वंचित बहुजन आघाडीकडून राज्यात 'आरक्षण बचाव यात्रा'!
26-Jul-2024
Total Views | 27
मुंबई : प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीकडून राज्यात आरक्षण बचाव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून चैत्यभूमीवरून या यात्रेला सुरुवात झाली आहे. राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये ही आरक्षण बचाव यात्रा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "महाराष्ट्रातील वातावरण हळूहळू गढूळ होत आहे. महाराष्ट्रातील राजकीय नेते हे पक्षाच्या भूमिकेपेक्षा आपल्या समाजाचा विचार करतात, अशी लोकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे ओबीसी आणि जरांगेंच्या मागणीसंदर्भात ते उदासिन असल्याची परिस्थिती आहे."
"मध्यंतरी शरद पवार म्हणाले होते की, येणाऱ्या विधानसभेत २२५ समाजाचे आमदार असतील. त्यांनी महाविकास आघाडीचे म्हटलं असतं तर गैरसमज झाला नसता. परंतू, त्यांनी समाज हा शब्द वापरल्याने गैरसमज निर्माण झाला असून अधिकच परिस्थिती चिघळत चालली आहे. लोकसभेत ओबीसींना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे ३१ कुणबी-मराठा समाजाचे खासदार निवडून आले. अशीच परिस्थिती आता उद्याच्या विधानसभेत होईल का? अशी चर्चा ओबीसींमध्ये सुरु झाली आहे. सगेसोयऱ्यांच्या मागणीलाही विरोध होत आहे. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीने आता आरक्षण बचाव आयोजित केली आहे," असे म्हणत त्यांनी ओबीसींचे १०० आमदार निवडून आले पाहिजेत, असे आवाहन केले आहे.