आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ज्यांनी कायम शिक्षक होऊन, कर्तृत्ववान आणि हुशार पिढी घडविण्याचे व्रत अंगीकारले, अशा व्रतस्थ शिक्षणव्रती सुप्रिया ठोकळ यांच्याविषयी....
लहानपणी मुली घरी भातुकलीचा खेळ किंवा घरीच चार डोकी जमवून छानशी शाळा भरवतात. हाच खेळ खेळत भविष्यातही शिक्षिका व्हायचे, असे स्वप्न सुप्रिया सुधीर ठोकळ यांनी पाहिले. सुप्रिया यांचे बालपण कल्याण तालुक्यातील बुडदूल या गावी गेले. त्यानंतर पहिली ते सातवीपर्यंतचे शालेय शिक्षण गोरेगावमधील महानगरपालिकेच्या शाळेत पूर्ण झाले आणि त्यानंतर आठवी ते दहावीचे शिक्षण त्यांनी विक्रोळीतील उदयचल शाळेतून पूर्ण केले. आता पुढे करिअर म्हणून कला, विज्ञान की वाणिज्य शाखेकडे वळणार, असा प्रश्न सगळेच विचारु लागले. सुप्रिया यांनी त्यांचे बालपणीचे शिक्षिका होण्याचे स्वप्न पूणर्र् करण्यासाठी मुंबईच्या ग्रॅण्ट रोडमधील ‘रमाबाई नवरंगे अध्यापिकांचे सेवासदन सोसायटी’ या ‘डीएड’ महाविद्यालयामध्ये शिक्षिका होण्यासाठीचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला. शिक्षक होण्यासाठी आधी स्वतःलादेखील अभ्यास करावा लागतो, याचे महत्त्व त्यांना फार कमी वयातच कळले होते, हे विशेष.
बरं, कुटुंबातून सहजासहजी या क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांना मान्यताही मिळाली नाही. दहावी झालेली लहानगी मुलगी आपल्या मावसभावाचा हात पकडून थेट मुंबईला गेली आणि डीएड महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन आली. पण, त्यांच्या आईला इतक्या लांब आपली लेक एकटी प्रवास करणार, हे ऐकूनच मनात धडकी भरली आणि मायेपोटी त्यांनी महाविद्यालयासाठी इतक्या लांब जायचे नाही, हा निर्णय दिला. पण, सुप्रिया यांनी मनाशी पक्के केले होते की, त्यांना शैक्षणिक क्षेत्रातच पुढे काम करायचे आहे. त्यामुळे लोअर परळला आपल्या मावसभावाच्या घरी त्या काही काळ राहिल्या आणि त्यानंतर एकटीने विक्रोळी ते ग्रॅण्ट रोड हा प्रवास करू लागल्या. डीएड पूर्ण झाल्यानंतर १९८६ सालापासून खरेतर त्या शिक्षिका म्हणून या क्षेत्रात कार्यरत आहेत. पण , त्यांनी केवळ ‘डीएड’ नाही, तर त्यानंतर एसएनडीटी महाविद्यालयातून ‘बीए’ आणि ‘एमए’ची पदवी मिळवली. त्यानंतर यशवंतराव विद्यापीठातून ‘बीएड’चेदेखील शिक्षण त्यांनी पूर्ण केले. एकीकडे स्वतः विद्यार्थी होऊन त्या ज्ञानार्जन होत्या, तर दुसरीकडे शिक्षिका या पदाची जबाबदारीने पार पाडत ज्ञानदानही करीत होत्या.
सद्यस्थितीला सुप्रिया ठोकळ या घाटकोपरमधील बर्वेनगरच्या महापालिका शाळेत प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. सुप्रिया यांनी केवळ विद्यार्थ्यांना धडे द्यायचे, यापुरते स्वतःला सीमित न ठेवता, पालकसभेत शिक्षणाचे महत्त्व, विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी ऑनलाईन पाठाचे नियोजन यावरही भर दिला. तसेच, महानगरपालिका शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी उद्बोधनवर्गांचे विशेष आयोजनदेखील त्या करतात. तालुकास्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे कामही सुप्रिया करतात.
सुप्रिया यांचे सामाजिक कार्यदेखील वाखाणण्याजोगे. शालेय जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याला आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्या ‘आरोग्य व निरोगीपण’ त्या विषयासंबंधी मार्गदर्शन करतात. तसेच, इयत्ता चौथी आणि सातवीच्या (पाचवी आणि आठवीच्या) शिष्यवृत्तीसाठी तयारी करणार्या विद्यार्थ्यांना सुप्रिया मार्गदर्शन करतात. आरोग्याच्यादृष्टीने विचार करत त्या रक्तदान शिबीर, मोफत रक्ततपासणी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करतात. त्याशिवाय, हृदयरोगावर मोफत व्याख्यानांचेही त्या आयोजन करतात. शिक्षणाचे महत्त्व समजून घेत त्या दरवर्षी शाळा सुरू झाल्यावर महाराष्ट्राच्या गावांतील विविध शाळांमध्ये मोफत वह्यांचे वाटपही करून शैक्षणिक क्षेत्राच्या वाढीसाठी मोलाचा वाटा उचलतात.
सामाजिक, शैक्षणिक या क्षेत्रांत काम करणार्या सुप्रिया यांच्यात सुप्त लेखिकादेखील दडली आहे. त्यांनी आत्तापर्यंत शैक्षणिक कवितासंग्रह, लेख, पुस्तके यांचे लिखाण केले आहे. त्यापैकी ‘संस्कार प्रिय’, ‘आनंदाची बाग’, ‘मनाचे बोल’, ‘मातृभूमीतील रत्ने’ आणि ‘प्रेरणा’ ही त्यांनी लिहिलेली पुस्तकेदेखील प्रकाशित झाली आहेत. याशिवाय, त्यांना बर्याच पुरस्कारांनीदेखील गौरवण्यात आले आहे. सुप्रिया ठोकळ यांना २०११-१२ सालचा ‘महापौर पुरस्कार’, नवी दिल्लीत २०१३ साली ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’, २०१४ साली ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार’ आणि ‘मुंबई वृत्तपत्र लेखक संघा’तर्फे ‘जागृत नागरिक पुरस्कार’, २०१५ साली ‘मणिरत्न शिक्षक गौरव पुरस्कार’, २०१५-१६ साली ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार’, २०१६ साली ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
याशिवाय, १९९९ ते २००२ या कालावधीत मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी यासाठी त्यांना विशेष बक्षिसही देण्यात आले. सुप्रिया ठोकळ या १९८६ साली जून महिन्यात शिक्षिका म्हणून रूजू झाल्या. शैक्षणिक क्षेत्रात सुरू झालेल्या त्यांच्या वाटचालीला तब्बल ३८ वर्षे पूर्ण झाली असून, यावर्षी जुलै महिन्यात त्या निवृत्तदेखील होत आहेत. आजपर्यंत शिक्षकीपेशात स्वतःला झोकून देत काम करणार्या शिक्षिका सुप्रिया ठोकळ यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!