तरुणाईला वेड लावणारा हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणजे विकी कौशल. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मसान’ या चित्रपटापासून त्याची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर ‘राजी’, ‘संजू’, ‘मनमर्जीया’, ‘सॅम बहादूर’ अशा अनेक चित्रपटांतून विकीने आपल्या अभियनाने प्रेक्षकांना भुरळ पाडली.नुकताच विकीचा ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यानिमित्ताने ‘दै. मुंबई तरुण भारत’ने विकीसोबत साधलेला सुसंवाद...
सामान्य माणसांसह कलाकारांच्या जीवनातही अनेक अडीअडचणी उद्भवतात आणि त्यांचा सामना कसा केला जातो, याचे उत्तर देताना विकी कौशल म्हणाला की, “माझ्या आयुष्यात कोणतीही वाईट घटना घडली किंवा एखाद्या कठीण प्रसंगातून मी जात असेन, तर माझ्यासोबत माझं कुटुंब कायम असतं. आत्तापर्यंत प्रत्येक दु:खाचा आम्ही एकत्रित सामना केला आहे. त्यामुळे कुटुंबाला मी कायमच पहिले प्राधान्य दिले आणि यापुढेही देत राहीन. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात खरं तर अनेक अडचणी किंवा त्यांचा स्वत:च करिअर घडवण्यासाठी खडतर प्रवास असतोच आणि या प्रवासात त्यांचे कुटुंबच त्यांना साथ देते, जे माझ्याबाबतीतही घडले.”
आजवर विविधांगी भूमिका साकारल्यानंतर कलाकार म्हणून भविष्यात आणखी काही वेगळा विचार केला आहे का, असा प्रश्न विचारल्यावर विकी म्हणतो, “माझ्या ‘बकेट लिस्ट’मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वच प्रकारांत मोडणार्या चित्रपटांची यादी आहे. कारण, आजवर कलाकार म्हणून मी ज्या भूमिका साकारल्या, त्या पलीकडे माझ्यातील नटाला दिग्दर्शकांनी ओळखावं आणि त्यापरिने अभिनेता म्हणून माझी नवी वाटचाल व्हावी, हे माझे ध्येय आहे.” विकी कौशलने त्याची आणि पत्नी कटरिना कैफशी असलेल्या नातेसंबंधांवर भाष्य करताना म्हटले की, “मी प्रॅक्टिकल विचार करतो, तर कटरिना भावनिक आहे आणि शिवाय हुशारही आहे. त्यामुळे ज्या क्षणापासून आम्ही एकमेकांच्या जीवनाचे साथीदार झालो आहोत, तेव्हापासून जगाकडे, करिअरकडे आणि स्वत:कडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला आहे. ज्यावेळी दोन वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला मिळतात, तेव्हा नक्कीच एक माणूस म्हणूनही तुमच्यात आमूलाग्र बदल होतात आणि आम्ही दोघेही मनोरंजन क्षेत्रात काम करत असल्यामुळे परिणामी कलाकार म्हणूनही आमची प्रगती फार उत्तम होत जाते.”
प्रत्येक भूमिका सादर करताना कलाकार म्हणून नवीन आव्हानं नेहमीच समोर असतात, त्याबद्दल बोलताना विकी म्हणाला, “आत्तापर्यंत मी ‘सॅम बहादूर’, ‘सरदार उधम सिंग’ या चरित्रपटांत ज्या भूमिका साकारल्या, त्या फार जबाबदारीच्या होत्या. कारण, एका महान व्यक्तीचं जीवन मला मोठ्या पडद्यावर मांडायचं होतं. पण, ‘बॅड न्यूज’ किंवा ‘भूत २’ अशा प्रकारच्या चित्रपटांच्या वेगळ्या कथा येतात, तेव्हा तुमच्यातील आणखी एक अभिनयाचा पैलू तुम्हाला उलगडता येतो. त्यामुळे अभिनेता म्हणून प्रत्येकवेळी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये स्वत:ला शोधत राहिलं पाहिजे, हा माझा मंत्र आहे आणि तो मी जपायचा पुरेपूर प्रयत्न करत आहे.” विकी कौशलने २०१५ मध्ये ‘मसान’ या चित्रपटातून अभिनयाचा कारकीर्द सुरुवात केली. या जुन्या आठवणींना उजाळा देत तो म्हणाला की, “ ‘मसान’ हा माझा अभिनेता म्हणून पहिला चित्रपट होता. या चित्रपटाने केवळ कलाकार म्हणूनच नाही, तर माणूस म्हणूनही माझ्यात अनेक बदल नकळतपणे केले.
या भूमिकेमुळे मला एक गोष्ट नक्की समजली की, कोणत्याही व्यक्तीचं यश ज्यावेळी अधोरेखित होतं, तेव्हा तो जिंकला आहे हेच केवळ आपण पाहतो. पण, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीचा त्याचा संघर्ष आपण पाहत नाही. पण, ‘मसान’मुळे मला तो समजला. बनारसमधील एका समुदायातील व्यक्तीचं जीवन मी या ‘मसान’मधून मांडलं होतं. सुदैवाने मला बनारसच्या घाटावर जाऊन त्या समुदायातील लोकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. त्यावेळी लक्षात आलं की, त्यांचं जीवन हे त्या घाटापलीकडे नाहीे. त्यांच्यासाठी शहरात मिळालेली कोणतीही नोकरी किती महत्त्वपूर्ण आहे, हे त्यांच्यासोबत बातचीत केल्यावर आणि ती व्यक्तिरेखा साकारल्यावर मला समजले. त्यानंतर माझ्यात माणूस म्हणून प्रत्येक काम करणार्या व्यक्तीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन प्रचंड बदलला आणि त्यांच्याबद्दल विशेष आदर माझ्या मनात निर्माण झाला.”
‘बॅड न्यूज’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलताना विकी म्हणतो, “ ‘बॅड न्यूज’ या चित्रपटातील मी साकारलेल्या भूमिकेचं नाव आहे अखिल चड्डा. जो दिल्लीचा असून आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण तो आनंदाने जगणारा आहे. मी विकी कौशल म्हणून माझ्यात आणि चित्रपटातील अखिल या पात्रात एक गोष्ट सारखी आहे ती म्हणजे आम्हा दोघांनाही पंजाबी गाण्यांची फार आवड आहे. पण, वास्तविक जीवनात माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे.” दरम्यान, विकी कौशल लवकरच ‘छावा’ या चित्रपटात झळकणार असून, या चित्रपटात विकी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार असून, या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर यांनी केले आहे.