‘माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ संकल्पपूर्ती २०० सभांची

    27-Jul-2024   
Total Views |
love jihad cases against sabha


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, “आवाज न होणारा, न दिसणारा असा एक दहशतवाद आहे, जो समाजाला उद्ध्वस्त करतोय, तो दहशतवाद म्हणजे ‘लव्ह जिहाद.’ ’ना जमी मिली ना फलक मिला’ असे भयानक आयुष्य जगणार्‍या-मरणार्‍या ‘लव्ह जिहाद’च्या बळी ठरणार्‍या मुली. दै. ‘मुंबई तरूण भारत’ने ‘लव्ह जिहाद’विरोधात ‘माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ या विषयावर २०० सभा घेण्याचा संकल्प केला. हा संकल्प नुकताच पूर्ण झाला. या सभांच्या संकल्पपूर्तीनिमित्त या अभियानातील आजवरच्या प्रवासाचा घेतलेला हा मागोवा...

आमच्या घरी दै. ‘मुंबई तरुण भारत’ दररोज येतो. त्यामध्ये तुमचे ‘लव्ह जिहाद’वरचे लेख, कार्यक्रमाच्या बातम्या वाचून घरी चर्चा करायचो. घरी कामाला येणार्‍या बाई हे सगळं ऐकायच्या. एके दिवशी त्या म्हणाल्या, ’‘ताई, तुम्ही ‘लव्ह जिहाद’ का काय बोलता ना? माझ्या पोरीची मैत्रीण एका मुसलमानाच्या नादाला लागली. तो मुलगा चांगला नाही. पण, ती म्हणते मुसलमान बनून त्याच्याशीच ‘निकाह’ करणार. आईबाबाला वात आणलाय तिनं! काय केलं पायजे?” मी दै.‘मुंबई तरुण भारत’मध्ये ‘लव्ह जिहाद’विरोधात आलेले तुमचे लेख, बातम्या आणि मुख्यतः रूपाली चंदनशिवे आणि कल्पना क्षीरसागर या समाजाच्या मुलींची झालेली हत्या, या सगळ्या गोष्टी तिला सांगितल्या. तिला सांगितले की, हे सगळे तू त्या मुलीला सांग. आमच्या बाईंनी मुलीच्या मैत्रिणीला ‘लव्ह जिहाद’ म्हणजे काय आणि रूपाली चंदनशिवे, कल्पना क्षीरसागर ‘लव्ह जिहाद’ हत्याकांडाबद्दल सांगितले. हे सगळे ऐकून ती मुलगी रडायला लागली. त्या मुलीने त्या मुसलमान व्यक्तीशी संपर्क-संबंध तोडून टाकले. ती मुलगी आणि तिचे आईबाबा खूप खूश आहेत. वस्तीमध्ये यापुढे कुणाही मुलीला फसू देणार नाही, असा आमच्या बाईंनी संकल्प केला. हे सगळे तुमच्या २०० सभांच्या संकल्पाचा परिणाम आहे.” पुणे, कोथरूड येथील शची पाटणकर यांनी सांगितलेला हा किस्सा. २०० सभांची संकल्पपूर्ती करताना आलेले असे अनेकांचे अनुभव आपण योग्य दिशेने जात आहोत, यावर शिक्कामोर्तब करुन गेले.

२०२२ सालची घटना. बुरखा घालत नाही म्हणून २३ वर्षीय रूपालीचा तिच्या ३९ वर्षीय पतीने इकबाल शेखने गळा चिरला. या संपूर्ण घटनेचा मागोवा घेताना ‘लव्ह जिहाद’च्या भयानकतेचे क्रूर वास्तव जवळून पाहिले. ”तू मीडिया से हैं ना? ‘लव्ह जिहाद’ नही बोलने का. लिखने का की, मिया-बीबी का घरेलू मामला हैं. इसमे ‘जिहाद’ को बिच मे मत ला. कौम की बदनामी होती हैं समझी.” अशी धमकी देत हनुमानजींच्या मंदिरातच अंगावर धावून येणारे ते ६०-७० मुस्लीम स्त्री-पुरुष. त्यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या प्रकरणात पीडितांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी खूप सहकार्य केले. ‘लव्ह जिहाद’चा बळी ठरलेल्या रूपालीच्या घरच्यांना ‘लव्ह जिहाद’ म्हणजे काय, हेदेखील माहिती नव्हते. पण, इकबालच्या समाजाचे तिथले काही लोक संघटितपणे ‘लव्ह जिहाद’ शब्दाला विरोध करत होते. ‘लव्ह जिहाद’ हा शब्द मीडियामध्ये येऊ नये, पोलीस तक्रारीत येऊ नये म्हणून आक्रमक झाले होते. आपल्या समाजात ‘लव्ह जिहाद’बद्दल जागृती नाही, हे या घटनेतून पुनश्च अधोरेखित झाले.

