‘अब्रुपिपासु’ सुदानी सैनिक

    23-Jul-2024   
Total Views |
women forced to exchange sex for food


सुदान हा जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक म्हणून ओळखला जातो. कारण, गेल्या कित्येक वर्षांपासून हा देश आर्थिक आव्हानांच्या गर्तेत आकंठ बुडालेला. युद्धग्रस्त सुदानची आजची परिस्थिती जितकी भयावह, तितकीच ती चीड आणणारीसुद्धा. कारण, या देशामध्ये महिलांना अन्नासाठी मोठी किंमत मोजावी लागल्याची घटना समोर आली आहे. याबाबतचा धक्कादायक खुलासा ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तातून उघडकीस आला. सुदानी महिलांना अन्न मिळवण्यासाठी या देशाच्या सैनिकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले गेले. सुदानी महिलांना आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आपल्याच देशाच्या सैनिकांची अशी भूक भागवावी लागते, हे सर्वस्वी दुर्दैवीच!

सुदानच्या ओमदुरमन शहरातून पळून गेलेल्या काही महिलांनी जेव्हा ‘द गार्डियन’शी संवाद साधला, तेव्हा हा घृणास्पद प्रकार समोर आला. महिलांनी सांगितले की, सैनिकांसोबत शारीरिक संबंध ठेवणे हाच त्यांच्या कुटुंबीयांना अन्नपुरवठा करण्याचा एकमेव मार्ग आहे. हाच त्यांच्यासाठी शेवटचा पर्याय आहे, जेणेकरून त्या आपल्या मुलांचे आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी पैसे उभे करू शकतात. सुदानमध्ये असे पहिल्यांदाच घडलेले नाही, तर यापूर्वीही अनेकदा असे आदेश देण्यात आलेलेे आहेत, ज्यामध्ये देशाच्या सैनिकांना पगाराच्या बदल्यात महिलांवर बलात्कार करण्याचे आदेश देण्यात आले होते. 1956 साली स्वातंत्र्य मिळालेला सुदान हा देश खर्‍या अर्थाने कधीच स्वतंत्र झाला नाही.

हिंसाचार, लोभ आणि सत्तासंघर्षामुळे सुदान हा देश पृथ्वीवर नरक ठरला आहे . या देशात गृहयुद्ध उफाळून आल्यानंतर लगेचच महिलांचा हा छळ सुरू झाला, ज्यामध्ये देशाच्या सैन्याला निमलष्करी ‘रॅपिड सपोर्ट फोर्सेस’विरुद्ध सामना करावा लागला. गेल्यावर्षी दि. 15 एप्रिलपासून सुरू झालेल्या या संघर्षानंतर काही दिवसांतच, सशस्त्र पुरुषांकडून महिलांवरील बलात्काराच्या धक्कादायक बातम्या समोर आल्या. सुदानमध्ये सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. एका अंदाजानुसार, मृतांची संख्या 1 लाख, 50 हजार इतकी आहे. यात 11 दशलक्षांहून अधिक लोक बेघर झाले आहेत आणि देश दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. खाण्यापिण्यापर्यंत देशाची आर्थिक परिस्थिती संकटात आहे. देशाचे सैनिक या संकटाचा फायदा घेत असाहाय्य महिलांसोबत आपली शारीरिक भूक भागवत आहेत.

लैंगिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांची संख्याही लक्षणीय. कारण, संघर्षाच्या पहिल्या काही आठवड्यांपासून युद्धभूमीवर सक्रिय असलेल्या स्त्रिया आणि आरोग्यसेवा कर्मचार्‍यांनी बलात्काराच्या असंख्य प्रकरणांची माहिती दिली. तसेच ग्रेटर खार्तूममधील सर्व वयोगटातील महिलांवरील लैंगिक हिंसाचाराचे क्रूर प्रकार सामायिक केले आहेत. यात विशेषतः ज्या तरुणींना अनेकदा अपहरणांचा सामना करावा लागतो, त्या तरुणींवर ‘आरएसएफ’च्या सैनिकांकडून पडक्या इमारतींमध्ये बलात्कार केले गेले. 1980 आणि 90च्या दशकात दक्षिण सुदान आणि इतर युद्धग्रस्त भागांमध्ये झालेल्या अत्याचारांची आठवण करून देते, जिथे महिला आणि त्यांच्या समुदायातील इतरांनी आपला जीव गमावला. ग्रेटर खार्तूमसह हिंसाचाराने प्रभावित भागांत महिलांवरील लैंगिक हिंसाचाराकडे सध्या अधिक लक्ष आहे. अशा हिंसाचारांत बळी पडलेल्या आणि वाचलेल्यांना पाठिंबा देण्यासाठी आज विविध कार्यक्रम राबविले जात आहेत, ज्यामध्ये ट्रॉमा समुपदेशनाचा समावेश आहे. जर एखादा देश मागासलेला, गरीब किंवा विकसनशील असेल, तर सर्व काही त्याच्या नागरिकांवर अवलंबून असते, विशेषतः जर तो देश लोकशाहीवादी असेल तर!

सुदानच्या सैनिकांचे हे कृत्य अत्यंत निंदनीय असेच. कारण, देशाचा सैनिक तो असतो, ज्याच्या कर्तव्यदक्षतेचा धडा हा शिकण्यासारखा असतो. जोपर्यंत सैनिक सीमेवर तैनात आहेत, तोपर्यंत त्या देशातील नागरिक निर्धास्तपणे श्वास घेऊ शकतात. त्या त्या देशाची सुरक्षा, अखंडता आणि एकता राखण्यात सैनिकांचे योगदान सर्वोपरि असते. शूर सैनिक अखंडता, एकता आणि बंधुत्वाचे प्रतीक आहेत. असे सैनिक कधीच कोणापुढे शरमेने आपले गुडघे टेकत नाहीत. मात्र, सुदानच्या सैनिकांकडून जी दुष्कृत्य आज घडत आहेत, ती कारवाईसच पात्र आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सुदानच्या महिला केवळ अन्नाच्या एका दाण्यासाठी ज्या परिस्थितीतून जात आहेत, त्यावरून अशा सैनिकांवर कठोर कारवाई होणे, हेच उचित ठरेल.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक