
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात दि. १५ जुलै रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४ जवानांच्या बलिदानानंतर आणखी एक दहशतवादी हल्ला झाला आहे. कास्तीगड भागातील जद्दन बाटा गावात हा हल्ला झाला. गुरुवार, दि. १८ जुलै २०२४ झालेल्या या हल्ल्यात लष्कराचे दोन जवान जखमी झाले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवारी हल्ला करणारे हे तेच दहशतवादी असल्याचे मानले जात आहे. अशा स्थितीत एकीकडे लष्कराच्या जवानांनी या दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम सुरू केली असताना, दुसरीकडे डोडा पोलिसांनी जिल्ह्यातील दहशतवाद्यांच्या आश्रयदात्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
दि. १७ जून रोजी या संदर्भात माहिती देताना डोडा पोलिसांनी सांगितले की, जून आणि जुलैमध्ये झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून डोडा पोलिसांनी स्थानिक पातळीवर दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी दहशतवाद्यांची मदत करणाऱ्या शौकत अली नावाच्या व्यक्तीला अटक केल्याचे समोर आले आहे.
शौकत अलीचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत असून तो ओव्हरग्राउंड वर्कर आहे. शौकत अलीवर आरोप आहे की, लष्कराच्या जवानांवर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना त्याने काही दिवस आपल्या घरात ठेवले होते आणि यादरम्यान त्याने त्यांना फक्त खाण्यापिण्याची व्यवस्था केली नाही तर त्यांना वायफायही पुरवले ज्याद्वारे ते पाकिस्तानमध्ये बसलेल्या हॅन्डलरशी संवाद साधू शकले. पोलिसांनी शौकत अलीला पकडले असून त्याची चौकशी सुरू आहे. याआधीही तपास यंत्रणांनी कारवाई करत दहशतवाद्यांच्या आश्रयदात्यांना अटक केली आहे.