग्रह निर्माण झाला. ‘माझ्यातील बुद्धाचा शोध’ या काव्यसंग्रहाआधी त्यांचे ‘सृजनभान’, ‘सांजवर्खी शकुन’ हे काव्यसंग्रह प्रकाशित झालेच होते. तसेच, ‘उत्सव कथांचा’ हा प्रातिनिधिक कथासंग्रह प्रकाशित झाला आहे.
20हून अधिक पुस्तकांसाठी त्यांनी प्रस्तावनालेखन केले.कथाकथन, कवितालेखन, अभिवाचन, बालगीते, नाट्यछटा स्पर्धा यांत परीक्षक म्हणूनही त्यांचा सहभाग असतो. ‘कवितासखी’ या स्वरचित कार्यक्रमाचे त्या सादरीकरण करतात. तसेच, ‘ही कविता आली तुम्हास भेटायला’ या कार्यक्रमाचे आयोजनही करतात. मानसी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दुमध्येही सुरेख काव्यलेखन करतात. अंतरंगात साहित्याची अग्नीशिखा प्रदिप्त असलेल्या मानसी या ‘समरसता साहित्य परिषद’ पिंपरी-चिंचवड शाखेच्या कार्यवाह आहेत. ‘महाराष्ट्र राज्य कामगार साहित्य परिषदे’च्या कार्यकारी विश्वस्त असून ‘पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य व कला आकादमी’च्या मुख्य कार्यवाह आहेत. त्याचप्रमाणे, त्या ‘यशवंतरावजी चव्हाण प्रतिष्ठान’ पिंपरी-चिंचवड विभागाच्या सदस्य आहेत. अनेक पुरस्कारांनी मानसी आणि त्यांचा साहित्यिक प्रवास सन्मानित झाला आहे.
मुळचे कोकणातले असलेल्या दिगंबर आणि मनिषा रानडे या दाम्पत्याला दोन अपत्ये. त्यांपैकी एक मानसी. दिगंबर हे कामानिमित्त कोल्हापूरमध्ये नेाकरी करू लागले. मार्केटिंगमध्ये कधीच वेळेवर पगार मिळत नसे. ठरल्याप्रमाणे पगार मिळणे तर दूरच. नोकरीच्या बाबतीत अस्थिरताच असे. त्यामुळे घरी पैशाची चणचणच असे, तर मनिषा या बालवाडी शिक्षिका म्हणून काम करत. घरबसल्या इतरांच्या साड्यांना पिको फॉल लावत. त्यावर कसाबसा प्रपंच होत असे. इयत्ता चौथीपासूनच मानसीही छोटी-मोठी कामे करत. त्यांतून काही जास्त पैसे येत नव्हते, मात्र आयुष्यात कष्ट आणि कमाई यांचा मेळ बसवता आला पाहिजे, याची अक्कल मात्र मुलांना येत होती.
मानसी शाळेमध्ये हुशारच होत्या. स्कॉलरशिप परीक्षा असू दे, की कोणत्याही स्पर्धा, त्यांत मानसी यांचा पहिला क्रमांक असायचा. मानसी यांना वाचनाची, साहित्याची भरपूर आवड होती. कारण, मानसीच्या मातापित्यांना वाचनाची आवड होती. कितीही पैशांची अडचण असू दे, मात्र रानडेंच्या घरी पुस्तके विकत आणली जायची. दहावीनंतर मानसी यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. महाविद्यालयात असतानाच त्या ‘अभाविप’च्या कार्यकर्त्या झाल्या आणि पदाधिकारीही झाल्या. ‘अभाविप’ची कार्यकर्ता म्हणून जडणघडण होताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत होता. तसेही मानसी यांचे बाबा हे संघ स्वयंसेवक, तर आईचे माहेर हेही संघ समर्पितच होते.
असो. लवकर नोकरी लागावी म्हणून ‘टॅक्सेशन डिप्लोमा’ केला. या शिक्षणाचा खर्च त्यांनी दोन अर्धवेळ नोकर्या आणि मुलांची खासगी शिकवणी घेऊन पूर्ण केला. त्यांना आणखी उच्चशिक्षण घ्यायचे होते. मात्र, परिस्थितीमुळे शक्य नव्हते. हो मात्र शिकत असतानाच त्यांचा आणि विजय चिटणीस यांचा विवाह निश्चित झाला. परीक्षेचा शेवटचा पेपर संपला आणि दुसर्याच दिवशी त्यांचा विवाह विजय चिटणीस यांच्याशी झाला. मुळचे सांगलीचे, पण कामानिमित्त पुण्यात स्थायिक झालेले विजय अत्यंत सुस्वभावी. मानसी यांचा 2001 ते 2016 हा 16 वर्षांचा काळ संसाराचा ताळमेळ बसवता बसवता गेला. जगरहाटी सुरू असली, तरी मानसी यांच्या अंतरात्म्यातली कविता आणि साहित्यही थांबले नव्हते. प्रत्यक्ष कवीसंमेलनात किंवा स्पर्धेत सहभागी होणे त्यांना जमायचे नाही. मग त्यांनी सोशल मीडियावर कविता पोस्ट केली. ती सुरुवात होती.
पुढे पतीच्या कंपनीतून निघणार्या वार्षिक साहित्य पुस्तकामध्येही त्यांची कविता छापली गेली. हजारो लोकांनी त्या कवितेवर कौतुकाचा वर्षाव केला. विजयरावांनीही मानसीना प्रोत्साहन दिले. याच काळात रमेश वाकनिस यांच्यामुळे त्यांचा ‘समरसता साहित्य परिषदे’शी त्यांचा संपर्क आला. शोभा जोशी, सुहास घुमरे यांच्याशी परिचय झाला. आज त्या परिषदेच्या पदाधिकारी आहेत.पुढे त्यांचा ‘सृजनभान’ हा पहिलावहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. पहिल्याच काव्यसंग्रहाला किमान आठ पुरस्कार प्राप्त झाले. समाजामध्ये साहित्यातून चेतना निर्माण करणार्या मानसी यांना यापुढे साहित्यनिर्मितीतून समाजासाठी कार्य करायचे आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जाणिवा निर्माण करण्यासाठी काम करायचे आहे. जातीपातीत वाटलेल्या समाजाला साहित्यनिर्मितीतून समरस करायचे आहे. मानसी चिटणीस या कवयित्रीची समाजशीलता समाजाला दिशा देणारी आहे.