त्यानंतर दै. ‘मुंबई तरूण भारत’चे संपादक किरण शेलार यांच्या मार्गदर्शनाने ‘माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ या उपक्रमाची सुरुवात झाली. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, रायगड, पालघर, नवी मुंबई या सात शहरांमध्ये किमान २०० सभांचा संकल्प करण्यात आला. पुढे जालना, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि रत्नागिरीमध्येही सभा झाल्या. दि. ७ जानेवारी २०२३ रोजी मालवणी-मालाड येथे ‘आधारिका महिला’ संस्थेच्या अंतर्गत पहिली सभा झाली. माझ्यासोबत व्याख्यात्या होत्या शीतलताई निकम. तर, एक-दोन व्याख्यानाला गायत्री गोईंग, करिश्मा भोसले आणि साक्षी गायकवाडही सोबत होत्या. त्यानंतर मग सभा होतच राहिल्या. प्रत्येक सभेत किमान आठ ते दहा महिला जोडल्या गेल्या. ज्यांना ‘लव्ह जिहाद’विरोधात काम करायचे आहे, तसेच प्रत्येक गावात ‘लव्ह जिहाद’चा बळी गेलेली मुलगी आहेच आहे. या सभांच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात समाज सोबत आला. लोकांनी दिलेले प्रेम, घेतलेली काळजी याबद्दल तर माझ्याकडे शब्दच नाही!

याच पार्श्वाभूमीवर अनेकदा विपरित अनुभवही आले. नाशिकमध्ये ज्यांनी सभा ठेवली होती, त्यांना ‘जिजाऊ’ आणि ‘संभाजी ब्रिगेड’वाल्यांच्या नावाने फोन आला होता की ”तुम्ही ही सभा घेऊ नका. त्याने दंगल माजू शकते.” मात्र, सभा का आवश्यक आहे, हे मी त्या आयोजकांना समजावले आणि सभा झाली. अनेक सभांमध्ये बुरखाधारी महिला किंवा मुस्लीम पुरुषही पारंपरिक वेशात उभे असत. त्यांना कुणीही बोलावलेले नसायचे. सभेला येणारे हे आगंतुक काय विचार करत असतील? ते का येत असतील? हाही एक प्रश्नच. मुंबईतल्या एका सभेतही हेच दृश्य होते. सभा संपली आणि हॉलबाहेरच उभी असलेली टोपीधारी सात-आठ माणसे भेटायला आली. ते शांतपणे म्हणाले, ”मॅडम, आप गलत सोच रहे हो. सभी मुसलमान ‘लव्ह जिहाद’ करते हैं क्या?” असे म्हणून ते ‘इस्लाम अमन, सुकून, इज्जत’ वगैरे वगैरे बोलू लागले. मीही शांतपणे म्हणाले, ”ठीक आहे, पण श्रद्धा वाळकरचे ३६ तुकडे करणारा आफताब पूनावाला, रूपालीचा गळा चिरणारा इक्बाल शेख, १६ वर्षांच्या साक्षीच्या पोटात २० वेळा चाकू खूपसून तिच्या मृतदेहावर नाचणारा आणि तिचं तोंड मोठ्या दगडाने चिरडणारा साहिल कुरेशी, पूनम क्षीरसागरचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून फेकणारा नवाब खान आहे. तर, या घटना सांगताना त्या खुन्यांची नावे सांगणे चूक आहे का? रूपालीच्या जागी रूखसार, साक्षीच्या जागी सलमा असती, तरी हेच दुःख आम्हाला वाटले असते. हिंदूंच्या असो की मुस्लिमांच्या मुली, आईबाबांच्या काळजाचा तुकडाच असतात ना?” हे ऐकल्यावर, “नही नही हमारा मतलब ऐसा नही वैसा नही”असे काहीतरी गुळमुळीत बोलत ते निघून गेले. तसेच सभेच्या आधीच पोलिसांनी चौकशी करणे, सभेचे रेकॉर्डिंग करणे, हे तर नेहमीचेच. मात्र, सर्वच सभांना उपस्थित असलेल्या सर्वच पोलीस बांधव-भगिनींनी नेहमीच या सभांना वैयक्तिक पाठिंबा दिला.समाजात जागृती आणणे गरजेचे आहे. आमचा तुम्हाला सपोर्ट आहे, पण वरून आलेल्या आदेशाचे पालन करावे लागते ना, असे ते म्हणायचे.

