हमासचा खात्मा होणारच...

    28-Jul-2024   
Total Views |
israel pm netyanahu visited usa


इस्रायल-हमासमधील युद्धसंघर्ष अद्यापही शांत झालेला नाही. यादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा हमासचा खात्मा केल्यानंतरच युद्ध थांबेल, असे म्हटले. मागील वर्षी 7 ऑक्टोबरला सुरू झालेल्या युद्धात, अनेक देशांनी राजकीय पोळ्या भाजून घेतल्या.

मात्र युद्धविराम करण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाही. युद्धाच्या कळा सोसणार्‍या लोकांकडे पाहून, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अनेक देशांनी युद्धविराम करण्याची मागणी केली. यामुळे इस्रायल समर्थक देशांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. खुद्द इस्रायलचा मित्र असलेल्या अमेरिकेनेही त्याच्याविरोधात कठोर भूमिका घेतली. अशातच आता बेंजामिन नेतान्याहू अमेरिका दौर्‍यावर गेले. नेतान्याहू अमेरिकेला का गेले, त्याचा हमास युद्धावर काही परिणाम होईल का, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर, अमेरिकेत मोठी राजकीय उलथापालथ झालेली पाहायला मिळत आहे. वर्तमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तर आपली उमेदवारी मागे घेऊन, ती कमला हॅरिस यांच्याकडे सोपवली आहे. नुकताच हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी नामांकन अर्जदेखील दाखल केला आहे.

याआधी जो बायडन यांनी इस्रायल- हमास युद्धावेळी कठोर भूमिका घेतली होती. मात्र, नेतान्याहू यांनी अमेरिकेचा दौरा करत, हमासला संपविण्याचा पुनरुच्चार केला आहे. नेतान्याहू यांनी जो बायडन यांच्यासह माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीदेखील भेट घेतली. विशेष म्हणजे, एकीकडे इस्रायलला युद्धावरून दोष देत, युद्ध थांबविण्यास सांगायचे, आणि दुसरीकडे चर्चासुद्धा करायची यामुळे अमेरिका दोन दगडांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करतो, हे स्पष्ट होते. अमेरिका आणि इस्रायल यांची मैत्री फार जुनी आहे. 1917 साली ब्रिटिशांनी बाल्फोर घोषणापत्र जाहीर केल्यानुसार फिलिस्तीनमध्ये वेगळे यहुदी क्षेत्र घोषित करण्यात आले. 1919 साली तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष वुडरो विल्सन यांनी या निर्णयाचे समर्थन केले.

1948 साली इस्रायल अस्तित्वात आल्यानंतर, त्याला मान्यता देणारा अमेरिका हा पहिला देश होता. इस्रायलला मान्यता देण्याच्या 11 मिनिटांतच अमेरिकेने त्याचे समर्थन केले. हमास युद्ध थांबविण्याची विनंती अनेक देश करत असले, तरीही इस्रायल मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून, हमासवरील हल्ले आणखी तीव्र करत आहे. अमेरिकेने युद्ध थांबविण्याची विनंती केली खरी, मात्र खुद्द नेतान्याहू यांनी थेट अमेरिकेत जाऊनच हमासला संपविण्याचा प्रण करून अमेरिकेला अस्मान दाखविले. त्यामुळे अमेरिकेची इकडे आड, तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. दरम्यान, दोन्ही देशांना एकमेकांची आर्थिकदृष्ट्या गरज आहे.

इस्रायलचा सर्वात मोठा आर्थिक सहकारी अमेरिका असून, दुसर्‍या विश्वयुद्धानंतर आतापर्यंत इस्रायलला अमेरिकेकडून 158 अरब डॉलरची मदत मिळाली आहे. दरवर्षी जवळपास 3.8 अरब डॉलरची मदत मिळते, जी इस्रायलच्या संरक्षण बजेटच्या 16 टक्के आहे. दोन्ही देशांदरम्यान दरवर्षी 50 अरब डॉलरचा व्यापार होतो. अमेरिकेच्या सहकार्याने इस्रायलने मोठा संरक्षण उद्योग उभा केला आहे. आज जगभरात तो शस्त्रास्त्रांची निर्यात करणारा दहावा देश आहे. अरब जगताच्या राजकारणात इस्रायलचे महत्व अधिक आहे. अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणातही, इस्रायल नीतीचे महत्त्व आहे. 1972 नंतर संयुक्त राष्ट्र परिषदेत अमेरिकेने इस्रायलविरोधातील जवळपास 50 प्रस्ताव पाडले आहेत.

इस्रायल एक अघोषित आण्विक शक्ती असून, अमेरिकेच्या छत्रछायेमुळेच कधीही त्याला चौकशीचा सामना करावा लागला नाही. इस्रायल भारताचाही मित्र आहे. भारताने वेळोवेळी इस्रायलला सहकार्य केले आहे. मात्र, अमेरिकेसारखा दुतोंडीपणा कधीही दाखवला नाही. रशिया असो वा इस्रायल भारताने आपली युद्धविरामाची मागणी कायम ठेवली. मात्र, महासत्ता म्हणवून घेतली जाणारी अमेरिका सध्या किती वाईट अवस्थेत पोहोचली आहे, ते नेतान्याहू यांच्या दौर्‍यावरून स्पष्ट होते. हमासचा खात्मा होणार हे तर नक्की, कारण इस्रायल आपल्या शत्रूला कधीच माफ करत नाही, असं म्हणतात.



7058589767

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.