वयाच्या 74व्या वर्षीही समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित अशा भटक्या विमुक्तांसाठी अविरतपणे कार्य करणार्या रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक महादेवराव गायकवाड यांचा अनोखा जीवनप्रवास...
भटक्या विमुक्तांच्या सामाजिक-आर्थिक समस्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन गेल्या काही काळात बदललेला दिसतो. अशा या दुर्लक्षित समाजघटकांसाठी रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक महादेव श्यामराव गायकवाड यांनी आपले संपूर्ण जीवन एकाअर्थी समर्पितच केले. आज वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही ते भटक्या विमुक्तांच्या सर्वांगीण कल्याणासाठी जिद्दीने कार्यरत आहेत.
महादेव गायकवाड यांचा जन्म दि. 10 ऑक्टोबर 1949 रोजी तुळजापूरच्या काकरंबा गावात झाला. त्याकाळी घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. असे असतानाही त्यांच्या वडिलांची जिद्द होती की, आपल्या दोन्ही मुलांना उत्तम शिक्षण द्यायचे. त्यांच्या घरात पूर्वजांमध्ये कोणालाही शिक्षणाचा गंध नसल्याने बरेचजण अशिक्षित. वडिलांचेही शिक्षण तिसरीपर्यंत झालेले. मात्र, वडिलांनी आपल्या मुलांसाठी पाहिलेल्या स्वप्नांमुळे महादेवराव ‘एमए, एमएड’पर्यंतचे शिक्षण पूर्ण करू शकले. दारिद्य्राचे अनेक चटके सोसत पुढे 1971 साली ते शिक्षक म्हणून रुजू झाले. आज संघपरिवारात ‘आबा’ म्हणून परिचित असलेल्या महादेवरावांना त्याकाळी संघाबाबत फारशी माहिती नव्हती. महाविद्यालयात असतानाही संघाबाबत केवळ चर्चाच व्हायची. येता-जाता कुठेतरी संघाच्या शाखा दिसायच्या तेवढेच. 1971 ते 1975 लातूर रेल्वे स्थानकात ते शासकीय सेवेत होते. 1976 साली तिथून बदली झाल्यानंतर त्यांचा संघाशी परिचय आला.
शालेय जीवनात त्यांना भटक्या विमुक्तांबाबत, त्यांच्या कामाबाबत थोडीफार माहिती होती. एकीकडे ते संघ स्वयंसेवक तर होतेच, त्यासोबतच ते भटक्या विमुक्तांच्या संघटनेचे सदस्यही होते. त्यामुळे संघरचनेतून आपण भटक्या विमुक्तांसाठी काहीतरी करावे, असे त्यांना कायम वाटायचे. एकेदिवशी याबाबत त्यांनी आपल्या प्रचारकांकडे तसा प्रस्तावही मांडला. मात्र, संघात ‘एकशः संपत्’ असल्याने म्हणजेच जात-पात न पाहता सर्वांसाठी संघ आहे, याविचाराने संघकार्य चालायचे. त्यामुळे केवळ भटके विमुक्त किंवा अशा वर्गांसाठी विशिष्ट काम करायची रचना कधी राबविली गेली नाही. त्यानंतर जेव्हा ‘समरसता मंचा’ची स्थापना झाली, तेव्हा सर्व क्षेत्रांत, निरनिराळ्या जातीसंस्थांमध्ये संघाचे काम पोहोचावे, या विचाराने असा निर्णय घेण्यात आला. भटक्या विमुक्तांसाठी संघाकडून काम व्हावे, यासाठी सोलापूरच्या शिवस्मारकात भटके विमुक्तांची पहिली बैठक झाली. त्यात महादेवराव हे अग्रणी होते.
त्याकाळी वैचारिक मतभेदांमुळे भटक्या विमुक्तांच्या संघटनेची अवस्था अशी झाली होती की, आपापसांत फाटाफुटीही बर्याच झाल्या. एकमेकांमध्ये ताटातूट झाली. हे सुरळीत करण्यासाठी महादेववरावांनी संघकार्यामार्फत आपले काम सुरू केले. यातून पुढे ‘भटके विमुक्त विकास परिषद’ आणि ‘भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान’ या दोन संघटना उदयास आल्या. माहादेवराव हे ‘भटक्या विमुक्त विकास परिषदे’चे पहिले प्रांत निमंत्रक, तर ‘भटक्या विमुक्त विकास प्रतिष्ठान’चे पहिले उपाध्यक्ष होते. यानंतर संघरचनेतून कार्य सुरू झाल्यानंतर संघटनेने आपल्या कार्यात वेग घेतला आणि भटक्या विमुक्तांसाठीचे काम सुरळीत होऊ लागले. गिरीश प्रभुणे आणि महादेवराव गायकवाड या दोघांचेही भटक्या विमुक्तांच्या विकासात मोलाचे योगदान. यमगरवाडीचा प्रकल्प हे याचे आदर्श उदाहरण. यमगरवाडी प्रकल्प हा तेव्हा पारधी मुलांसाठी सुरू करण्यात आला होता. काकरंब्याची साडेतीन एकरांची जमीन सुरुवातीला या कार्यासाठी वापरली होती. त्यानंतर एकूण 18 एकरांची जमीन केवळ संघकार्य करत असल्याने एका गृहस्थांनी महादेवरावांना संघकार्यासाठी समर्पित केली. आज त्याच ठिकाणी हा प्रकल्प उभा आहे.
‘वन्स अ स्वयंसेवक, ऑलवेज अ स्वयंसेवक’ असे बर्याचदा म्हटले जाते. या वाक्याची झलक महादेवरावांमध्ये हमखास दिसून येते. कारण, 1976 साली संघाशी संबंध आल्यानंतर ते तालुका कार्यवाह, बौद्धिक प्रमुख, धाराशीव-लातूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य तर होतेच, पुढे नऊ वर्षे जिल्हा संघचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. परंतु, आज वयाच्या 74व्या वर्षी घरात बसून न राहता, ते ‘शताब्दी विस्तारक’ म्हणून संघाचे काम पाहात आहेत. वयामुळे सुरुवातीला घरच्यांची परवानगी नव्हती, मात्र हिंदुत्वाचे काम असल्याने त्यांनीही नंतर महादेवरावांना आडकाठी केली नाही. आज त्यांनी या माध्यमातून आपले आयुष्य संघकार्यासाठी समर्पित केले आहे.
महादेवरावांसाठी आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे, अयोध्येत दि. 22 जानेवारी रोजी झालेला श्री रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा. देशभरातून 16 दाम्पत्यांना गाभार्यात रामललाची पूजा करण्याचा मान मिळाला होता. महादेवराव हे त्यांच्यापैकी एक होते. आपल्या पत्नीसह त्यांनी तो क्षण अनुभवला, ही खरच भाग्याची गोष्ट आहे. त्यांची आजी त्यांना प्रभू श्रीरामाची गोष्ट सांगायची. त्यामुळे श्रीरामांचे विचार त्यांच्या नसानसांत सामावले होते.त्यांना कारसेवेला जाण्याची इच्छाही होती, परंतु यमगरवाडीतील मुलांची जबाबदारी असल्याने त्यांना ते जमले नाही. भटक्या विमुक्तांसाठी महादेवराव करत असलेले कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे. ते प्रत्येकासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व. समाजासाठी काम करण्याची ताकद त्यांना आजन्म मिळत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. महादेवराव यांच्या भावी आयुष्यासाठी आणि एकंदरीत प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेक शुभेच्छा.