असो. सभा घेताना वैयक्तिक स्तरावरही अडचणी आल्याच. एक सर्वसाधारण संकेत आहे की, सार्वजनिक स्तरावर वैयक्तिक घटनांचा उल्लेख करू नये. पण, संकल्पपूर्तीदरम्यान घडलेल्या दोन वैयक्तिक घटना इथे मांडणार आहे. त्या यासाठी की, राष्ट्र सेवा समितीच्या प्रेरणाताई क्षीरसागर नेहमी म्हणतात की, “संकल्प तेव्हाच पूर्ण होतो, जेव्हा संकल्पासोबत नीतिकल्याणाची सिद्धी असते.” मला वाटते, २०० सभांच्या संकल्पासोबत ती नीतिकल्याणाची सिद्धी होती म्हणूनच संकल्प पूर्ण करू शकले. त्या दोन वैयक्तिक घटना अशा- दि. २७ फेब्रुवारीला पुण्यात दोन सभा होत्या. मात्र, दि. २५ फेब्रुवारीला उंबरठ्याला अडखळून पडण्याचे निमित्त झाले आणि डोक्याला मेंदूजवळ आठ टाके पडले. ‘शहराबाहेर जाऊ नका,’ असेही डॉक्टर म्हणाले. त्यामुळेे मी आयोजकांना विचारले की, दुसरे कोणीतरी सभेसाठी आले तर चालेल का? तर ते म्हणाले, ”आम्ही कार्यक्रम दोन महिन्यांनी पुढे ढकलतो.” पण, शहरात कार्यक्रमाचे बॅनर झळकले होते. हॉलपासून उपस्थितांसाठीच्या सर्वच व्यवस्थेचे नियोजन झालेे होते. सभा पुढे ढकलली, तर त्यांचा खर्च आणि मुख्य म्हणजे त्यांच्या या विषयासाठी एकत्र आलेल्या हिंदूंच्या उत्साहावर विरजण पडले असते. स्वामी समर्थ आणि हनुमानजींचे स्मरण करून ठरवले की, सभा घ्यायच्याच! तुडुंब भरलेल्या सभागृहात शेकडो माताकन्यांनी शपथा घेतल्या की, त्या कोणत्याही ‘जिहाद’चा बळी होणार नाहीत. त्यांचा उत्साह, त्यांचा तो निर्धार पाहून की काय, जखम, वेदना, डोक्याचे टाकेबिके विसरून एका सभेऐवजी आणखीन दोन सभा पुण्यात घेतल्या.

दुसरी अशीच दुःखद आठवण म्हणजे, दि. १७ मार्चला मंत्री मंगल प्रभात लोढा सरांच्या माध्यमातून भायखळा आणि वरळी येथे दोन सभा ठरल्या होत्या. मात्र, दि. १५ मार्च रोजी माझी दुसरी आई कमल साळवी, हिला पायाला छोटीशी जखम झाली म्हणून इस्पितळात तातडीने दाखल करावे लागले आणि अचानक दि. १६ मार्चला आई अत्यवस्थ झाली. (ती दि. १८ मार्चला ती देवाघरी गेली) खरंतर, आई इस्पितळात आहे, हे माहिती असते तर सरांनी सभा रद्दच केल्या असत्या. पण, याही सभांची प्रसिद्धी झाली होती. कामधंद्यांना सुटी टाकून शेकडो लोक सभेला येणार होते. त्यामुळे दि. १७ मार्चच्या दोन्ही सभांमध्ये विषय मांडला. त्या सभा संपल्यानंतर ‘लव्ह जिहाद’विरोधात लढण्याचा निर्धार करणारे शेकडो लोक पाहून तेव्हाही वाटले होते की, माझे दुःख तर मोठे आहेच, पण दोन्ही सभेतील लोकांचा ‘लव्ह जिहाद’ विरोधातला निश्चय निर्धार माझ्या वैयक्तिक दुःखापेक्षा मोठा आहे.

