भूशी धरण दुर्घटना! नेमकं काय घडलं?

    02-Jul-2024   
Total Views |
 
Bhushi Dam
 
वीकेंड आला की, अनेकजण फिरायला, मौजमजा करायला बाहेर पडतात. त्यात पावसाळ्यात मस्त थंड आणि हिरव्यागार वातावरणात बाहेर फिरण्याची मजा काही औरच. असंच एक जोडपं आपल्या मुलांना घेऊन समुद्रकिनारी फिरायला गेलं. वीकेंडचा आनंद घेण्यासाठी ही मंडळी वांद्र्याच्या बँडस्टँडवर गेली. समुद्र किनाऱ्यावर असलेल्या एका मोठ्या दगडावर हे जोडपं बसलं आणि इकडे त्यांची मुलं त्या दोघांचा व्हिडीओ बनवत होते. तेवढ्यात अचानक मागून एक मोठी लाट आली आणि हे दाम्पत्य वाहून गेलं. दरम्यान, त्यांच्या मुलांनी उत्साहात बनवलेल्या व्हिडीओत ही अंगावर काटा आणणारी दुर्घटना कैद झाली. खरंतर ही घटना मागच्या वर्षीची आहे. पण याची आठवण आता काढण्याचं कारण म्हणजे असाच वीकेंड साजरा करण्यासाठी लोणावळ्याला गेलेलं अख्खंच्या अख्ख कुटुंब काल वाहून गेलंय. यात एका महिलेसह चार लहान मुलांनी आपला प्राण गमावलाय. तर ही घटना नेमकी काय आहे? अधिवेशनात याचे काय पडसाद उमटले आणि पावसाळी पर्यटन सहलीला जाताना पर्यटकांनी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.
 
पावसाळा आला की, पर्यटकांना लोणावळ्याला जाण्याचे वेध लागतात. मग कुणी धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटतो तर कुणी निसर्गरम्य वातावरणात रमून जातो. रविवारी पुण्यातील हडपसर भागातील अन्सारी नावाचं एक कुटुंबदेखील लोणावळ्यात मौजमजा करण्यासाठी गेलं. लोणावळ्यात प्रसिद्ध असलेल्या भुशी धरण परिसरात ते गेले. यावेळी दुपारी १२ ते १२.३० वाजताच्या दरम्यान, ते सगळे भुशी धरणाच्या मागील बाजूच्या धबधब्याकडे गेले. मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढला आणि या कुटुंबातील एक-दोन नाही तर तब्बल ७ जण धरणात वाहून गेले. यातल्या दोघांना पाण्याच्या बाहेर पडण्यात यश आलं. मात्र, उर्वरित पाच जण प्रवाहासोबत वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्याला सुरुवात केली. धरणात वाहून गेलेल्यांमध्ये एक ३६ वर्षीय महिला, ४, ८ आणि १३ वर्षे वयोगटातील तीन मुली आणि एका ९ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. यापैकी दोन मुली आणि महिलेचा मृतदेह सापडलाय तर दोन जण अजूनही बेपत्ता आहे. अन्सारी परिवारातील हे सदस्य धबधब्यात भिजण्याचा आनंद घेत होते. पण काही कळायच्या आतच पाण्याचा प्रवाह त्यांना आपल्यासोबत घेऊन गेला.
 
दरम्यान, आज विधानसभेतही या घटनेचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात हा विषय मांडला. ते म्हणाले की, "दरवर्षी पावसाळ्यात अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडतात. पावसाळ्यात लोणावळ्यात मोठ्या संख्येत पर्यटक येतात. लोणावळ्यासह भुशी डॅम परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोणतीच व्यवस्था नाही, सुरक्षा रक्षक नाहीत. राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाळ्यातील पर्यटन स्थळांवरील पर्यटकांच्या सुरक्षेबाबत विचार करावा. अधिवेशन काळात अशी दुर्घटना होते, तर याप्रकरणी सरकार नेमकं काय उपाययोजना करणार त्याबद्दलची भूमिका सरकारनं स्पष्ट करावी," अशी मागणी त्यांनी केली.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही या घटनेची गंभीर दखल घेत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना काही सुचना दिल्यात. याशिवाय त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या विभागातील धोकादायक पर्यटन स्थळांचा आढावा घेण्याच्या सूचनाही दिल्यात. पर्यटनस्थळी जीवरक्षक आणि एनडीआरएफ तैनात करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. शिवाय मुंबईतील समुद्रकिनारे सुरक्षित करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत.
 
