मुस्लीम देशांशी नाते सांगून तिथले रीतिरिवाज पाळण्याची पराकाष्ठा करणारे लोक आपल्या देशात कमी नाहीत. अशा सगळ्यांसाठी बातमी आहे की, आता दुबईच्या राजकुमारीने तिच्या पतीलाच चक्क इन्स्टाग्रामवर तीन तलाक दिला. तिने लिहिले, “प्रिय पती, तुम्ही दुसर्यांबरोबर व्यस्त आहात. त्यामुळे मी तुम्हाला घटस्फोट देत आहे. तलाक...तलाक...तलाक... काळजी घ्या!” असा प्रेमळ तलाक!!
दुबईची राजकुमारी आणि पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूमची कन्या शेखा माहरा बिंत मोहम्मद बिन राशिद अल मकतूम हिने तिच्या पतीला शेख माना बिन मोहम्मद बिन राशिद बिन माना अल मकतूम यांना इन्स्टाग्रामवर सार्वजनिकरीत्या तलाक दिला. तिचा पती उद्योजक, एक श्रीमंत व्यक्ती. त्यांच्या विवाहालाही फार वर्षे झाली, असे नाही. त्यांना एक मुलगी आहे. ती एक वर्षाचीसुद्धा नाही. मुलगी झाल्यावर तिच्या पतीने आणि तिने मुलीसोबत फोटो काढून तो समाजमाध्यमांवर शेअर केला होता. मात्र, आता दुबईच्या राजकन्येने तो फोटो समाजमाध्यमांवरून काढून टाकला. तसेच समाजमाध्यमावर पतीला ब्लॉकसुद्धा केले. ऑनलाईन पद्धतीने जितका दुरावा दाखवता येईल तितका राजकुमारीने दाखवला. पती इतरांसोबत व्यस्त आहे, म्हणत पत्नीने त्याच्याशी घटस्फोट घेणे, याचा अर्थ लोकांनी असा काढला की, नक्कीच राजकुमारीच्या पतीचे इतर महिलांशी संबंध असतील. ते सहन न होऊन राजकुमारीने त्याला घटस्फोट दिला. वरवर पाहता यात काही विशेष वाटत नसले, तरी दुबईच्या मुस्लीम राजकन्येने पती दुसरीकडे व्यस्त आहे, म्हणून त्याला घटस्फोट देणे हा साहजिकच जागतिक चर्चेचा विषय.
कारण, या राजकन्येच्या पित्याचे कायदेशीर सहा विवाह झालेले. तसेच ही राजकुमारी या पित्याची २६ अपत्यांपैकी एक अपत्य. इस्लाम, शरिया वगैरे मानणे ओघानेच आले. यामध्ये एक वेगळेपण एकच की, या राजकुमारीची आई ग्रीसची नागरिक. मात्र, तिही पित्यासोबत राहत नाही. या दुबईच्या राजकुमारीने मुस्लीम पतीला तलाक दिला, याचाच अर्थ स्त्री म्हणून, पत्नी म्हणून तिलाही काही भावना आहेत, हक्क आहेत, हे तिने स्पष्ट केले. पती हा पत्नीशी मन मानेल तसे वस्तू समजून वागेल आणि वर ‘आपल्यात असे करणे मान्य आहे,’ असे म्हणेल. या सगळ्यांना या राजकुमारीने छेद दिला. इस्लाममध्ये पत्नी तिच्या पतीला घटस्फोट देऊ शकत नाही, असे नाही. मात्र, पत्नीने स्वतःहून पतीला घटस्फोट दिला, तर ‘कौम’मध्ये तिला सन्मान देत नाहीत, हेच चित्र. तर, दुबईच्या राजकुमारीने नात्यातला हक्क, स्त्री आणि पत्नी म्हणूनचे अस्तित्व यानुसार जे काही केले, ते दुबईला प्रमाण मानणारे जगभरातले इस्लामिक देश आणि नागरिक यांना मान्य आहे का?
या परिक्षेपात भारतात संविधानाचे राज्य असले तरीसुद्धा परिस्थिती काही जास्त बदलली नाही. कालपरवाच आपल्या देशात बरेलीमध्ये घडलेली एक घटना उघडकीस आली. काही वर्षांपूर्वी एका मुस्लीम मुलीचे मुस्लीम मुलासोबत प्रेमसंबंध जुळले. पण, मुलाच्या घरच्यांनी पाच लाख हुंड्याची अट ठेवली. मुलीच्या आईबापाने एक लाख हुंडा दिला. शेवटी, कसाबसा दोघांचा निकाह झाला. मात्र, घरात कुरबुरी सुरू झाल्या. त्याचदरम्यान, म्हणजे २०२१ साली या मुलीचा पती दुबईला नोकरीसाठी गेला. घरातल्या कुरबुरी त्याला तिथेही फोनवरून वगैरे कळवल्या जायच्या. त्यामुळे त्याचे आणि त्याच्या पत्नीचे वाद झाले. त्याने रागाने ‘तलाक, तलाक तलाक’ म्हटले. तलाक झाला, पण मुलीला तर तलाक नको होता.
तिने दुबईत असलेल्या पतीला आर्जवं केली, विनंती केली. तेव्हा तो म्हणाला, “आता परत एकत्र यायचे तर तुला ‘हलाला’ करावा लागेल.” शेवटी, तिच्या मोठ्या दिरासोबत तिला ‘हलाला’ करावा लागला. त्यानंतर मग पुन्हा तिच्या पतीने तिला स्वीकारले. मात्र, पतीसोबत पुन्हा निकाह झाल्यानंतरही तिचा दीर तिच्यावर जबरदस्ती करू लागला. तिने दुबईत असलेल्या तिच्या पतीला हे सांगितले. तर, त्याने पुन्हा तिला दुबईतूनच तीन तलाक दिला. मूळच्या दुबईच्या मुस्लिमांनी मानवी नात्यातले माणूसपण स्वीकारले. मात्र, दुबईला प्रमाण मानणारे जगभरातले ‘कौमवाले’ नात्यामधले सन्मानाचे माणूसपण स्वीकारतील का?
९५९४९६९६३८