मुंबई : ‘जय संतोषी मां’ हा १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे निर्माते दादा सतराम रोहरा यांचे निधन झाले आहे. १८ जुलै २०२४ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दादा सतराम रोहरा हे सिंधी समाजातील मोठे प्रस्थ होते. ते केवळ निर्मातेच नाही तर उत्तम गायकही होते. दादा सतराम रोहरा यांनी दादा राम पंजवानी, भगवंती नवानी, कमला केसवानी आणि इतर अनेक प्रसिद्ध गायकांसह सुपरहिट गाणी दिली आहेत. त्याशिवाय, 'जय संतोषी मां' आणि 'हाल ता भाजी हालूं' यांसारख्या हिट चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे.
एका सोशल मिडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'प्रसिद्ध गायक आणि चित्रपट निर्माते दादा सतराम रोहरा यांचे १८ जुलै २०२४ रोजी निधन झाल्याचे कळवताना आम्हाला अतिशय दुःख होत आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना शक्ती देवो.
दादा रोहरा यांचा जन्म १६ जून १९३९ रोजी सिंधी कुटुंबात झाला. रोहरा यांनी १९६६ मध्ये 'शेरा डाकू' चित्रपटाद्वारे निर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश केला. यानंतर त्यांनी 'रॉकी मेरा नाम', 'घर की लाज', 'नवाब साहिब' आणि 'जय काली' सारखे चित्रपट केले. याशिवाय त्यांनी निर्मिती केलेल्या 'जय संतोषी मां' या चित्रपटाने 'शोले' चित्रपटालाही टक्कर दिली होती. जय संतोषी मां या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले होते. प्रेक्षक चित्रपट पाहताना पैसे आणि फुलांचा वर्षाव करत असत. तसेच, या चित्रपटात अभिनेत्री अनिता गुहाने संतोषी मातेची भूमिका साकारली होती; आणि आश्चर्याची बाब म्हणजे लोकं खऱ्या आयुष्यातही त्यांची पूजा करू लागले होते.