कारण, महिला आणि समाज सक्षमीकरणारच्या आड जर कुणी येत असेल, तर ‘लव्ह जिहाद’ आणि ‘ड्रग्ज जिहाद’चाचा भस्मासुर. मुलगी मग कुणाचीही असो, कुणी तिचे तुकडे करून सुटकेस किंवा फ्रीजमध्ये टाकण्यासाठी किंवा दिल्लीतल्या साक्षीसारखे २० वेळा पाठीपोटात चाकू खुपसून क्रूरपणे मारण्यासाठी तिचे आईबाप तिला जन्माला घालत नाहीत. मुली आईबाबांच्या राजकुमारीच असतात. मुलींची फसवणूक करून त्यांचे जीवन बरबाद करणारे सैतानच आहेत. हिंदू समाजाला मागे खेचता येत नाही, तर त्यांच्या तरुण पोरांना नशेखोर बनवायचे. हिंदू कुटुंब हिंदू समाज उद्ध्वस्त करायचा, असे षड्यंत्र रचणारे सैतानच आहेत, अशा सैतानाच्या विरोधात समाजामध्ये जागृती करणे म्हणूनच गरजेचे आहे. त्यामुळेच दै. ‘मुंबई तरुण भारत’चा २०० सभांचा संकल्प पूर्ण झाला, तरी ‘लव्ह जिहाद’विरोधातला आणि महिला समाज सक्षमीकरण जागर करण्याचा हा माझा संकल्प आयुष्यभराचा आहे. या संकल्पालाही नीतिकल्याणाची सिद्धी सोबत असेलच. आपल्या शहरातच नव्हे, तर ज्ञातअज्ञात कुठेही कोणाचीही लेक ‘लव्ह जिहाद’चा बळी होऊ नये, हीच इच्छा!

200 सभा घेऊन लाखो लोकांपर्यंत ’लव्ह जिहाद’ या विषयाचे गांभीर्य पोहोचवू शकले, याचे सर्वस्वी श्रेय दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या सगळ्या टीमला विशेषतः संपादक किरण शेलार यांना आहे. माझे संघ स्वयंसेवक बंधू सुमंत दादा आमशेकर, विठ्ठलदादा कांबळे, संजयदादा नगरकर आणि मिलिंद एकबोटे यांचे पाठबळ मी कधीही विसरू शकत नाही. मंगल प्रभात दादा लोढा यांचेही सहकार्य तर शब्दातीत. कारण, ‘लव्ह जिहाद’विरोधात बोलते म्हणून काही समाजकंटक व्यक्ती आणि संघटना यांनी छुप्या तर उघडउघड धमक्या दिल्या होत्या. मात्र, सभा सुरक्षित आणि वेगात व्हायला हव्यात, यासाठी मोठ्या भावाच्या मायेने मंगल प्रभात लोढांनी सुरक्षिततेसाठी मला महिला अंगरक्षक आणि प्रवासासाठी वाहनव्यवस्था म्हणून चालकासह उपलब्ध करून दिली. त्यामुळे एकाच दिवसात मुंबई, नवी मुंबई ते नाशिक ते छत्रपती संभाजीनगर अशा चार ते पाच सभा मी करू शकले. दै. ‘मुंबई तरुण भारत’चा माझे शहर ‘लव्ह जिहादमुक्त शहर अभियान’ हे आता लोकाभियान झाले आहे. त्यामुळे सकल हिंदू समाजाचेही आभार!

९५९४९६९६३८

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.