एवढंच नाही तर समाज माध्यमांवरही अनेकजण या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसताहेत. प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांनी या घटनेची दखल घेत यावर भाष्य केलंय. त्या म्हणाल्या की, "ही घटना या कुटुंबातील प्रौढ व्यक्तींच्या बेपर्वाईमुळे घडलीये. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह पूर्ण जोमात आहे हे माहिती असताना कोणतेही पालक २ किंवा ५ वर्षाच्या मुलाला नदीच्या मध्यभागी कसे घेऊन जाऊ शकतात? महाराष्ट्रात दरवर्षी पावसाळ्यात अशा घटना घडतात. तरीसुद्धा पोहता येत नसतानाही नद्या आणि धबधब्यांच्या आसपास लोक विनाकारण धोका पत्करतात आणि जेव्हा अपघात होतो तेव्हा ते प्रशासनाला दोष देतात. पण भूतकाळातील घटनांमधून कुणी काहीच शिकत नाही. मी मुळशी जवळ राहते, या परिसरात अनेक धबधबे आहेत. इथे मी हाय हिल्स घातलेल्या स्त्रिया ओल्या खडकांवरून धबधब्याकडे जाताना पाहिल्या आहेत. प्रत्येकाला रील काढायची आहे किंवा सेल्फी घ्यायचा आहे, पण आपण कुठे जात आहोत हे कुणीही पाहत नाही. दुसरीकडे, पोहता येत नसताना बिअरच्या बाटल्या घेऊन धबधब्यावर जाऊन तिथे पोहण्याचा प्रयत्न करणारे पुरुषही आहेत. त्यामुळे माणसाचा मुर्खपणा मर्यादेच्या बाहेर जाताना दिसतोय," अशा शब्दात त्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केलाय.
 
सुटी असली की, लोक मौजमजा करण्यासाठी घराबाहेर पडतात. समुद्रकिनाऱ्यावर, धबधब्यांच्या ठिकाणी मोठी गर्दी जमते. एवढ्या गर्दीत अनेकजण जीव धोक्यात घालून फोटो, व्हिडीओ आणि रील्स बनवतात. मात्र, उत्साहाच्या भरात आपण आपला जीव गमावू शकतो याची साधी ते कल्पनाही करत नाहीत. त्यामुळेच कधी एखादी लाट आली आणि आपल्याला घेऊन गेली हे त्यांच्या लक्षातही येत नाही. बरं, दरवर्षी अशा कितीतरी बातम्या कानावर येत असूनही याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं जातं.
मग आता पावसाळी पर्यटन सहलींच्या ठिकाणांवर जाताना आपण काय काळजी घ्यायला हवी? तर सर्वात महत्वाची बाब म्हणजे धोकादायक ठिकाणी फोटो किंवा व्हिडीओ घेणं टाळावं. धबधबे आणि धरणात पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी बेफामपणे वागू नये. प्रत्येकाने आपला अतिउत्साहीपणा शक्यतो टाळावा. पर्य़टनाला जाताना जास्त धोकादायक आणि गर्दीची ठिकाणे टाळता आली तर असे धोकादायक प्रकार होणार नाहीत.
 
कधीकधी अशा प्रकारच्या घटनांना पर्यटकांचा बेजबाबदारपणाही कारणीभूत असतो. प्रशासन जरी असेल तरी अचानक वाढलेल्या गर्दीमुळे त्यांच्याही आवाक्याबाहेर प्रकरणं जातात. त्यामुळे एकंदरीत पर्यटकांमध्येच जनजागृतीची आवश्यकता आहे.
 
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....